मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लार्ज हॅड्रॉन कोलायडर - अर्थात सर्वनाश नव्हे

३_१४ विक्षिप्त अदिती · · काथ्याकूट
आज सकाळी इजाभौंनी माझ्या ज्ञानात भर पाडली, ती ही इथे पहा. आणि वर मला म्हणाले की यावर थोडं जास्त लिही. म्हणून जरा घाईघाईत चार शब्द खरडत आहे. घाई अशासाठी की जर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर जर उद्या सुरू झालो आणि "तेज" बातम्यांप्रमाणे जर आपण सगळे मेलो तर कळलं पाहिजे ना आपल्याला कसे मेलो ते! (हे पण इजाभौंचेच विचार.) मी ही माहिती उचलली, माझ्या दोन मित्रांकडून आणि एक नेहेमीचा मित्र विकीपीडियाकडून. अधिक, परीपूर्ण माहीती तिथे आणि तिकडच्या लिंक्समधून मिळेलच. इंग्रजी वाचायचं नसेल तर हा लेख, अगदीच मोजक्या शब्दात! तर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर म्हणजे काय त्याआधी थोडक्यात हॅड्रॉन म्हणजे काय? अणूच्या केंद्रात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात, ते एक प्रकारचे हॅड्रॉन्सच आहेत. पार्टीकल फिजिक्समधे वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात, त्यात हॅड्रॉन्स, बोसॉन्स (शास्त्रज्ञ एस.एन. बोस यांच्या नावाने), लेप्टॉन्स, क्वार्क्स असे वेगवेगळे कण असतात. आणि त्यांचं एक स्टँडर्ड मॉडेल आहे त्यामुळे अनेक गोष्टी सिद्ध करता येतात. (काय ते मला माहीत नाही, हवं असेल तर वहीत किंवा निरोप पाठवून विचारा, वाचून सांगेन वेळ मिळाला की; सध्या उपरोल्लेखित कारणासाठी घाई आहे.) तर या प्रमाण मॉडेलमधे एक प्रकारचे बोसॉन्स आहेत, हिग्ज बोसॉन्स, त्यांचं अस्तित्व वर्तवण्यात आलं आहे. हे हिग्ज बोसॉन्स अजूनपर्यंत कोणीही "पाहिले" नाही आहेत, पण अनेक अप्रत्यक्ष पुराव्यांवरून त्यांचं अस्तित्व "दिसतं". या लार्ज हॅड्रॉन कोलायडर बनवण्यामागचं मुख्य कारण हे हिग्ज बोसॉन्स "बघणे". या कोलाडरच्या आणि पुढे पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या मनात प्रश्न पैदा केले आहेत. या कोलायडरमधे अतीसूक्ष्म कृष्णविवरं तयार होतील, ती आकारानी वाढत जाऊन सगळ्या गोष्टी एका बिंदूत समाविष्ट होतील (आठवा, अद्वैत सिद्धांत, तसंच काहीसं) आणि अर्थातच आपण सगळे (शनी-मंगळ युती नसतानाही) मरून जाऊ. किंवा आपलं कृष्णविवराच्या आत होईल ते होईल. तर या सगळ्या अफवा आहेत. अशी काही अतीसूक्ष्म कृष्णविवरं तिथे तयार करणार/होणार नाही आहेत. (झाली तर खरोखर सगळी पृथ्वी, कदाचित सूर्यमंडळ एका बिंदूत समाविष्ट होईल.) तर या कोलाडरबद्दल एक रॅप गाणं तयार केलं आहे; वरचा लेख वाचून (पुरेशी) करमणूक झाली नसेल ते गाणं ऐका: http://www.youtube.com/watch?v=j50ZssEojtM

वाचन 19340 प्रतिक्रिया 0