शोधू किती बहाणे...
लेखनविषय:
काव्यरस
आधार टाळण्याचे, शोधू किती बहाणे
एकांत पाळण्याचे, शोधू किती बहाणे
शिशिरात मोग-याचा, फुलला इथे फुलोरा
गजरा न माळण्याचे, शोधू किती बहाणे
ती भेट त्या दिसांची, रात्रीस ओढ देते
विरहास भाळण्याचे, शोधू किती बहाणे
देहात जागणा-या, वणव्यात आग आहे
इच्छांस जाळण्याचे, शोधू किती बहाणे
ही ओल पावसाची, स्वप्नास स्पर्शणारी
नक्षत्र गाळण्याचे, शोधू किती बहाणे
आशा जरी न होती, ना नांदते निराशा
आनंद चाळण्याचे, शोधू किती बहाणे
संध्या
२९.१२.२०१२
वाचन
6154
प्रतिक्रिया
0