रिक्षा
Taxonomy upgrade extras
रिक्षा
फळांनी लगडलेल्या झाडासारखी दिसणारी
दप्तरांनी लगडलेली एक रिक्षा
रोज सकाळी माझ्या दारासमोर थांबते.
एका विशिष्ट आवाजात हॉर्न वाजतो
आणि शाळेची तयारी करत असलेल्या
माझ्या मुलाची एकदम धावपळ होते.
घाईघाईत घातलेला युनिफॉर्म,
अर्धवट बांधलेली बुटाची लेस, विस्कटलेले केस
अशा अवतारात
भलं मोठं दप्तर, डबा, वॉटरबॅग सारं सांभाळत
तो रिक्षाकडे धावतो, त्याचंही दप्तर रिक्षाला लटकतं.
रिक्षातले त्याचे मित्र त्याला टप्पल मारतात,
तो त्यांना वेडावून दाखवतो, रिक्षा निघून जाते.
मग मी निवांतपणे पेपर उघडतो...
अपघात, खून, मारामार्या, भ्रष्टाचार, बलात्कार, झुंडशाही,
दगडफेक, रास्तारोको, जाळपोळ, लाचलुचपत, रोगराई, प्रदूषण,
बॉम्बस्फोट, दंगली, विषबाधा, वासनाकांड, अधांतरी सरकार
इत्यादींच्या रोजच्याच बातम्या पुन्हा पुन्हा वाचतो.
माझ्या देशाचं काळवंडलेलं भविष्य भेडसावत राहतं मला.
डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा
आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे...
या रिक्षात बसून ही मुलं नेमकी कुठं चालली आहेत?
-अविनाश ओगले
वाचन
3700
प्रतिक्रिया
0