थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'
थोरांची ओळख
जालिंदर जलालाबादी :
या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे.
जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला.
त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला. जन्मभूमीलाच कर्मभूमी समजून त्यांनी मराठी साहित्याच्या सेवेलाच आपले जगण्याचे मिशन मानले. पण आपले नाव मूळ वंश ज्या गावाचा त्या जलालाबादच्या स्मृतीसाठी मात्र जलालाबादी घेतले.
शाळेत असल्यापासूनच ते अफ़ाट गुणवत्तेचे होते. सर्व व्यासपीठांवरती त्यांचा मुक्त संचार असे. शिवाय लहानपणी त्यांना दोरीवरच्या आणि खुंटाच्या अशा दोन्ही मल्लखांबाची फ़ार आवड होती पण एका अपघातात त्यांचा पाय मुरगळल्यामुळे त्यांना नाईलाजाने तो मार्ग सोडून द्यावा लागला. ते वक्तृत्त्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, अभिनयस्पर्धा, आट्यापाट्या, खोखो यात कायम जिंकत असत. पण आपण लेखक होऊ असे त्यांना कधीही वाटले नव्हते. शाळेच्या हस्तलिखिताच्या संपादकपदाचा वाद निर्माण झाला तेव्हा त्यांनी स्वत:हून संपादकपद सोडले .. शाळेच्या बक्षीससमारंभात बक्षिसासाठी सतत त्यांचे नाव ऐकून लोक कंटाळून गेले. त्यांचे नाव पुकारताच ते खालूनच ओरडून सांगू लागले की "आता बास".. शाळेत ते इतक्या स्पर्धा जिंकत असत की त्यांनी इतरांना वाव मिळावा म्हणून आपण यापुढे स्पर्धेत भाग घेणार नाही असे जाहीर केले. लहानग्या वयातच केवढी ही जाण...!
केरळी रांगोळी आणि बंगालात बंगला ही त्यांची लघुनिबंधांची काही महत्त्वाची पुस्तके. " लिहिते व्हा.." हा तरूणांना दिलेल्या संदेशात्मक लिखाणाचे पुस्तकही नुकतेच बाजारात आले आहे.
भारतात असताना "कालभारत " हे एक अनियतकालिक हस्तलिखित त्यांनी चालवले ...
"दिल्ली गं दिल्ली तू कुठे चाल्ली?" हा आणीबाणीच्या काळात लिहिलेला लेख पाहून त्यांच्यामागे भारतीय पोलीसांचा ससेमिरा लागला तेव्हा ते भूमिगत झाले.आपले पुढील कार्य त्यांनी अफ़्रिकेतील बुरुंडी येथून चालवले.
"मला नोबेल प्राईज नको" हा त्यांचा लेख गाजला... स्वत:च्या अज्ञातवासात त्यांनी अंदमान ते सायबेरिया ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला बुरुंडी-र्वांडा साहित्यसंस्कृती मंडळाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. लेखन कसे करावे ही त्यांची लेखमाला अफ़्रिकन संदेश या वार्तापत्रात क्रमश: प्रसिद्ध झाली..आंतरजालावरील होतकरू उर्ध्वगामी साहित्यिकांना या लेखमालेचा खूपच उपयोग होईल, म्हणून आम्ही इथल्या वाचकांची इच्छा असल्यास आमच्या खरडवहीत दर आठवड्याला आमच्या गुरूंची ही लेखमाला स्वाहिलीमधून मराठीमध्ये भाषांतर करून प्रसिद्ध करू.
काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतात यायची परवानगी मिळाली. इतकी वर्षे परदेशात राहूनही त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. मराठमोळे उच्चारण अजिबात बदलले नाही.जेव्हा ते पंचवीस वर्षांनी प्रथम मुंबई विमानतळावर आले आणि टॅक्सीत बसले तेव्हा त्यांनी येथील अस्वच्छता, दारिद्र्य यावर एक शब्दही भाष्य केले नाही आणि चक्क पाणपोईच्या नळावर जाऊन ओंजळीतून पाणी प्याले. त्यांचा हा साधेपणा पाहून आमच्या डोळ्यांत पाणी तरारले आणि आम्ही म्हणालो," जियो जालिंदर जियो"... इतक्या थोर सद्गृहस्थाचा केवढा हा विनय... !!
मराठी साहित्याच्या प्रचारासाठी त्यांनी काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले.
"हायकू कायकू आणि इतर " या त्यांच्या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे त्यांनी दक्षिण ध्रुवावरती अभिनव पद्धतीने हवाई उडी घेऊन वाचन केले. या प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी महाराष्ट्राच्या गावागावातून घरटी एक एक रुपया गोळा केला जावा असे त्यांना वाटत होते.. आमच्यासारख्या त्यांच्या शिष्यांनी त्या काळात पुष्कळ प्रयत्न केला. मदत फ़ेर्या काढल्या.तरी पैसे जमेनात तेव्हा काही अमेरिकन कंपन्यांनी जालिंदरजींना मदत केली. वीस हजार फ़ुटांवरून हवाई छत्रीतून उडी घेऊन त्यांनी दक्षिण गंगोत्रीवर आगमन करणे अपेक्षित होते; त्यांनी तशी उडी घेतलीही परंतु हवाई उडीची सवय नसल्याने ते मूळ जागेहून ३० किलोमीटर दूर जाऊन पडले, तिथून १२ दिवस जीवघेण्या थंडीत पदभ्रमण करत असताना त्यांना वाचवले गेले. पण ते सापडले तेव्हा ते पेन्ग्वीनच्या एका जथ्याला आपली कविता वाचून दाखवताना आढळले.
( तेथेही त्यांना एका अमेरिकन कंपनीकडून दक्षिण ध्रुवावर तेल शोधायला आलेल्या एका गोर्या लोकांच्या चमूनेच वाचवले हे विशेष..)
बुरुंडीत भरलेल्या पहिल्या जागतिक अतिविद्रोही साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.पण संयोजन समितीत प्रचंड मतभेद होतेच.बुरुंडी आणि र्वांडा इथली मराठी मंडळे सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांवर अन्याय करताहेत ही भावना दृढ होत चाललेली होती.त्यातून " आता संमेलनच बरखास्त करा" अशा आरोळ्या उठल्या. दक्षिण ध्रुव प्रकल्पाबद्दल त्यांनी घेतलेल्या अमेरिकन कंपनीच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित झाले. जालिंदरजींवर "अमेरिकेचे बगलबच्चे" असा अत्यंत उद्वेगजनक आरोप झाला.पण मी हे सारे मराठी साहित्याच्या उद्धारासाठी केले असे त्यांनी सांगून पाहिले. पण विरोधकांचा आवाज प्रचंड होता. ही सारी बंडाळी उद्घाटनप्रसंगी उघड झाली. शक्तीप्रदर्शन झाले,घोषणाबाजी ,पत्रकबाजी झाली. जालिंदरजींनी नाक घासून माफ़ी मागावी अशी मागणी केली गेली. जालिंदरजींनी उद्वेगाने म्हटले, " अरे ही काय लोकसभा आहे का?" झाले, आधीच चिडलेल्या बंडखोरांची तळपायाची आग मस्तकाला गेली.
तलवारी उपसल्या गेल्या,प्रत्युत्तर म्हणून बंदुका दाखवल्या गेल्या.तरीही संमेलनाची सुरुवात झालीच. जालिंदरजींनी भाषणासाठी माईक हातात घेताच "कुठेतरी भोसकाभोसकी झाली ..." अशी आरोळी उठली. हवेत गोळीबार झाला. संमेलनाचे व्यासपीठ सोडून सर्व पाहुणे पळाले. एकच गोंधळ माजला.तलवारींची पाती सपासप फ़िरू लागली.. गोळीबाराने आसमंत दुमदुमला. पण तरीही एका हातात माईक ठेवून दुसर्या हाताने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करत विविध ठिकाणी दडी मारत मारत जालिंदरजींनी आपले ३८ मिनिटांचे भाषण पूर्ण केले. त्यांना कव्हर फ़ायर देणारे त्यांचे अनुयायी आजही त्या प्रसंगाचे चित्तथरारक वर्णन करतात.
जालिंदरजींचे समर्थक
संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच जालिंदरजींची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली..पण ते बेमालूम वेषांतर करण्यात इतके तरबेज होते की ते स्वत:च वेषांतर करून या अंत्ययात्रेत सामील झाले आणि स्वत:च्या तिरडीला खांदा दिला आणि प्रतिमादहनाचे महत्त्वाचे नियमही सर्वांना समजावून सांगितले..
पण एक शल्य त्यांना बोचत होते की त्यांचे संमेलनाध्यक्ष या नात्याने केलेले महत्त्वाचे भाषण जनसामान्यांपर्यंत पोचलेले नाही.म्हणून त्यांनी बुरुंडी, र्वांडा, सिएरा लिओन ,घाना इथल्या विविध वाड्या वस्त्यांवरती जाऊन प्रत्येक माणसाला एका भाकरीच्या बदल्यात स्वत:चे भाषण वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या या युक्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.मात्र तेथे एका टोळीकडून दुसर्या भाकरीसाठी त्यांच्यावरती दबाव आणायचा प्रयत्न झाला, नंतर त्यांच्यावर दुसरी भाकरी मिळवण्यासाठी हल्ला झाला. तरीही "एकावेळी एकच भाकरी " या त्यांच्या पवित्र्यापासून ते तसूभरही मागे हटले नाहीत....स्वत:चा जीव धोक्यात घालून मराठी साहित्याचा अफ़्रिकन आदिवासी टोळ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचे हे दैवी कार्य करण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आज इतर कोठे दिसेल काय ? स्वत:च्या भाषेप्रती केवढी ही अव्याभिचारी निष्ठा !!! एका वेळी एकच भाकरी ही त्यांची गर्जना पुढली शतकानुशतके साहित्यिकांना प्रेरणा देत राहील.
या थोर साहित्यिकाला प्रस्थापितांनी कायमच उपेक्षित ठेवले. त्यांच्यावर पुष्कळ आरोप केले गेले. साहित्यजगतात ते उर्मट , उन्मत्त म्हणून प्रसिद्ध होते. ."अमेरिकेचा बगलबच्चा" हा मात्र सर्वात हृदय विद्ध करणारा आरोप असं त्यांना वाटतं. मायमराठीनेच आपल्याला सार्या आरोपातून तरून जायची शक्ती दिली, असे ते मानतात. हल्ली अगदी कोणालाही ( अगदी उथळ नटनट्यांना,गाणं-बजावण्यातल्यांनासुद्धा) पद्म पुरस्कार दिले जातात, पण इतक्या धाडसी, गुणी आणि लोकोत्तर साहित्यिकाला दुर्लक्षित करणे हेच जणू इथल्या अभिजनवर्गाचे नेहमीचे काम झाले आहे. मी ही खंत त्यांच्यापुढे व्यक्त केली तरी ते फ़क्त हसतात...आयुष्याच्या शेवटी जालिंदरजी समाधानी आहेत. खूप काही करायचं राहून गेलं हे शल्य मात्र त्यांना कधीकधी बोचतं ...
सध्या ते ८८ वर्षांचे आहेत .. निवृत्त आयुष्य सुखाने जगत आहेत... विविध व्याधी मागे आहेत, औषधे गोळ्या यांचा मारा चालू आहे पण मन तेवढेच उत्फ़ुल्ल आहे...
कधी घरी गेलो तर ओळखतात, पडल्या पडल्या स्माईल करतात आणि गप्पा मारायला सुरुवात होते .
हळूच चावट जोक सांगणं असो किंवा ल्यापटॊपवर लिहिलेली नवीन कविता असो,जगणं आनंदात चालू आहे...
परवा म्हणाले, " पंतप्रधानांच्या अर्थविषयक प्रबंधाला चाल लावता येइल का रे? मला आता गावंस वाटतंय"... पण मी म्हटलं," अर्थविषयक गाणंच का?" तर मला डोळे मारत म्हणाले," एखादी पद्मश्री मी ही मिळवेन म्हणतो".....काय हा विनोदी स्वभाव !!!
बिछान्यावर पडल्यापडल्या ते दोरीवरच्या मल्लखांबातल्या काही ट्रिक्स करून दाखवतात तेव्हा मन थक्क होते. आताच ही स्थिती तर हा माणूस तरूणपणी काय असेल !!! "मी जन्म मानत असतो तर पुढल्या जन्मी मल्लखांबपटू झालो असतो" असं म्हणत ते एक जुना पिवळा पडलेला फोटो दाखवतात, मी विचारतो, हे कोणते झाड आहे? त्यांनी सांगितलं," हा मल्लखांब करताना काढलेला माझा फोटो आहे.".. मी त्या फोटोचा फोटो काढला. तो फोटो माझ्याकडे जपून ठेवलेला आहे.हाच तो फोटो...
क्षणभंगुर सिंगूर हे त्यांचे महाकाव्य ते सध्या पूर्ण करत आहेत. जगाने कितीही दुर्लक्ष केले तरी जालिंदरजींची निदान आंतरजाल तरी दखल घेईल अशी आशा आहे...
वाचन
44888
प्रतिक्रिया
0