गरमागरम चहा
साहित्य :
एक कप
एक बशी
एक चमचा
चांगली गाळणी
एक छोटेसे पातेले
गॅस शेगडी (शिलींडरसह)
लायटर
अर्धा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे साखर
एक चमचा चहापावडर
चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर
कृती :
प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे.
पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे.
लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी.
अधुन मधून चमच्याने ढवळावे.
उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी.
आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा. कपाच्या खाली बशी ठेवावी.
आणिक काय ? प्यावा सुर्र करुन :)
हवे असल्यास बरोबर बिस्कीट, वगैरे खावे आवडीनिवडीनुसार !!
विशेष सुचना :
१) अविवाहीतांसाठी - वरील प्रमाण एक कप चहासाठी आहे.
चहा पिण्यासाठी अजुन कुणी मित्र असेल तर वरचे प्रमाण मित्रांच्या संख्येच्या प्रमाणात वाढवावे.
आवश्यक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा ठेवावे.
मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे) असेल तर शक्यतो पाणी वापरु नये.
मात्र मैत्रिणी अशा वेळेस कॉफीच पाजण्याचा हट्ट करतात, त्यास बळी पडू नये.
त्यांना मला कॉफी चांगली येत नाही, आता चहा पी आपण कॉफी नंतर बाहेर पिऊ असे सांगून कटवावे.
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते.
२) विवाहीतांसाठी - बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते. आपण ही जबाबदारी पेलू शकू काय ह्याचा शाणपणाने निर्णय घ्यावा आणि गॅसवर जावे.. आपलं गॅसवर पातेलं ठेवावे.
वाचन
26643
प्रतिक्रिया
0