मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साक्षात्कार

सस्नेह · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : साक्षात्कार या शब्दातून कोणताही दैवी अगर परमेश्वरी साक्षात्कार या लेखात अभिप्रेत नाही. a समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... मी जात आहे..की येत आहे ? ...आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. धारेला लागल्यावर किनारा दूर जावा, तसे, आतापर्यंत जगण्याचे संदर्भकक्ष असलेले सगळे आधार हातातून निसटून चालले आहेत. कुठेही प्रकाशाचा एखादा किरण दिसत नाही. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय... मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय... ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ? ..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ? …चारी बाजूनी कुणीतरी पाश आवळत चाललं आहे..अन कोळ्याच्या जाळ्यातल्या माशीसारखी माझी अवस्था झाली आहे. जितकी धडपड सुटकेसाठी करावी तितका गुंता अधिकच वाढत आहे... माझी वाट चुकली आहे का ? .. आणि पुन्हा तीच वळणं आली तर दुसरी वाट निवडण्याचं स्वातंत्र्य तरी मला आहे का ? किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे... ....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ? कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ? कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ...अगदी अणुरेणूंनासुद्धा परिचित आहे तो .., पण स्मृतीच्या कडेकडेवरून डोकावूनसुद्धा ते नाव काही आठवणीत येत नाही आत्ता ! फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ? अणुरेणूंच्या अंतरंगात सामावलेला..प्रत्येक इच्छा अन आकांक्षा यांचा केद्रबिंदू असणारा..खोल अंतर्मनाच्या तळाशी वसणारा , निद्रेच्या माध्यमातून क्रयशक्ती अन उर्जा प्रदान करणारा, चिन्मय प्रेम अन अक्षय आनंद यांचे अधिष्ठान असा तो तूच का ? अन इथे कसा अवचित समोर आलास ? ...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो.. ..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...! अन त्याच्या आधी ? आणि याच्यानंतर ? तू नव्हतास ..नसशील ? छे ! शक्य वाटत नाही.. हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..! या निरुंद बोगद्याच्या अखेरीस लपला आहेस, की मीच बोगद्यात स्वत:ला गाडून घेतले आहे ? स्वत:भोवती बंधनाच्या भिंती उभ्या केल्या आहेत ? ..आणि तुझ्यासाठी का त्या अभेद्य आहेत ? पण मग मागे कधी कधी जीवनप्रवाहात भोवरा बनून आलेल्या एखाद्या निराश क्षणी मला उराशी धरून नवी आशा, उर्जा फुंकलीस ती कशी ?..जीवनाशी झुंजायची शक्ती संपली असलेल्या वेळी पुन्हा पंचप्राण नवनवोन्मेषशाली विजीगीषेने भरून टाकलेस ते कसे ? ..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा विजेसारख्या अवतरणाऱ्या अंत:स्फूर्तीच्या रुपाने तूच ना नवा मार्ग सुचवलास ? प्रतिकूलतेच्या झंजावातात, ओहोटीबरोबर कणाकणाने खचणाऱ्या वाळूसारख्या माझ्या धैर्याला नवीन आशेच्या भरतीने व्यापून टाकणारा अर्णव तूच होतास ना ? ..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे. ...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे.. ..कधी निर्णयस्वातंत्र्याच्या अभिमानानं माझं आभाळ झालं तर कधी निर्णयप्रसंगाच्या अगतिक अपरिहार्यतेनं मी पाताळ गाठलं... पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने... निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले. होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित.. ..नजरेसमोर नसलास तरी तुझी साथ कधी सुटली नव्हती. पण कधी कधी खुणावणाऱ्या प्रलोभनांना ओढाळपणे भुलून तुझी साथ दुर्लक्षून अनोळखी रस्ते पकडले. ..भलत्या उर्मीने व्यापले अन अवती भवती वावरणाऱ्या तुझ्याच अविष्कारांना नाकारले.. या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ? ..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...! ...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ? पण खोल तळाशी एक खात्री आहे रे.. रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे ! आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं.. आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे. अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी ! अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ? पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! शरण आहे तुला ..ये असा जवळ ये... भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने ! जळोत ती कुशंकांची जळमटे ...झडो मतिचा लुळेपणा...! माझ्या मृतप्राय झालेल्या आशेला फिरून संजीवनी दे ये...! ये माझ्या अणुरेणूमध्ये फिरून तीच दीप्तिमान जीवनज्योत जागृत करण्यासाठी... पुन्हा एकदा माझे रोम रोम जीवनलालसेच्या अमृताने उचंबळून येऊदे ! .....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले ! ************************************************************************************************ (चित्र आंजावरुन साभार) ************************************************************************************************

वाचन 5383 प्रतिक्रिया 0