मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बहु भुकेला झालो...

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
१९३०-३२ चा सुमार असेल.. गदगच्या आपल्या राहत्या घरातून एक मुलगा अंगावरील वस्त्रानिशी घरातून पळाला.. संगीत देवतेला 'जोहार मायबाप जोहार.. ' असं म्हणत निघाला..! त्याच्या आईनं त्याला काही भजनं शिकवली होती. गावातल्या कुणा मास्तरांकडून त्याला काही सांगितिक भाकऱ्यांची शिदोरी मिळाली होती. पण तेवढ्यानं त्याचं पोट नव्हतं भरत.. त्यामुळे सोबत ती थोडीशी शिदोरी घेऊन तो महाराचा महार 'जोहार मायबाप जोहार..' असं म्हणत निघाला.. ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, जालंदर... खूप खूप वणबण केली त्या बहू भुकेल्याने... गावोगावचं सांगितिक उष्टं अगदी आवडीनं खाल्लं..जिथे जे काही मिळेल ते वेचलं.. आणि एके दिवशी हा महाराचा महार कुंदगोळला पोहोचला.. तिथे त्याचा 'मायबाप' त्याला भेटला.. त्या मायाबापाच्या दारात उभं राहून त्या महाराने पुन्हा एकदा 'जोहार मायबाप जोहार.. ' अशी करुणा भाकली.. उष्ट्यासाठी पाटी आणली होती..बहू भुकेला होताच तो.. परंतु आता ती भूक शमणार होती.. खुद्द मायबापाच्या घरचं चुलीवरचं गरमागरम सांगितिक अन्न मिळालं त्याला. अगदी पोटभर..! आता आम्हीही त्याच्या गायकीचे बहू भुकेले आहोत. तो आता नाही.. पण त्याच्या कलाश्री बंगल्यातील थोडीशी माती. तीच आम्हाला आता साखर-फुटाणा-बत्ताश्याच्या प्रसादासारखी आहे आणि तीच माती आम्ही अबीरबुक्क्यासारखी कपाळावर आयुष्यभर मिरवणार आहोत... -- तात्या.

वाचन 13859 प्रतिक्रिया 0