ॠषीकुमाराचे प्रश्र्ण
एका माळरानावर एक हरीणाची जोडी निवांतपणे चरत होते. अतिशय सुंदर गोजीरवाणी जोडी होती ती. दोघांनीही नुकतेच यौवनात पदार्पण केले होते. सहजीवनाचा हा त्यांचा पहिलावहीला अनुभव होता. तारुण्याचा उन्मादाच्या शिखरावर होते ते दोघेजण. एकमेकांच्या तोंडावर तोंड घासत. एकमेकांना ढुशा मारत त्यांचे प्रणयाराधान सुरु होते. नुकत्याच झालेल्या पावसा मुळे मोठे छान लुसलिशीत गवत उगवलेले होते. नविनच उगवलेल्या या कोवळ्या गवता मुळे त्यांना पोट भर खायला मिळत होते. त्यामुळे खुश झालेली जोडी इकडे तिकडे हुंदडत फिरत गवताचा आस्वाद घेत होती. त्यांच्या गवतात फिरण्या मुळे गवतातले किडे पण उडत होते. त्या उडणार्या किड्यांना मटकवण्या साठी काही चिमण्या त्याच्या भोवताली घिरट्या घालत होत्या. त्या चिमण्यांशी खेळत बागडत मधेच गवतात लोळत ते दोघे एकमेकांशी खेळत होते. त्यांच्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणांचा अनुभव घेत ते तॄप्त होत होते.
चिमण्यांना पण नुकतीच पिल्ले झाली होती. त्या पिल्लांसाठी चिमणचारा गोळा करण्या साठी त्यांची लगबग चालली होती. हरीणांची जोडी माळरानात घुसल्यावर त्या लगबगीने त्यांच्या भोवती घिरट्या घालू लागल्या आणि त्यांची पण चंगळ सुरु झाली. भराभर उडणारे किडे पकडुन त्या आपल्या पिल्लांना भरवत होत्या. पिल्लांचे पोट भरल्यावरही काही किडे त्यांनी जास्त पकडुन ठेवले. नंतर कधीतरी खाण्यासाठी. हरीणांचा दंगा, चिमण्यांच्या चिवचिवाट, अल्हाददायक हवा यामुळे वातावरण एकदम प्रसन्न बनले होते.
एक ॠषीकुमार दुर एका झाडाखाली बसुन हे सगळे पहात होता. त्याच्या आचार्यांनी नुकत्याच शिकवलेल्या काही नव्या श्लोकांचे तो मनन करत होता. आजुबाजुच्या वातावरणामुळे त्याचे मनही प्रसन्न झाले होते. हरीणांची प्रणयक्रिडा, चिमण्यांची लगबग तो मुग्ध होउन पहात होता. फारच रम्य संध्याकाळ होती ती.
त्या कुमाराला काही माकडांचे आवाज ऐकु आले आणि तो सावध झाला. सतत जंगलात राहिल्या मुळे त्याला प्राण्यांची बोली अवगत होती. त्याला जाणवले आजुबाजुला काहीतरी धोका आहे आणि तो चटकन झाडावर चढुन बसला. झाडावर गेल्यावरही त्याचे हरीणांच्या जोडीकडले लक्ष कमी झाले नव्हते.
इतक्यात एका हरणाचा पाय त्या किड्यांच्या घरट्यावर पडला आणि त्यांचे घरटे मोडुन गेले. नुकतीच त्या किड्यांनी अंडी घातली होती. सगळी अंडी फुटुन गेली. पण हरीणाला याची कल्पना सुध्दा नव्हती तो मस्त पैकी त्याच्या धुंदीत फिरत होता. पण त्या किड्यांमधे मात्र हाहाक्कार उडाला होता. सगळे किडे सैरभैर आणि हवालदील झाले होते. किड्यांचा राजा हरीणांच्या त्या जोडीवर भयंकर संतापला आणि तो उडत उडत हरिणांकडे गेला आणि त्यांना म्हणाला "दुष्टांनो तुमच्या उन्मादा मुळे आमचे घरटे तुटले. हजारो अंडी फुटुन गेली. अनेक किडे तुमच्या मुळे चिमण्यांची शिकार झाले. गवतावर तुम्ही लो़ळलात तेव्हा बरेच जण तुमच्या अंगा खाली चिरडले गेले. आमची सगळी वस्तीच तुम्ही उध्वस्त करुन टाकलीत. हे दुष्टांनो तुमच्यावरही काळ अशीच झडप घालेल. मला जे दु:ख तुम्ही दिलेत त्याच दु:खाच्या आगीत तुम्ही देखील होरपळाल." हे वाक्य पूर्णव्हायच्या अधिच एका चिमणीने किड्यांच्या राजावर झडप घातली आणि त्याला चोचीत पकडुन घेउन गेली. हरणांना यातले काहीच समजले नाही. त्यांना हे ही समजले नाही की मरता मरता किड्यांच्या राजाने त्यांना शाप दिला. झाडावर चढुन बसलेल्या ॠषीकुमाराला प्राण्यांच्या भाषा येत असल्या मुळे मात्र सगळे समजले.
त्याचे लक्ष सहज झाडाखाली गेले. तो मगाशी जिथे बसला होता तिथे आता एक सिंहीण दबा धरुन उभी होती. तिचे लक्ष हरणांच्या जोडी कडेच होते. माकडांचा कलकलाट वाढला होता. पण हरणांचे मात्र त्या कडे अजिबात लक्ष नव्हते. सिंहीणीने अचानक झडप घालुन नर हरीण पकडले आणि त्याच्या मानेत आपले सुळे रुतवले. हरीणी जीवाच्या भीतीने दुर पळुन गेली. एकाक्षणात सगळ्या रंगाचा बेरंग झाला होता. भीतीने आणि दु:खाने हरीणी सैरभैर झाली होती. त्यातच तिच्या तोंडुन शापवाणी बाहेर पडली. "रती मग्न असलेल्या आमची तु कायमची ताटातुट केलीस. दुष्टे तुझे तळपट होइल. आयुष्यात तुला या पेक्षा भयंकर दु़:ख भोगावे लागेल" असे म्हणुन आसवे गाळात ती तिकडुन निघुन गेली.
चिमण्या दुसरी कडे चारा शोधण्या साठी उडाल्या. जिवंत राहिलेले किडे एकत्र येउन परत घर बांधायला लागले.
सिंहीणीला मात्र हरीणीच्या दु:खाची किंवा बाकी सगळ्या घटनांची काहीसुध्दा जाणीव नव्हती. उलट तिला फार आनंद झाला होता. बर्याच दिवसंनी तिला शिकार मिळाली होती. ते हरीण ओढत ओढत तिने आपल्या गुहेपाशी आणले आणि आपल्या चार दिवस उपाशी असलेल्या बछड्यांना बोलावले. सगळे बछडे त्या हरीणावर तुटुन पडले आणि सिंहीण मोठ्या मायेने त्या पिलांच्या अंगावरुन जीभ फिरवत त्यांना स्वच्छ करु लागली.
ॠषीकुमार हे सगळे पाहात होता. तो सावध पणे झाडावरुन खाली उतरला. त्याने प्रथम माकडांचे आभार मानले. कारण माकडे ओरडली नसती तर हरणाच्या ऐवजी आज सिंहाचे बछडे त्यालाच खात असते. या घटनेव विचार करताना मग त्याला काही प्रश्र्ण पडले
हरणाचे काही चुकले होते का?
किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?
तो का वाचला?
सिंहीणीचे आता काय होईल?
वाचक हो या सगळ्या प्रश्र्णांमुळे ॠषी कुमार अस्वस्थ झाला होता फार विचार केल्या नंतरही त्याला या प्रश्र्णांची समाधानकारक उत्तरे सपडली नाहीत.
तुम्ही त्याला उत्तर शोधायला मदत करु शकता का?
समजा असाच काहीसा प्रसंग आपल्या आजुबाजुच्या माणसांसोबत घडला म्हणजे घटना थोडीफार बदलुन प्राण्यांच्या जागी माणसे असती तर आपले वरील प्रश्र्णांची उत्तरे बदलली असती का?
वाचन
8269
प्रतिक्रिया
0