मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोघेकाकू..!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा." "छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!" मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या. कोशिंबीर, गोडाचा शिरा, उगाच कुठे चवीला चार कुरडया अन् तळलेली सांडगी मिरची असा फस्क्लास बेत मोघेकाकू केव्हाच तयार ठेवतात! मोघेकाकू! आमच्या चाळीतलं एक केवळ निरागस म्हणावं असं, भाबडं, अत्यंत हौशी, कष्टाळू आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व! गिरणी कामगारांच्या संपात नवरा घरी बसला आणि हिंमत हारून, हाय खाऊन तीन लहानग्यांना मागे ठेवून अकाली वारला. मोघेकाकू जेमतेम सातवी-आठवी शिकलेल्या! पण बाई मोठी कष्टाळू, हिंमतीची अन् बहाद्दर! हाताला चव होती. पोळीभाजीचे डबे, चिवडा, चकल्या इत्यादी फराळाचे पदार्थ, पापड, कुरडया, असे नानाविध पदार्थ करून ओळखीपाळखीत विकू लागली. पदार्थ उत्तम असल्यामुळे वरचेवर ऑर्डरी मिळत गेल्या, त्यामुळे त्या उत्पन्नात स्वत: व तीन मुलं यांचं भागू लागलं. मुलांचं शिक्षण देखील अडलं नाही. वाट्टेल तितके कष्ट करण्याची बाईची तयारी होती आणि तिने ते केलेही! पदरात दोन मुलं अन् एक मुलगी होता. मुलंही आईसारखीच गुणी व कष्टाळू. भराभर शिकली, काहीबाही उद्योग करून आपापल्या पायावर उभं राहण्याइतकी मोठी झाली. राधाबाई नावाच्या कुणी बाई विविध पाककृती करण्याकरता मोघेकाकूंना मदतीला येत. ठराविक रोजीवर मोघेकाकूं त्यांच्याकडून पदार्थ बनवायला, तयारीला, निवडण्या-कांडण्याकरता बारीकसारीक मदत घेत. राधाबाईही तश्या गरजूच होत्या, चार पैसे त्यांनाही मिळत! पण स्वत: मोघेकाकूंचाच कामाचा आवाका जबरदस्त होता. आणि एवढं सगळं करून चेहेरा नेहमी हसतमुख. कधी चिडचिड नाही की चेहेर्‍यावर सुरकुती नाही! आहे त्या परिस्थितीत समाधानी राहून पुन्हा लोकांना मदत करायला उत्साहाने तयार! चाळीत कुणाहीकडे काही कार्य निघालं की मोघेकाकू या हव्यातच! मोघेकाकूंच्या दोन घरं सोडून नाना आठवल्यांचं घर. नाना आता खूप थकलेले. तसे आजारी-आजारीच असत. एकदा केव्हातरी नानांचा मुलगा ऑफिसच्या कुठल्याश्या परिक्षेला बाहेरगावी जायचा होता. सूनबाईला काही जरुरी कामानिमित्त पुण्याला आईकडे जावं लागणार होतं. मग आजारी नानांकडे बघणार कोण? पण चाळीतल्या लोकांना मोघेकाकू असल्यामुळे असले प्रश्न कधीच पडले नाहीत! "अरे अरविंदा, तू खुश्शाल जा हैद्राबादला. आणि माधवी दोनच दिवसांकरता तर पुण्याला जायची आहे. नानांकडे बघायला मी नाहीये का? तुम्ही जा बेलाशक, नानांना औषधं आणि जेवण मी नाही का द्यायची?" मोघेकाकूंनी दोन मिनिटातच हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. अरविंदा आणि माधवी मोघेकाकूंवर घर आणि नानांना सोपवून निर्धास्त घराबाहेर पडले. मोघेकाकूंनी आता नानांचा आणि आठवल्यांच्या घराचा ताबा घेतला. "नाना, मी इथे पाण्याचं तांब्याभांड ठेवत्ये. काही लागलं तर आहे मी इथेच. येऊन जाईन मधनंमधनं! आमच्या गंप्याला इथेच अभ्यासाला बसवते! जरा वेळाने मी औषध द्यायला येईन. जेवण काय करू? मऊभात चालेल की थोडी मुगाच्या डाळीची खिचडी करून आणू?" काही वेळाने मोघेकाकू औषध द्यायला गेल्या तर नानांना तिथे गादीतच उलटी झाली. सगळं औषध ओकून पडलं! "होऊ दे, होऊ दे नाना. काही काळजी करू नका!" असं म्हणन मोघेकाकूं ओकणार्‍या नानांच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. "पुन्हा काही वाटलं तर आपण डॉक्टरना बोलावू हं! आम्ही सगळे आहोत चाळीत. काही काळजी करू नका! अहो, इतक्या वर्षांचा शेजार आपला, आम्ही कुणी परके का आहोत? आता जरा बरं वाटतंय का?" असं म्हणून मोघेकाकूंनी सगळी उलटी साफ केली, चादर बदलली! वर पुन्हा, "अहो कालच आल्याच्या छान वड्या केल्या आहेत. दुकानांची नेहमीची ऑर्डर होती. थोडी आल्याची वडी आणत्ये, ती खा म्हण़जे अंमळ बरं वाटेल हां! " आजारी, थकलेल्या नानांच्या डोळ्यात फक्त कृतज्ञता होती! "अरे तात्या, इकडे ये रे जरा!" मोघेकाकूंनी चाळीत कुणालाही हक्काने हाक मारावी, त्यांचा तो अधिकार होता. त्यांनी तसं प्रत्येकाचं कोडकौतुकाने केलंही होतं प्रेमाने! "काय काकू?" "अरे, पुढच्या दोनचार दिवसात माझे पोष्टात ठेवलेले दहा हजार रुपये सुटताहेत बघ! त्याचं काय करावं म्हंणतोस? पुन्हा कुठे गुंतवावेत?" मी काकूंचा अर्थिक सल्लागार होतो. "सांगतो काकू तुम्हाला एकदोन दिवसात. काही चांगल्या स्कीमस आहेत!" "सांग बाबा! हो, पण या वेळेला पुन्हा सगळे नाही हो मी गुंतवायची! थोडे ठेवणार आहे मला हाताशी!" चेहेर्‍यावर मिश्किल छटा होती. स्वत:वरच खुश दिसत होत्या! "का हो काकू? काय खर्च काढलात?" मीही तेवढ्याच मिश्किलतेनी विचारलं! "अरे काही नाही रे, आमच्या राधाबाईंच्या सुमनचं लग्न ठरलंय. राधाबाईंनी नशीब काढलं हो! जावई चांगला मिळालाय म्हणत होत्या. माझ्याकडे गेली तीन-चार वर्ष मदतीला येताहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलीला मी घरी जेवायला बोलावून केळवण करणार आहे. साडीचोळी, आहेराचंही थोडंफार काही देईन म्हणत्ये! मग त्याकरता पैसे नकोत का?!" मी थक्क होऊन फक्त ऐकत होतो. याला म्हणायचं हौस! याला म्हणायचं आनंदाने जगणं, दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं! खासच होत्या आमच्या मोघेकाकू! उंचीने थोड्या बुटक्या, अंमळ स्थूल, गोल चेहेर्‍याच्या, दात पुढे असलेल्या, मोठ्ठ्या आवाजाच्या मोघेकाकू रंगारुपानं म्हणाल तर दिसायला जेमतेमच होत्या. परंतु त्यांचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, वागणं नेहमी इतकं छान नी मनमोकळं असायचं की त्या सुरेखच दिसायच्या! या बाईच्या मनात विष नावाचा प्रकार कधी आलाच नाही, कुणाबद्दलही नाही, कधीही नाही! आपण बरं, आपले कष्ट बरे! परिस्थितीविषयी तक्रार नाही की कधी कुठलं रडगाणं नाही. वर शिवाय, 'अहो त्यात काय एवढं? मी करीन की!', 'त्यात कसले आलेत कष्ट, मी करीन की!' असं म्हणून सदैव लोकांना मदत करायला तयार! मोघेकाकू चाळीतल्या प्रत्येकच कुटुंबाच्या कधी ना कधी उपयोगी पडलेल्या! आणि एवढं करूनही कधी केलेल्या मदतीचा एका शब्दाने उच्चार नाही की अहंकार नाही! त्यांच्या जीवनगाण्यात 'पुण्यपर उपकार' हेच शब्द होते, 'पाप ते परपीडा' या शब्दांना तिथे स्थान नव्हतं! चाळीत कुणाकडेही मृत्यु झाला की पिठलंभाताचा कडूघास हा मोघेकाकूंनीच द्यायचा, असा जणू अलिखित नियमच होता! चाळीतल्या प्रत्येक सुखा-दु:खात मोघेकाकूंचा काहितरी ठळक सहभाग असायचा, ठसा असायचा! "तात्या, पटकन जरा इकडे ये!" "काय काकू?" "अरे आधीच खूप उशीर झालाय. ह्या उपम्याची चव बघ आणि कसा झालाय ते सांग मला पटकन! मला बघता येणार नाही, संकष्टी आहे आज माझी!" जवळच कुठेसं एक १५-२० खाटांचं हॉस्पिटल होतं, तेथील रुग्णांना सकाळचा उपमा करून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट सातपुते डॉक्टरांनी मोघेकाकूंनाच दिलं होतं. मोघेकाकू आता घाईघाईने आणि लगबगीने ताजा आणि गरमगरम उपमा घेऊन हॉस्पिटलात चालल्या होत्या! "ठीक आहे ना रे चव? नाही, आपण चार पैसे घेतो म्हटल्यावर माल नीट नको का द्यायला? अरे त्यातून ती आजारी माणसं! थांब, हा मोतीचुराचा लाडू खा, मी निघत्ये आता. नाहीतर 'मोघेकाकूंनी फक्त उपम्याची चव घेण्याकरता बोलावलं, असं म्हणशील!'" असं म्हणून मनमोकळेपणाने हासत माझ्या पाठीत एक धपाटा मारला! मी प्रेमातच होतो या बाईच्या! मी काय, आख्खी चाळच होती! "अरे हो हो, भेळ तयार तर होऊ दे मेल्यांनो! अजून सगळी नीट मिक्स करायची आहे मला तर आधीच हात घालून लागले खायला!" मोघेकाकूंनी चाळीतल्या आम्हा सगळ्या पोराटोरांना, टोणग्यांना दम भरला. त्या दिवशी होळी होती. होळी म्हटलं की चाळीत एकच धमाल असायची! गेली अनेक वर्ष त्या दिवशी चाळीत भेळ अन् मसालादुधाचा मेनू ठरलेला. ते कराण्याचं कॉन्ट्रॅक्ट अर्थातच मोघेकाकूंकडे! चाळीतली पोरंटोरं, बालगोपाळ मंडळी, तरणी मंडळी आता होळी पेटवायच्या तयारीत. आमच्या मोघेकाकू नेहमीप्रमाणे एकदम फार्मात! होळीची पूजा, तिला पुरणपोळीचा नेवैद्य हे सगळं सगळं मोघेकाकू करणार आणि सबंध चाळ त्यात सहभागी होणार! मोघेकाकू आमच्या म्होरक्या! पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. छातीत दुखू लागलं, कळ आल्याचं निमित्त झालं आणि मोघेकाकू कोणताही गाजावाजा न करता, अगदे शांतपणे देवाघरी गेल्या! एकंदरीत पाच मिनिटात सगळा कारभार आटपला. एक कृतार्थ, कष्टाळू, परोपकारी जीवन आता संपलं होतं. चाळीचा आधारवृक्षच कोलमडला होता, चाळ पोरकी झाली होती! जगाच्या दृष्टीने म्हटलं तर एका चाळीतली एक सामान्य बाई, पण आमच्याकरता मात्र तेवढीच असामान्य! तिच्यातलं असामन्यत्व आम्ही वेळोवेळी पाहिलं होतं, अनुभवलं होतं! त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! आता कुणाला हातावर पटकन बेसनाची वडी मिळणार नव्हती की मोतीचुराचा लाडू मिळणार नव्हता! नाना आठवल्यांना कुठल्याही औषधापेक्षा गुणकारी ठरणारी मायेची, आपुलकीची आल्याची वडी मिळणार नव्हती! सांत्वन तरी कोण कुणाचं करणार आणि पिठलंभाताचा कडूघास तरी कोण कुणाला देणार? चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! -- तात्या अभ्यंकर.

वाचन 18828 प्रतिक्रिया 0