बने बने ...पाहिलास का स्टुडीओ ?
लेखनप्रकार
(दिवाकरांची क्षमा मागून ....)
बने, बने , अग , कुठे काय म्हणतेस ? भेळपुरीला जातोय ना आपण. अग असे काय करतेस ? अलकापुरी , जगन्नाथपुरी तशी ही भेळपुरी हो ! नाहीतर तुझे म्हणजे जाऊ तेथे खाऊ असते !
हा पाह्यलास का ? हा अमेरिकेचा प्रसिद्ध पश्चिम किनारा हो ! काय म्हणालीस ? "बिग सर" म्हणजे जॉर्जसारखे "मोठे शिक्षक" ? अगं असे काय म्हणतेस ? बिग सर हा इथला प्रसिद्ध भाग हो ! हां इथे ते मोठे लेखक रहातात मात्र. आपल्या हालीवूडाजवळ! काय म्हणालीस ? म्हणूनच इथून जवळच्या पार्काला "यलोस्टोन" नाव दिलेय ? छे गं ! दगड नि डांबिस यातला फरक नाही समजत तुला ? कमाल झाली हो !
असे थोडे पुढे येऊ या भागात आपण. येतेय का ऐकायला काही ? नाही ना ? नाहीच यायचे. कल्याणकारी राजांच्या राजवटीमधे जशी "भीषण शांतता" नांदायची तशी या सान्डीऍगो मधे काही भीषण शांत लोक रहातात हो ! भूकंप होवो नाहीतर आगी लागोत (अगं कुठे काय ? क्यालिफोर्नियामधे गं ! "भेळपुरी"वर अधून मधून होणारे भूकंप ते वेगळे !) , पण इथल्या नंदनवनात नेहमी शांतता ! फार ज्ञानी पुरुष रहातात हो इकडे !
ये , अशी उत्तरेकडे माझ्याबरोबर. काय म्हणतेस ? भीती वाटते ? कसली ? "बिग वन" च्या केंद्रापाशी येत चाललो आपण म्हणून? अगं घाबरू नकोस ! इथल्या प्लेट्स हलतात तसे इथले भूकंपसुद्धा अचानक जागे होतात. जागे होतात तसे झोपतात सुद्धा ! काय म्हणतेस ? सध्याच्या भूकंपाचे हादरे थांबत नाहीत ? अगं असे काय करतेस ? तो काय कॅलीफोर्नियाचा भूकंप नव्हे ! इथे होणार्या साहित्यसंमेलनाचे आतापासून वाजणारे नगारे हो हे ! काय म्हणतेस ? तर्कट आणि हिरवा वात्रट ही काही खरीखुरी नावे नव्हेत काही ! या झाल्या प्रवृत्ती ! काय म्हणतेस ? कॅलीफोर्नियाचे कोकण झाल्यासारखे वाटते ? अगं , एकूण किती कोकणी तिरकसपणा केला तरी काही माणसे "घाटावरची" हो ! उगाच दिसला भट म्हणजे कोकणचा , असे नसते ! काय म्हणालीस ? "घटं भिद्यात् , पटं छिद्यात् " अशी प्रसिद्धी मिळवतात ही उत्तर क्यालीफोर्नियाची तर्कट माणसे ? अगो ! जिभेला हाड काही तुझ्या ? कुणीतरी म्हण्टलेय ना , " यू हॅव नो डीसेन्सी ! गेट ओव्हर इट !"
हळूहळू आपल्याला आपली गुडचापी गुंडाळून या महान देशाच्या पूर्व किनार्याकडे जायला हवे.. काय म्हणालीस ? एष्टीसारखे विमान लागते का ? काहीतरीच काय ? पोटातले पाणीसुद्धा हलायचे नाही !
आस्सं. चला होऊ पायउतार ! हे टेनेसी हो ! इथून जवळच्याच राज्यात भेळपुरीचे प्रसिद्ध फोटो काढणारे पर्जन्यराज रहातात . जपून बोल बरे का ! लिहून टाकतील एक फर्माससे चित्रपटपरीक्षण. नाही नाही , तसे "काळेबेरे" काही नाही यांच्या मनात. यांचा मुघलकालीन इतिहासावरील चित्रपटांचा अभ्यास दांडगा हो ! काय म्हणतेस ? भेळपुरीच्या मंत्रिमंडळाची जुनी मळकी टोपी अजून यांच्या क्लोझेट मधे आहे अजून ? हम्म. कापे गेली तरी भोके रहातात म्हणतात ना !
ये असे थोडे उत्तरेला जाऊ. ही आली अमेरिकेची राजधानी ! काय म्हणतेस ? चोरांच्या आळंदीसारखे "संभावितांचे " डीसी ? छे गं ! इथे काय दोन दोन डीसी नाही आहेत ! (विल्मिंग्टन खूप आहेत बाकी ! क्यारोलिनात एक, डेलावेअरात एक ! काय म्हणतेस ? चोरांचे विल्मिंग्टन !? गप्प बैस ! कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न्यायची लायकी नाही तुझी. जास्त बोललीस तर ते काका बंगीत टाकून भारतात पाठवून देतील हो टपाल तुझे ! गप्प बैस पाहू! ) तर सांगत काय होतो ? डीसी एकच हो इकडे. तो कारखाना कसला म्हणतेस ? अगं , असे काय करतेस ? तस्त बनवण्याचा कारखाना हो तो ! आख्ख्या कारखान्याचा माल एक माणूस वापरतो म्हणे ! फार चौकशा नको करूस , लिहून टाकेल तुझ्यावर एखादा अग्रलेख ! आणि इथूनच जवळ हे बाल्टीमोर ! काय म्हणालीस ? कोण हे म्हणून विचारतेस ? कुठल्याही विषयावर काहीही गहन विचारा, खरे, समतोल , नि अगदी सहज उत्तर मिळणार ! सुपरम्यान ? छे छे , सुपर नाही , म्यानच हो हा ! अंडरप्यांटसुद्धा प्यांटवर नाही घालत ! सुपरम्यान कसा असेल ? आदराने मान लवते ना ? हा मृत्युंजय म्हणजे भेळपुरीचे एक रत्न हो हे !
थोडी विश्रांती घेऊ म्हणतेस ? बराय. थांबू आपण इथेच आज. अजून अमेरिकेतली मोठी मोठी तीर्थक्षेत्रे आणि तिकडचे खंडोबा नि अंबाबाई व्हायच्यात अजून ! अगो हा तर ट्रेलर आहे. मेन सिनेमा तर अटलांटिक पलिकडे नि अरबी समुद्रापार "ठाण" मांडून बसलाय ! दमलीस होय ! बास आता.
वाचन
17200
प्रतिक्रिया
0