बने बने ...भाग २
लेखनप्रकार
भाग १ : येथे पहा : http://www.misalpav.com/node/2920
हुश्श ! टेकूया थोडे इकडे . अगो असे काय विचारतेस ? अमेरिकेतली देशांतरितांची पंढरी ही : न्यू जर्सी ! ओक ट्री भागात काय मिळणार नाही इथे ! शोधला तर नवरा सुद्धा मिळेल तुझ्याकरता इथे (शेंबूड पूस तो आधी !) या ट्रायस्टेट भागात भेळपुरीवरच्या "तीन देवियां" वास करतात हो ! हे न्यूजर्सीवासिनी सुखदाईचे स्थान. काय म्हणालीस ? "देवळात काम नाही तर मी काय करू ?" असे भेळपुरीवर येऊन विचारतेय देवी ? भलभलते नको बोलूस ! कोप झाला तर देवळात मिळणार्या मिसळीच्या प्रसादातल्या तर्रीचा झटका देईल हो देवी !
आणि कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर ! काही झाले तरी पाणी पंचगंगेचे आहे ! मुळामुठेमधले किंवा अमेरिकेतल्या पाईप्स मधले पाणी येऊन काही पातळ नाही झालेले ! बने , शेवंताभवानीने अलिकडेच तुझ्या नावाने पुन्हा या कलियुगी अवतार घेतला आहे हो ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! (बाकी बने , तू बिनडोक आहेस, हे शेवंताईला कसे कळले हे ती जाणे नि तू जाणे !) बाकी या तीन्ही देवता आपापसात कितीही बडबडोत , पण "तर्री तर्री आता मरणाते वारी" अशी यांची कृपा. पूर्व किनार्यावरच्या भेळपुरीवर आलीस नि यांचे दर्शन चुकवलेस तर यांच्या कृपाप्रसादास मुकणार हो तू !
काय म्हणतेस ? एकूण न्यूजर्सी भाग शांत वाटतो ? बरोबर आहे ! पूर्वी अटकेपार पोचलेले झेंडे इथे अटलांटिकपार पोचवणारे शनिवारवाडेकर नुकतेच आपल्या छावणीत परतले आहेत. काय म्हणालीस ? मस्तानी ला घेऊन ? छे ग ! ते आपले पुण्यातल्या तुळशीबागेतल्या मस्तान्यांच्या मागे ! अमेरिकेतल्या मस्तान्या मिळवण्याच्या बाबतीत त्यांचे बाकी पानपत झाले हो !
चल जाऊ आणखी थोडे उत्तरेला. आपण आलोत बॉस्टन भागात. इरले नीट कानावरून घे ! जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ! (अर्रर्रर्र चुकलो ! मला म्हणायचे होते, बुलंद माणसे नि जीवघेणी थंडी ! ) प्रदेश कितीहि थंड असो, माणसे ऊब देणारी हो ! ( गरम डोक्याची ? थांब हो कार्टे ! मफलर लावून तोंड बंद करतो आधी !) तर हा आहे .. भेळपुरीवरच्या सन्माननीय "बॉस्टन ब्रॅम्हिन्स" चा भाग ! काय म्हणालीस ? असे जातीयवादी विधान कसे करतो मी ? काय करणार , कुणी तर्कट बोलतो , आपण ऐकून घेतो झाले ! हे आले भेळपुरीवरील बोरीसकुमार रंगास्कीचे ठिकाण. नाव इतके भरभक्कम असले तरी माणूस साधा आहे. काय म्हणालीस ? वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो ! वेडी कुठली ! फार बोलू नकोस, टाकून देतील एखादे विडंबन ! बुदबळांतल्या "रूक" सारखे सरळ हो ! (काय म्हणालीस ? रुक-श !? चल, चहाटळ मेली !)
तो शांत , स्थिर प्रकाश पाहिलास ? भेळपुरीला बोज आणून देणारे निवास हेच ते. शंकराच्या डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? अगं , अगं अशी चिडू नकोस. अमेरिकेत राहून भारतातल्या परिस्थितीबद्दल ताशेरे ओढण्याचा हक्क याना कुणी दिला नसला , तरी माणूस लाख हो ! याच भागात रहातो , भेळपुरीचा बच्चन ! च्, च् , बोलबच्चन नव्हे गं ! ते वेगळे ! हा म्हणजे फक्त उंचीला बच्चन ! एरवी तोंडातून एक शब्द फुटेल तर शपथ ! मात्र गातो बाकी चांगला हां ! एक ट्रीप ठाण्याला मारून येईल तर गानगंधर्व होऊन जाईल !
चला, पुरे झाली अमेरिका ! ठेवले काय आहे इथे माती नि दगड ! चल पकडू विमान लवकरच आपल्या देशाकडे. वाटेत लागतील एखाद-दोन भेळपुरीवाले त्यांचीही खबर घेऊच. चला, गुंडाळू आपला गाशा नि काय !
वाचन
16796
प्रतिक्रिया
0