चैत्यगृहे
ओसरीतून आत प्रवेश करताच वर छताला लाकडी फासळ्यांचा आधार दिलेला दिसतो. छताचा अर्धवर्तुळाकार आकार आणि लंबरूपात खोदली गेलेली गुहा यामुळे छत अगदी गजपृष्ठासमान दिसते. छतावर लाकडी फासळ्या लावण्याची पद्धत का सुरु झाली ते सांगता येत नाही पण ह्या लाकडी फासळ्यांमुळे आणि बाहेरच्या पिंपळाकार वातायनामुळे चैत्यगृहाला एक प्रकारचे संतुलन प्राप्त होते आणि चैत्यगृह अधिकच खुलून दिसते. मात्र स्तूपाभोवती असणारा गाभारा मोकळा व अनलंकृत असल्याने भक्त पवित्र स्तूपाकडे सहजच आकर्षिला जाई. एकंदरीत आतल्या स्तूपाची रचना साधी, भव्य परंतु ठोस असे. स्तूपाच्या समोर दोन्ही ओळीत सरळ असलेले स्तंभ स्तूपाभोवतीही वर्तुळाकारात फेर धरत.
स्तूप म्हणजे ढीग किंवा स्तू म्हणजे स्तवन करणे आणि स्तूप म्हणजेच जोडणे किंवा एक करणे.
वर्तुळाकार जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटकार अण्ड, त्यावर चौकोनी हर्मिका आणि त्याजवर लाकडी छत्र अशी स्तूपाची रचना.
जोते म्हणजे मृत्युलोक, घुमटाकार अण्ड म्हणजे आकाश, आणि हर्मिका म्हणजे स्वर्ग, ही हर्मिका सात उतरत्या चौकोनी पायर्यांनी बनलेली आढळते ह्या सात पायर्या म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक अशी तत्कालीन धारणा.
पांडवलेणीतील जोते, वेदिकापट्टी, अण्ड आणि हर्मिका यांनी युक्त असलेला स्तूप
कान्हेरीतील तिहेरी छत्र असलेले कोरीव स्तूपाचे प्रारूप
कार्ले, भाजे, बेड्से या चैत्यांचा तुलनात्मक संक्षिप्त आढावा:-
भाजे येथील चैत्यगृहात ओसरी नाही, तसेच एकच पिंपळपानाकृती कमान आहे. तसेच लेण्यांतील भिंती व आतले स्तंभ कललेले ठेवलेले आहेत. छताचा दाब बाहेरच्या बाजूला असावा आणि खांब कलते ठेवले तरच ते असा दाब तोलू शकतील या कल्पनेने ही योजना केलेली दिसते. पुरेशा अनुभवांती याची काही गरज नाही असे कारागिरांच्या लक्षात आले असावे व त्यामुळे यापुढील इतर चैत्यगृहांमध्ये अशी कलत्या खांबांची रचना दिसत नाही. भाजे लेण्यांतील अष्टकोनी खांब साधे आहेत मात्र कार्ल्यातील सालंकृत आहेत आणि त्याजवर स्त्रीपुरुषांच्या जोड्या हत्ती, बैल, सिंह आदी प्राण्यांवर बसलेल्या दिसून येतात.
भाजे लेणीतल्या स्तूपावर मौर्यकालीन झिलई आढळते. स्तूपावर एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा लेप देऊन स्तूप चमकदार आणि गुळगुळीत केलेला दिसून येतो.
कार्ले आणि बेडसे या दोन्ही चैत्यांच्या प्रवेशभागी खोदीव जवनिका आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंस एकावर एक चढत गेलेल्या कमानदार गवाक्षाप्रासादांची रेलचेल आहे. बेडसे लेणीमध्ये मात्र बुद्धमूर्ती नाहीत तर कार्ल्याच्या प्रवेशभागातील मूर्ती नंतरच्या काळात खोदलेल्या दिसून येतात.
कार्ल्याच्या प्रवेशद्वारावर अशोकस्तंभ कोरलेला आहे, कान्हेरीतील चैत्यगृहात केलेली त्याची नक्कल वगळता सह्याद्रीत इतरत्र कुठेही अशोकस्तंभ दिसत नाहीत.
कार्ले येथील चैत्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीत भारतातील सर्व चैत्यांत विस्तीर्ण आहे. याचे क्षेत्रफळ भाजे चैत्याच्या साडेतीन पट व बेडसे चैत्याच्या सहापट आहे. भाजे चैत्यात २७ व बेडसे चैत्यांत २६ आणि कार्ले चैत्यात ३७ खांब आहेत. सर्वाधिक उंचीचाही हाच चैत्य असून सर्वाधिक सालंकृतही आहे. कार्ल्याच्या समोरील ओळीतील स्तंभ नक्षीदार असून साधे स्तंभ स्तूपाच्या पिछाडीस आहेत तर भाजे आणि बेडसे यांचे स्तंभ साधे आहेत.
भाजे चैत्यासमोर जवनिका नसल्याने तो चैत्य काहीसा भकास दिसतो तर बेडसे चैत्यगृहात जवनिका असूनही प्रवेशद्वारानजीकचा खडक अर्धाच फोडलेला असल्याने तो चैत्य किंचीत अंधारी आहे तरी प्रवेशद्वारातील भव्य सालंकृत स्तंभामुळे हा चैत्य अतिशय देखणा झालेला आहे. तरी कार्ल्याच्या चैत्यगृहाची सर कशालाच नाही. स्तंभांवरील स्त्रीपुरुषांची ऐहिक ऐश्वर्याची ही प्रतिके स्तंभांच्या अग्रभागी कोरलेली आहेत. स्तूपासमोरील ओळीत असलेल्या ह्या प्रतिकांच्या उपस्थितीमुळे स्तूपाबद्दल भाविकाला अधिकच आदर वाटेल अशी मांडणी येथील शिल्पकारांनी केलेली आहे.
कार्ले चैत्याची मांडणी अत्यंत प्रमाणबद्ध आहे. लांबी, रूंदी व उंची यांचा अनोखा समतोल येथे साधला गेला आहे.
भाजे स्तूपावर आज छत्र अस्तित्वात नाही, बेडसे चैत्यात ते कमळाचा आकार घेऊन आलेले आहे तर कार्ले चैत्यावर ते पसरट नक्षीदार फळीच्या स्वरूपात दिसते.
भाजे आणि कार्ले चैत्यातील लाकडी फासळ्या आजही शाबूत आहेत पण बेडसेच्या नष्ट झालेल्या दिसतात.
भाजे चैत्यगृहातील कललेले खांब, झिलईचा गुळगुळीत स्तूप व पिंपळपानाकृती कमान
भाजेची साधीशीच रचना
बेडसे चैत्यगृह
बेडसेतील स्तूपाचे नक्षीदार कमळाकृती छत्र
कार्ले चैत्याच्या ओसरीमधील नक्षीदार प्रासाद
कार्लेचा जगप्रसिद्ध चैत्य आतील देखण्या स्तंभांसह
तीनही चैत्यांवर दातृत्वाचे अनेक शिलालेख कोरलेले आढळतात. तर बेडसे आणि कार्ले चैत्यगृहावर त्यांच्या निर्मात्याचा उल्लेखही आढळतो.
बेड्से चैत्याजवळच्या एका विश्रांतीकक्षावर असलेला शिलालेख
...नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं
नासिकचा श्रेष्ठी आनंद याच्या पुत्राचे हे दान.
तर कार्ले चैत्यावर त्याचा निर्मात्याचा- वैजयंती नगरीचा श्रेष्ठी भूतपाल याचा शिलालेख आढळतो.
वेजयंतिता सेठिणा भूतपालेना सेलघरं परिनिठपितं जम्बुदिपाम्हि उतमम
वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने निर्मिलेले हे शैलगृह जंबुद्विपात सर्वोत्तम आहे.
भूतपालाचे शब्द अगदी यथार्थ आहेत.
कार्ले येथील चैत्य सर्व चैत्यांत विस्तीर्ण, उत्तुंग आणि उत्कृष्ट आहे, प्रसन्न, गंभीर आणि उदात्त आहे. हीनयान शिल्पशैलीचा हा सर्वोत्तम प्रतिक. येथे ऐश्वर्य आहे पण डामडोल नाही, येथे अभिजात कला आहे पण ओसंडती कृत्रिमता नाही, कौशल्याचे प्रदर्शन नाही, मूर्तींची गर्दी नाही. वस्तुत: स्तूप हे मृत्युचे प्रतिक पण येथे जीवनाचे प्रेरणा देते. यापूर्वी आणि यानंतरही शिल्पकारांनी अनेक लेणी खोदली, अनेक चैत्य खोदले पण यासम हेच.
संदर्भः
सह्याद्री - स. आ. जोगळेकर
सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर
The Cave Temples of India -J. Burgess & Bhagwanlal Indraji
वाचन
29124
प्रतिक्रिया
0