मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वांगी भात

गणपा · · पाककृती
काय मंडली काय चाल्लावं? रैवारचं नल्ली बल्ली फोडलावं कं नाय? आज जल्ला आमच्या हतं मार्केट बंद. आन माजा फिरीज पन रोडावलता. त्यात हतं मिपावं एकाव-एक धागेकाडुन, मिपाशी कुक मंडली माजं डोस्कं फिरवुन रायली. जल्ला त्यातला एक पदार्थ घरान अशेल तर शप्पत. फिरीजमन डोकावलं ता एक वांगं तेवरंच भेटलं. आता ह्याचा काय कराचां म्हनुन थोडा डोस्कं खाजवलन. थोडं सामानाची जुलवा जुलवं केली नं ह्यो बग मीनी काय केला तं. आवरलं असेन तर मंग कसं काय केला त सांगतव. वांगं आवरत नसेन तर इकरुनच कल्टी मारली तरी चालन. सगल्यान पैलं तर वांगींभात मसाला आना मार्केटान. नय भेटला तरी वांदा नाय. मी सांगतं नं कसा बनवाचा तो.. २ मोठे चमचे चना डाल. २ मोठे चमचे उडिद डाल. २ चमचे धने (नसतीन तरं धना पुड) ३-४ लाल सुक्या मिरच्या (त्यावं नसतीन तर लाल तिखटं.) १ छोटा चमचा मेथी दाने. १ छोटा चमचा जीर. १ छोटा चमचा खसखस. थोडा हिंग. २-३ वेलच्या. दालचिनी १ इंच. ३-४ लौंगा ह्ये जकलं कोरडंस भाजुन घ्याचं. (मिरची नं धने नसतीन तर त्या पावडरी गॅस बंद केल्यावं टाकाच्या. सगलं गार झाल्यावं मिक्सरान टाकुन पाऊडर करुन घ्याची. (माजी मोठी माय त्यात सुकं खोबरं बी टाकाची. पन मंग तो मसाला जास्त दिस टिकाचा नाय, लगेच वापरावा लागाचा. म्हनून मीनी नाय घात्ला.) वाटान घाटन झाला तं आता मेन डिशकडे वलु. पैले एक वाटी भात मोकला शीजवून घ्या. तुमाना बासमती आवरत असनं तर तो घ्या पण त्ये काय कंपल्सरी नाय. मीनी तर सादा कोलम घेतला. हा पण भात एकदम सुट्टा झाला पायजे. नाय तर वांग्याची खिचडी खावी लागल. १ लहान चमचा मोहरी. १-१ लहान चमचा चना डाल, उडीद दाल. (या दोनी १०-१५ मिनिट पान्यात भिजवाच्या.) कडीपत्ता ३-४ हिरव्या मिरच्या. १/२ चमचा हलद. २ मोठे चमचे सुकं खोबरं. थोडी चींच (आंबट आवडत असन तर.) तमाल पत्र. ४-५ चमचे तेल. मीठ. येक वांगं. (लहान असतीन तर ५-६.) १ कांदा बारीक चिरलेला. सगल्यान पैले कढईत तेल तापवुन घ्यांच. तेल तापलं की त्यान मोहरी, चनाडाल-उडीदडाल टाकाची. थोडं परतल्यावं त्यात कडीपत्ता मिरची कांदा तमाल पत्र टाकुन परतुन घ्याचं. वांग्याच्या लहान फोरी करुन घ्याच्या. कांदा गुलाबी झाल्यावं मंग त्यात वांग्याच्या फोरी घालाच्या. थोडावेल शिजल्यावं मंग त्यात हलद घालाची. वांगं शिजा लागलं की मंग त्यात ३ चमचे वांगी भात मसाला टाकाचा. ५ मिनटानी त्यात सुक खोबरं टाकाचं. आवरत असन तर मंग चींचेचा कोल टाकाचा. (पण चींच, वांग शिजल्या नंतरच टाकं हा बाला, नाय तर मग वांदा व्हाचा.) मीठ टाकांचं. मसाला नं वांगं शिजलं की मंग त्यात शिजवलेला भात टाकुन एकत्र कराचा. झाकान लावून एक वाफ काराची. मना तललेला वांग पण लय आवरतं. म्हनुन मग मी ४ वांग्याचे काप पन केले. मंग कं बगतं कं बाला? येना जेवाला.

वाचन 18085 प्रतिक्रिया 0