कवितांचे प्रकार
राम राम मंडळी
आम्ही नुकतेच आमची समज वाढवण्याच्या प्रयत्नात काही काव्य प्रकार समजून घेतले. त्यातले काही आम्ही प्रसवून सुद्धा पाहिले. आमचा हा प्रयत्न गोड मानावा. काही चुका असल्यास माफ कराव्यात. सुधारणेस वाव असतो असे आमचे मत आहे. त्यामुळे एक ना एक दिवस आम्ही नक्की साहित्यिक या पदवीला लायक होऊ असा आमचा विश्वास आहे. तोवर आशीर्वाद असावा ही णम्र इनंती :)
वैदिक काव्य
आगमनाने तुझ्या रे सूर्या धरती प्रकाशित
सारे प्रफुल्लित होत पाखर किलबिलत
किती उपकार होत मानवाचा तु तारक
प्रेरक जीवनाचा मी सूर्या तुझाच पूजक
पुराण काव्य
अरे अरे नाना झालास हुशार
काव्याचे प्रकार समजले
अक्षरेही मोजा यमक जुळवा
रस तो आणावा काव्यामधे
डोलती रसिक हालवती मान
झाले सभाजन आनंदित
नाना म्हणे देवा गातो मी भजन
आणिक किर्तन आनंदाने
आधुनिक काव्य
मी तिला पाहिले अन तिने मला पाहिले
तिला मी पाहिले अन मला तिने पाहिले
एकमेकांनी एकमेकांना पाहिले पाहिले
मान फिरवूनी चालू लागलो | पुन्हा न भेटाया
पुन्हा ती भेटली अन मी ही भेटलो तिला
पुन्हा मी भेटलो अन ती ही भेटली मला
पुन्हा पुन्हा ते आम्ही भेटलो एकमेकांला
मान फिरवूनी चालू लागलो | पुन्हा न भेटाया
आधुनिकोत्तर
मान गुढग्यात
मुडपून बसलेला असतांना
डास चावला म्हणून
चावलेल्या जागी चापट मारुन
हुळहुळणारा कुल्ला चोळत
तो उभा राहिला
अन
त्याच्या नजरेत भरुन आला विषाद
त्याच सनातन प्रश्नाचा
सर्व जाणीवा बधीर झालेल्या असतांना
अस्तित्वाची जाणीव करुन देणार्या
डासाचे आभार मानावेत
की
टेंडर मधे पैसे खाणार्या
नगरसेवकाला शिवी हासडावी...
ह्या विवंचनेतच तो चालू लागला अनामिक दिशेने.
आधुनिकोत्तरपश्चात
सम्जैनासे झाल्लंय
वाट टू डू वाटनाटटू डू
डोन्ट क्नो
किम् करिष्यामि
अरंकरेक्याकोईब्ताओ
प्रगल्भ अर्थात "पुढचे"
फुस्स...
निवेदन : "पुढचे" प्रकार असलेल्या काव्याचे रसग्रहण करणार्या सदस्यास "पुढीलसम्राट" ही पदवी देण्यात येईल.
वाचन
14584
प्रतिक्रिया
0