मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विठू सांगे...

प्राजु · · जे न देखे रवी...
आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ? गारूड ते । । श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती । करा श्रम भक्ती । विठू सांगे । । जाणा एक सर्व । विश्व हाच देव । । सांगे ज्ञानदेव । सकलांना । । प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । । - प्राजु. वरील काव्य वाचून प्राजुला विरक्ती आली आहे असा गैर समज करून घेऊ नये. काही ओव्या वाचता वाचता मला या ओळी सुचल्या.. म्हणून इथे लिहिल्या.

वाचन 15159 प्रतिक्रिया 0