मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिय नाना पाटेकर,

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता.. नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं.. हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..? नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..???? नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड.. जळ्ळं तुमचं ते बॉलिवुडवाल्यांचं जुहू..तिथे असतील एक वेळ मुखवटेवाली मंडळी..पण मुंबै फक्त एवढीच काय रे? तुम्ही बॉलीवुडवाले, पैशेवाले..गाड्या उडवता.. अरे जरा मोकळेपणे फिरा मुंबैच्या गल्लीबोळातनं.. बेस्टमधनं..लोकलच्या लगेजच्या डब्यातनं..दाणाबाजार..भातबजार..झालंच तर कुर्ला नेहरूनगर.. आमचा फोरासरोड, फॉकलंड रोड.. खूप खूप चेहरे वाचायला मिळतील रे तुला.. आणि ते तू वाचले आहेस..कारण वेळोवेळी ते तू तुझ्या उत्तम अभिनयातनं दाखवून दिलं आहेस.. nana मग आताच आमच्या मुंबैबद्दल नाराजी का..? नाना, 'मुंबै हे रहायचं ठिकाण नाही..' हे किती सहजपणे तू बोलून गेलास..! अरे लाखो लोकं इथं राहतात...२४ तास रहाटगाडगं सुरू असतं रे त्यांचं..तुझं एक ठीक आहे..आज तुझ्याकडे चार पैशे आले, छानसं फार्महाऊस बांधलंस.. पण आम्हा लाखो मुंबैकरांनी कुठे रहायच रे.. तूच सांग.. एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे.. खूप चाहता आहे मी तुझा, खूप प्रेम करतो तुझ्यावर..पण नान्या..आमच्या मुंबैला काय नाय बोलायचं..सहन नाही होत ते..! तुझा, तात्या.

वाचन 30909 प्रतिक्रिया 0