मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काक मृत्यू

मेघनाद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल. जमीन म्हणजे काय तर रेल्वेच्या रूळांच्या मधील जागा. तिथे न धड त्याला पाणी मिळत होतं ना शरीर सावरायला जागा. त्यातच हि अपघाताची बातमी त्याच्या सर्व जातीबांधवांपर्यंत पोहोचली आणि त्या जागेवर हितचिंतकांचे थवेच्या थवे उतरू लागले. त्यांच्या आपापसातील कवकवाटाने भायखळा स्थानकाचा तो परिसर सकाळीच दणदणून निघाला. एव्हाना स्थानकातील माणसांचे लक्ष देखील ह्या प्रसंगाकडे वेधले गेले होते. त्याचे काही मित्र त्याच्या बाजूला बसून त्याची उठण्यासाठी चालू असलेली केविलवाणी धडपड पाहत हो, तर त्याचे काही मित्र वरील विदुयत तारेवर बसून खाली चालू असलेल्या प्रसंगाचे अवलोकन करत होते. स्थानकातील काही व्यक्ती देखील ह्या सर्व प्रसंगाचे आत्मियतेने निरीक्षण करीत होत्या. बराच वेळ उठण्यासाठी प्रयत्न करणारा तो कावळा हळूहळू थकायला लागला होता, तसेच त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या त्याच्या मित्रांचे विचार देखील बदलू लागले होते. आतापर्यंत त्याला साथ देणाऱ्या काही मित्रांपैकी काही जण आता त्याला चोचीने टोचू लागले होते. त्यामुळे वरच्या बघ्या कावळ्यांचा परत कोलाहल सुरु झाला होता. हळू हळू त्याच्या बद्दलची त्याच्या मित्रांच्या मनात असलेली सहनुभूतीची भावना जाऊन ते आता खुनशी होऊ लागले होते आणि स्थानकातील उभ्या असलेल्या व्यक्ती सहनुभूतीखातर त्रास देणाऱ्या कावळ्यांना लांबुनच हाकवण्याचा प्रयत्न करीत होत्या. आतापर्यंत एक-दोन त्रास देणाऱ्या कावळ्यांमध्ये अजून ४-५ जणांची भर पडली होती व त्या सर्वांनी मिळून त्या हतबल झालेल्या कावळ्याला अक्षरशः जिवंतच खायला सुरुवात केली होती. इकडे स्थानकातील व्यक्ती देखील हतबल होऊन हा प्रकार बघत होत्या. आणि शेवटी तो क्षण आलाच! भायखळ्याच्या १ नंबर स्थानकात ७ वाजून ५८ मिनिटाची आसनगाव ला जाणारी धीमी लोकल येउन उभी राहिली तशी बघ्यांची चुळबुळ आणि तारेवरील कावळ्यांची कावकाव देखील वाढली. लोकल निघाली आणि तारेवरील आणि रूळावरील बरेच कावळे माघार घेऊन उडू लागले. आता रुळात तो जर्जर झालेला असहाय्य कावळा एकटाच पडला होता. गाडी जवळ येताच वाऱ्याच्या झोतामुळे तो कावळा रुळातून वर खेचला गेला आणि त्यासरशी त्याचा पंख व त्याची मान गाडीच्या दणकट लोखंडी चाकाखाली चिरडलि गेली. तारेवर परत तोच जोरदार कोलाहल सुरु झाला, काही कावळे दिशाहीन झाल्यासारखे गरागर वर्तुळाकार फिरू लागले. ३ नंबर स्थानकात उभ्या असलेल्या व्यक्तींनी देखील हा सर्व प्रकार पाहून धसका घेतला होता. “ अरे यार बहुत बुरा हुआ”, “ट्रयक के बाहर होता तो बचता था बेचारा” अशी वाक्य देखील काही जणं बोलून गेले. बहुतेक बऱ्याच जणांना हा प्रसंग मानवी जीवनाशी मिळताजुळता वाटला असावा, निदान मला तरी वाटला. हो, मी त्या ३ नंबर वर उभ्या असलेल्या बघ्या व्यक्तींपैकी एक होतो. हि सर्व घटना तंतोतंत खरी असून सोमवार सकाळी भायखळा स्थानकात घडली होती. ती तर जनावर आहेत, कधी कधी काही प्रसंगांत माणूस सुद्धा बर्यापैकी असाच टोचून खाणाऱ्या कावळ्यांप्रमाणे वागतो आणि म्हणूनच हा प्रसंग आपल्या मनाला चटका लाऊन जातो. मुद्दामच हा आखो देखा हाल (आणि त्या कावळ्याचे झालेले हाल) मि.पा वर शेअर करतो आहे….

वाचन 8239 प्रतिक्रिया 0