मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोबी पराठा.

स्पंदना · · अन्न हे पूर्णब्रह्म
लहाणपणी "कोबी" अन त्याची भाजी हे एक माझ्या नाकासाठी छळवादी प्रकार होते. का कुणास ठाउक पण कोबी काही माझी लहाणपणाच्या आठवणीतली,"रम्य, चविष्ट,तों.पा.सु." भाजी नाही. मग वयाने मोठ व्हाव लागल, अन पानात पडेल ते मुकाट खाण हे रितीला धरुन मान्य कराव लागल. तरीही, कोबी असला की मी दही-साखर, तिळकुट, तोंडी लावणे, यावर जास्त भर देत शक्यतो कोबी शेवटपर्यंत राखुन ठेवत असे. मग झाल लग्न; अन रोजच्या," आज काय करायच?" या प्रश्नाबरोबर टिफीन फ्रेंडली भाजी म्हणुन मला या"गड्ड्याला" शरण जावं लागल. पण हार मानतानाही ती अशी पुर्णपणे मानली तर; मेरी तो नाक कट जायेगी। म्हणुन मग त्यातुन अनेक पळवाटा शोधायच काम अगदी,"जनहित मे जारी" या तत्वावर मी सुरु केलं. अन त्यातुनच वेगळ्या प्रकारच्या पराठ्याचा जन्म झाला. बघा! तुम्ही लोकं ना? बोलताच फार बाई! पण आज मी काहीही जास्त बोलणार नाही आहे हं मंडळी. आज निव्वळ पाककृती!! तर घ्या साहित्य:-/ अर्धा कोबी १ टीस्पून हळद १ टीस्पून ओवा १ टेबलस्पून धना पावडर १ टेबल स्पून लाल तिखट १ हिरवी मिरची बारिक कापून ( नुसती गोल न कापता चॉप करुन घ्या) कोथिंबीर अंदाजे चार काड्या बारिक चिरुन चवी नुसार मिठ कणिक दोन कप. तेल अन तूप समप्रमाणात मिक्स करुन.( १ टेबलस्पून तेल अन १ टेबलस्पून तूप बस होइल साधारण) कृती:-/ कोबी खिसुन घ्या . खरतर किसल्यावर कोबीला फार पाणि सुटत म्हणुन अगदी जमेल तेव्हढा बारिक कापुन घ्या. त्यात हळद मिठ मिरची धनापावडर अन तिखट मिसळा . ओवा हातावर घेउन तंबाखु जसा मळतात तसा हातावर चोळुन मिक्स करा.( यामुळे फ्लेवर रिलिज होतो. नाहीतर ओवा कुटुन घातला तर पराठा कै च्या कै तिख्खट होइल. पहिलाच सांगुन ठेवते) mixture आता कणिक भिजवुन घ्या. आता मी सांगितल नाही म्हणुन त्या कणिकेला बिन तेला-मिठाची मारु नका. सगळ व्यवस्थीत करा. एक छोटा गोळा घेउन तो पोळपाटावर लांबट लाटुन घ्या. या पोळीच्या अर्ध्या भागात कोबीचे सारण निट पसरवुन उरलेला अर्धा भाग त्यावर निट कव्हर करुन पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटुन घ्या. stuffing तव्यावर थोडेसे तेल तूपाचे मिश्रण पसरवुन हा तयार पराठा दोन्ही बाजुने छान खरपूस भाजुन घ्या. roasting नुसत्या तूपाने पराठा कडक होतो, अन तेलावर भाजल्यास हवा तसा खमंगपणा येत नाही म्हणुन मी तेल अन तूप मिक्स करुन लावते. ready तयार आहे लाजवाब कोबीचा पराठा. थोड लोणी अन लोणच्या बरोबर सर्व्ह करा. तर मंडळी आजच जा जा जा झणी, बाजारी। घेउन या कोबी, पराठ्यासाठी। अन तो "गड्डा" आणल्यावर, आता याला कसा कापू? असा दुष्ट विचार मनात न आणता, अपर्णावर विश्वास ठेवा अन मजेत खिसायला सुरु करा. काय?. __/\__ अपर्णा

वाचन 51446 प्रतिक्रिया 0