मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मलई सँडविच

सानिकास्वप्निल · · अन्न हे पूर्णब्रह्म
sanika साहित्य सँडविचसाठी: अर्धा लिटर दूध दीड टेस्पून लिंबाचा रस ३/४ वाटी साखर दीड वाट्या पाणी १/२ टीस्पून वेलची दाणे पत्री खडीसाखर बर्फाचे तुकडे sanika पाकृ: जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवावे. दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे. दूध फाटायला / नासायला लागून त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागेल. त्यात बर्फाचे तुकडे घालून गॅस बंद करावा व बर्फ पूर्ण वितळेपर्यंत ढवळत रहावे. चाळणी स्वच्छ कापड ठेवून त्यात तयार केले पनीर गाळून घ्यावे. कापडाची पोटली तयार करून शक्य तेवढे पिळून पाणी काढून टाकावे. थंड पाण्याच्या नळाखाली पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल. १/२ तास पोटली टांगून ठेवावी. sanika १/२ तासानंतर पनीरला एका ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे. थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करा व त्यात पत्री खडीसाखर ठेवा व त्याचा हलक्या हाताने छोटा चौकोन बनवा. प्रेशर कुकरमध्ये दीड वाट्या पाणी व वेलची दाणे घालून उकळी काढा. उकळी आली की त्यात साखर घाला व ढवळा. साखर विरघळली की त्यात तयार केलेले पनीरचे चौकोन हलकेच सोडा व कुकरचे झाकण बंद करा. २-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा व कुकर लगेच थंड पाण्याच्या नळाखाली धरा म्हणजे वाफ निघून जाईल. सँडविच तयार होऊन आकाराने दुप्पट झालेले असतील. २-३ तास पाकात मुरु ध्यावे. sanika साहित्य फिलींगसाठी: २-३ टेस्पून घरी बनवलेला ताजा खवा २ टीस्पून पिठीसाखर रोझ वॉटर १ टीस्पून पाण्यात मिसळलेले केशर १-२ थेंब खाण्याचा गुलाबी रंग (ऐच्छिक) चांदीचा वर्ख (ऐच्छिक) बदाम-पिस्ता पूड / काप sanika पाकृ: खव्यात आवडीप्रमाणे पिठीसाखर एकत्र करून घ्यावी. खव्याचे दोन भाग करावे, एका भागात रोझ वॉटर व थोडे केशर पाणी घालून एकत्र करावे व दुसर्‍या भागात रोझ वॉटर व खाण्याचा गुलाबी रंग एकत्र करुन घ्यावे. तयार पनीरच्या चौकोनाला पाकातून काढून घ्यावे व ( पाक दाबून काढायचा नाही) मधो-मध कापून दोन भाग करावे. एका भागाला केशरमिश्रीत खवा नीट पसरवून लावा व वर उरलेला पनीरचा भाग लावून सँडविच तयार करावे. असेच दुसर्‍या सँडविचला गुलाबी खवा लावून घ्यावा. sanika बदाम-पिस्ता पूड व चांदीचा वर्ख लावून सजवावे. sanika मलई सँडविच खाण्यासाठी तयार आहे :) sanika नोटः पनीर चांगले मळावे म्हणजे सँडविच मऊसूत व लुसलूशीत होतात, तसेच खडीसाखरेमुळे हलके व पोकळ होतात. खाण्याचा रंग नाही घातला तरी चालेल. खवा शक्यतो घरचाच व ताजा घ्यावा. (मिल्क पावडर वापरून खवा बनवू नये, चवीत फरक पडतो) पनीरमध्ये रवा, मैदा बांईडिंगसाठी अजिबात मिसळू नये त्याने ते गार झाल्यावर वातड होतात. अर्धा लिटर दूधाचे मध्यम आकाराचे चार सँडविचेस तयार होतात.

वाचन 71840 प्रतिक्रिया 0