मिपा संपादकीय - आरोग्ये वसते लक्ष्मी!
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
[प्रस्तावना - मिसळपावच्या ईस्ट-कोस्ट कट्ट्याच्यावेळी आमची 'अंमळ सुधारलेली तब्बेत' बघून प्रा.डॉ. दिलीप बिरुटे ह्यांनी त्यांच्या प्रेमळ टीकेची डबल बॅरल आमच्या पोटाला टोचली आणि आम्ही खडबडून जागे झालो! काहीतरी करायलाच हवे ह्या तीव्र इच्छेने व्यायाम सुरु केला दीड किलो वजन कमी करुन आरोग्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आणि मग ह्या लेखाला हात घातला. प्रा.डॉं.चा मी आभारी आहे.]
आरोग्ये वसते लक्ष्मी!
आरोग्याच्या बचत खात्यात तुमची नियमितपणे थोडी-थोडी शिल्लक टाकणे चालू आहे की नाही? का सगळा कारभार निसर्गदत्त क्रेडिट कार्डावरच चालू आहे?
पूर्वी सर्वसाधारणपणे पन्नाशी-साठीत, वाकणार्या पाठी आणि सुटलेली पोटे असत असे ऐकून आहे, काही वर्षांपूर्वी चाळिशीत आणि आता अगदी अलीकडे पंचविशी-तिशीतच पाठी वाकायला आणि पोटे सुटायला लागलेली पाहून धोक्याची घंटा डोक्यात ठणाणा वाजते किंवा निदान वाजायला हवी! बैठ्या जीवनशैलीमुळे आपण दुखणी ओढवून घेत आहोत हे सत्य आता जागतिक आहे. असे असले तरी ह्या लेखापुरता मी आपल्या भारतीय मातीचा संदर्भ देईन कारण एकतर मला जगातल्या इतर ठिकाणांपेक्षा भारतीय जीवनशैलीबद्दल जराशी जास्त माहिती आहे आणि तिथल्या प्रश्नांशी मी स्वतःला जास्त नीट जोडू शकतो असे वाटते. तसेच पाश्चात्य जग आता ह्या प्रश्नांच्या एका वेगळ्याच टप्प्यावरती आहे. आपल्या लोकांनी त्या मार्गावरुन चालायला सुरुवात केलेली आहे. पुढे जाताजाता खड्ड्यांबाबत सावध होता आले तर ते आपल्याला फायद्याचे ठरेल.
मैदानी खेळ, चालणे, सायकल चालवणे एकंदर शारीरिक हालचाल भरपूर असण्याच्या काळात सर्वसाधारणपणे आरोग्य बरे असे. जसजशी आपली तांत्रिक प्रगती होत गेली तसतशी कामाच्या स्वरुपात, प्रवासाच्या माध्यमात बदल होत गेले. सायकलींची जागा स्वयंचलित दुचाक्या/चारचाक्यांनी घेतली. आता तर टाटांच्या नॅनोमुळे आणि तत्सम छोटेखानी गाड्यांमुळे रस्तोरस्ती गाड्याचगाड्या असतील की काय अशी परिस्थिती येऊ घातली आहे! छोट्याशा अंतराकरताही वेळेच्या अभावाने म्हणा, गाडीची चटक लागल्याने म्हणा किंवा आळसाने म्हणा चालत जाऊन काम करण्याचे लोक टाळू लागले.
हे सर्व बदल १९९० नंतरच्या दशकात फार झपाट्याने होत गेले. सर्वच क्षेत्रातल्या नवीन नोकर्यांच्या उपलब्धतेमुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ओळखीमुळे, वापरामुळे लोकांमधे एकप्रकारची संपन्नता आली, सुबत्ता आली. १९६०-७० च्या काळात जे लोक आईवडील झाले त्यांच्यापेक्षा ह्या नवीन पिढीची मानसिकता निराळी घडली. भरपूर पैसा मिळवावा आणि तो आपल्याला हवा तसा खर्च करावा, सुखांचा लाभ घ्यावा असे वाटणे अर्थातच गैर म्हणता येणार नाही कारण आपले आईबाप ज्या प्रकारे काटकसर करुन संसार चालवीत होते आणि अनेक सुविधा ह्या परवडत असून लांब ठेवीत होते त्यासारखे वागणे गरजेचे नाही. आम्ही पैसा मिळवू आणि आमच्या बरोबर आमच्या मुलाबाळांनी आणि जिथे शक्य आहे तिथे आई-बापांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा असा प्रकार दिसतो.
ह्या सगळ्या विस्तारात कामाच्या आणि रहाण्याच्या जागातले अंतर वाढत गेले. विभक्त कुटुंबे तयार होत गेली. खाजगी नोकरीत, सॉफ्टवेअर क्षेत्रात, आय्.टी. क्षेत्रात कामाचे तास आणि ताण ह्यात वाढ झाली. सरकारी नोकरीतही काही खाती ही अति कर्मचारी संख्येमुळे सुस्तावलेली आणि पोलिसांसारखी काही अति ताणामुळे हृदयविकाराची शिकार झालेली अशी दुरवस्था दिसते. त्या अनुषंगाने घरी काम नेणे किंवा उशिरापर्यंत कचेरीतच थांबून काम निपटूनच घरी जाणे वाढू लागले. हळूहळू लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि वेळात कचेरीतल्या कामाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. पेजर्स, मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स ह्यामुळे ऑफिस आणि घर ह्यातली दरी कमीकमी होत चालली. रात्रीचे जेवण घेताघेता मुलाबाळांबरोबर न बोलता लोक मोबाईल कानाला लावून मीटिंग करु लागले! आतातर वेबेक्स सारख्या तंत्रामुळे बर्याच मीटिंग्ज, प्रेझेंटेशन्सही घरबसल्या किंवा ऑफिसबसल्या होऊ शकतात! शिवाय जगभरात ठिकठिकाणी कचेर्या असल्याने वेळेचेही काही नियंत्रण नाही अमेरिकेतल्या सकाळच्या १० वाजता (त्यातही पुन्हा पूर्व/पश्चिम किनार्यावर तीन तासाचा फरक!) भारतात संध्याकाळचे ७.३०/८.३० आणि कोरियात रात्रीचे ११ किंवा ह्याच्या उलट अशी मीटींग होते. किंवा तुम्ही सगळी कामे संपवून संध्याकाळी ऑफिसमधून निघावे म्हणता तर जगाच्या दुसर्या टोकाचे तुमचे दुसरे ऑफिस नुकतेच सुरु होऊन तिकडून ई-मेल्स सुरु झालेल्या असतात! ह्याने तुमच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याउठण्याच्या वेळांवर प्रतिकूल परिणाम झाले. त्याचा परिपाक वजन वाढण्यात आणि एकूण आरोग्यावर होऊ लागला. म्हणजे काय, तर २४ तास काम तुमचा पिच्छा सोडत नाही. तुम्हालाच दिवसभरातल्या तुमच्या सीमारेषा आखून घेणे आणि योग्य वेळी काम थांबवणे अत्यंत जरुरीचे ठरते.
आजच्या कामाच्या जगात वाढलेले ताणतणाव कमी करण्यासाठी काम कमी करणे हाही उपाय होऊ शकत नाही कारण ते तुमच्या एकट्यावर अवलंबून नसते तर एकूण आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला तसे करु देत नाही. तुमच्याकडून सातत्याने आणि एखाद्या यंत्रासारखे काम होत रहावे अशी अपेक्षा करणारी ही परिस्थिती आहे पण उपाय तर काढायलाच हवा, अशा वेळी आपल्या २४ तासातली सरासरी ३० ते ४५मिनिटे आपल्याच आरोग्यासाठी देणे ह्या कल्पनेपर्यंत आपण येतो.
"काय करावे हो वेळच नसतो!" अशी सबब सांगणार्या लोकांसाठी आपल्या माहीतीतले एक उदाहरण देण्याचा मोह आवरत नाहीये.
अनिल अंबानी ह्या 'अनिल धिरुभाई अंबानी ग्रुपच्या' सर्वेसर्वाचे वजन कोणे एकेकाळी तब्बल ११५किलो होते! बोर्डरुम मीटिंगमधे वजनावरुन त्याची चेष्टा झाली. ही खिल्ली जिव्हारी लागल्यानंतर त्याने जिद्दीने वजन आटोक्यात तर आणलेच पण तो आज एक फिटनेस एक्सपर्ट गणला जातो! अनिल हा एक मॅरॅथॉन रनर आहे. दीड लाख कोटीच्या कंपनीचे महाकाय जहाज हाकणार्या, जगातल्या ६ व्या क्रमांकाची श्रीमंती असलेल्या अनिलचे २४ तास किती कामाचे असतील ह्याची कल्पना करायला ज्योतिषाची गरज नाही! असे असतानाही तो जर वेळ काढू शकतो तर आपल्याला का शक्य नाही?
व्यायाम न केल्याने काय काय होते हे आता सर्वश्रुतच आहे त्यावर जास्त टिप्पणीची गरज नसावी. तरीही काही भयावह आकडेवारी देऊ इच्छितो.
२०२५ पर्यंत भारत ही ऑलिंपिक पदकांची रास ओतणारी महासत्ता असेल की नाही माहीत नाही पण मधुमेही लोकांची सर्वात मोठी फॅक्टरी असणार आहे हे नक्की! आपल्या देशातले ५ कोटीपेक्षा जास्त लोक मधुमेही असतील! म्हणजे दर ५ -६ माणसांमागे एक! शरीराच्या प्रत्येक अवयवावर घातक परिणाम करु शकणारा हा एक सायलेंट किलर आहे! ह्याहूनही वाईट म्हणजे शहरी भागातले ३०% आणि ग्रामीण भारतातले ५०% डायबेटिक लोक हे तपासणीच करुन घेत नाहीत किंवा त्यांना कल्पनाच नसते की त्यांना मधुमेह आहे. म्हणजे प्रत्यक्ष मधुमेहींचे प्रमाण हे दिसते त्यापेक्षा खूपच जास्त असू शकते. बरे यातही अनेक प्रकारचे मधुमेह आहेत टाईप १, टाईप २ इ. आणि ते अतिशय लहान वयात आढळून यायला सुरुवात झाली आहे.
वाढते हृदयविकार, स्पाँडेलायसिस सारखे चिकट आणि बर्याचवेळा आयुष्यभरासाठी 'पाठीमागे' लागणारे आजार, आणि तितकेच भयानक मानसिक विकार हे अगदी हळूहळू चोरपावलांनी आपली शिकार करतात. वरचेवर अतिशय तळकट, तेलकट खाणे, अति गोड खाडे, नियमितपणे रात्री उशिरा जेवणे आणि मुख्य म्हणजे व्यायामाचा अभाव अशा चतु:सूत्रीवर आधारलेली दिनचर्या मधुमेहाला आवडते घर प्राप्त करुन देते!
व्यायामाच्या अभावाने फक्त शरीरच कमकुवत होते का? नाही, मनही अधू होते. साचत जाणार्या मानसिक ताणाने होणारे परिणाम अनेक आहेत. पर्सिटंटच्या सातव्या आस्मानातून उडी मारुन जीव दिलेला २५ वर्षांचा संदीप शेळके हे अशा प्रकारच्या ताणातून जडलेल्या मनोविकाराचे एक प्रातिनिधिक उदाहरण ठरावे. कामाच्या ताणाचे म्हणा, वैयक्तिक आयुष्यातल्या ताणाचे म्हणा किंवा दोन्हीचे म्हणा नीट व्यवस्थापन न करता आल्याने एक बुद्धिमान जीव प्राणास मुकला ही विषण्ण करणारी घटना आहे. ह्या घटनेत ताण कुशलतेने हाताळण्याकरता वेळेचे व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच, किंबहुना थोडे जास्तच, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे असे मी म्हणेन.
कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्या ह्याकरता काय करु शकतात? एकतर अनुभवी मार्गदर्शकांशी सल्लामसलत घडवून आणणे (मेंटॉरिंग). त्यांच्या अनुभवातून नवोदितांना बरेच शिकता येते. हे बर्याच कंपन्या करतातही.
सध्याचा जमाना हा पैशाचा झालेला असल्यामुळे लोकांना पैशाची भाषा जरा जास्त चटकन समजते. त्यामुळे कंपन्यांमधे फिटनेस इंसेंटिव अशी काही नवीन कल्पना राबविता येईल का? असा एक विचार आला. दर महिन्याला कर्मचार्यांची फिटनेस टेस्ट घ्यायची. त्यात कशाचा अंतर्भाव व्हावा हे डॉक्टरांशी, फिटनेस एक्सपर्टशी बोलून ठरवता येईल, आणि जे कोणी कर्मचारी त्या फिटनेस टेस्ट मधे उत्तीर्ण होतील त्यांना त्या महिन्याकरिता तो इंसेंटिव द्यायचा. इंसेंटिव हवा असेल तर फिटनेस राखा! म्हणजे निदान मिळणार्या पैशाकरता तरी व्यायाम घडेल आणि त्याचा पॉझिटिव साईड इफेक्ट म्हणजे तब्बेत नीट राहील!
आपण भरपूर कष्ट करुन पैसा मिळवतो तो मूलभूत गरजांबरोबरच वेगवेगळ्या सोयी, सुखे मिळावीत म्हणून. अशा वेळी केवळ अनारोग्यामुळे तुम्ही त्या सोयींचा, सुखांचा लाभ घेण्यापासून वंचित रहात असाल आणि उपचारांवर अमाप पैसा खर्च करुन कुठल्याशा हॉस्पिटलची समृद्धी वाढवीत असाल तर ती एक दु:खाची आणि लांछनास्पद गोष्ट आहे असे मी म्हणेन!
"आताच काय गरज आहे? अजून मी फक्त २५ वर्षांचा आहे. चाळीशीत बघू!" हा विचार बरेच जण करतात. पण (गद्धे)पंचविशीत नसलेली व्यायामाची सवय एकाएकी चाळीशीत लागेल हा भ्रम असतो हे 'चाळिशी' लागल्यावरच कळते! "घर शाकारण्याची वेळ ही पावसाळा सुरु झाल्यानंतर नसून उन्हाळ्यातच असते" अशी जी म्हण आहे ती येथे तंतोतंत लागू पडते.
ह्यातला अजून एक फार फार गंभीर परिणाम असलेला धोका म्हणजे मध्यमवयातले मृत्यू. ३५ ते ४५ अशा वयात घरातल्या कर्त्या पुरुषाचा/स्त्रीचा मृत्यू आणि घरात जर छोटी मुले असली तर त्या घराची अवस्था फार बिकट होते. हे आपल्या बाबतीत कशाला होईल अशा गोड गैरसमजाने आपण गाफिल असतो.
'माझा साक्षात्कारी हृदयरोग' ह्या पुस्तकातला अभय बंगांचा एक अनुभव इथे द्यावासा वाटतो. हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतरच्या काळात प्रवास करीत असताना भारतातल्याच कुठल्याशा विमानतळावर त्यांना एक साठीतली व्यक्ती दिसते. त्याची उत्तम प्रकृती आणि मुख्यतः अतिशय सपाट पोट बघून ते इतके भारावून जातात की धावत जाऊन, काही ओळखदेख नसलेल्या, त्या माणसाला मिठी मारतात आणि त्याचे अभिनंदन करतात! त्याच पुस्तकात ते पुढे असेही म्हणतात. माझ्याकडे बघितल्या नंतर जेव्हा माझ्या मित्रांना असे वाटते की ह्याला काही चांगले खायला मिळत नाही की काय? तेव्हा माझी तब्बेत अतिशय उत्तम आहे असे समजा! ह्यातला विनोदाचा आणि अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी मर्म समजणे महत्त्वाचे.
मैदानी खेळ, सायकलिंग, पोहोणे, पळणे, झपाट्याने चालणे ह्यासारखे व्यायाम ज्याच्या त्याच्या शारीरीक कुवतीप्रमाणे आणि सोयींच्या उपलब्धतेप्रमाणे प्रत्येकजण करु शकतो. थोडा मनोनिग्रह, तब्बेतीबाबतची कळकळ आणि नियमितपणा ह्या त्रिसूत्रीवर कोणीही व्यक्ती हे करु शकते नव्हे एवढे करायलाच हवे! शिवाय एवढे करुनही भागत नाही चाळिशीतल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्वतःची पूर्ण वैद्यकीय तपासणी दरवर्षी करुन घेतली पाहीजे. 'सकाळ' समूहाच्या प्रतापराव पवारांचा एक उद्बोधक अनुभव. प्रतापराव हे व्यायामाची अतिशय आवड असलेले आहेत हे बर्याच जणांना माहीत असेल. नियमित योगासने, प्राणायाम, बॅडमिंटन खेळणे असे करणार्या ह्या उंच्यापुर्या गृहस्थाला ते अग्नेयआशियात कामाकरिता गेलेले असताना अस्वस्थ वाटू लागले. काम संपवून भारतात परत आले. चारच दिवसांनी पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने सहज म्हणून त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी काही जुजबी तपासण्यानंतर ह्यांना थेट ऑपरेशन थिएटर मधे नेले! त्यांना हार्टऍटॅक आलेला होता. आणि दोन रक्तवाहिन्या मोठ्या प्रमाणावर बंद होत आलेल्या होत्या! तातडीच्या शत्रक्रियेनंतर ते सुधारले. त्यांच्यावर अशी शत्रक्रिया झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले आणि काही लोक म्हणाले सुद्धा की मग एवढा नियमित व्यायाम केलास त्याचा काय फायदा! ह्या प्रसंगावर प्रतापरावांची टिप्पणी मोठी मार्मिक आहे. ते म्हणतात "मलाही एक क्षणभर असे वाटले की मग एवढा नियमित व्यायाम करुन काय फायदा झाला? पण नंतर शांतपणे विचार केल्यावर मला असे लक्षात आले की हार्टऍटॅक कोणत्या कारणाने आला ते समजून दूर करता येऊ शकेल पण एवढ्या नियमित व्यायामाने माझ्या शरीराला आणि हृदयाला त्या बिकट परिस्थितीतून तगून जाण्याएवढे सशक्त बनवले होते अन्यथा मी कधीच मृत्यूमुखी पडलो असतो! तेव्हा अपघात हे सांगता येत नाहीत पण व्यायामाला पर्याय नाही!"
आपल्या गरजा नेमक्या काय आहेत? मुक्त अर्थव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वतंत्र विचारांची कास धरताना पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण तर होत नाहीये ना? परंपरेने चालत आलेले आपल्या जीवनशैलीतले दोष कोणते आहेत? आरोग्याच्या दृष्टीने आपल्या समाजव्यवस्थेमधे कालानुरुप काय सुधारणा व्यायला हव्या आहेत? वाढत जाणार्या सरासरी आयुर्मानाचे आणि वृद्धांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्याचा दृष्टीने आपण कोणत्या प्रकारच्या योजनांवर विचार करतो आहोत? लोकसंख्येच्या नियंत्रणाबाबत आपली धोरणे काय आहेत? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा विचार आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने करायचा आहे.
इथूनपुढच्या काळात उत्तम निरोगी प्रकृती हा पैशापेक्षाही फार मोठा ऍसेट ठरणार आहे! देशाच्या सर्वांगिण उन्नतीचा मार्ग हा गीतेच्या अभ्यासापेक्षाही अधिक फुटबॉलच्या मैदानातून जातो असे सांगणारा योद्धा संन्यासी विवेकानंद आणि आयुष्यभर सूर्यनमस्काराची कास धरुन अकरा मारुतींची स्थापना करणारे शक्तिदेवतेचे उपासक समर्थ रामदास हे दोघे आपल्याला लाभले हे आपले भाग्यच. त्यांच्या शिकवणुकीचे अंशतः तरी पालन करणे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुखी आणि संपन्न आयुष्याचा राजरस्ता दाखवणे हे प्रत्येक सुजाण आणि शहाण्या भारतीयाचे कर्तव्य आहे असे मला वाटते!
पाहुणा संपादक : चतुरंग.
वाचन
26952
प्रतिक्रिया
0