मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एप्रिल फळ (८)

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) आंबा खाण्याची माझी सर्वात आवडती पद्धत सांगतो. मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा. त्याच्या तलम सालीचा स्पर्श अनुभवावा. त्याचा घमघमाट नाकापासुन फूटभर अन्तरावरुनही येत असतो .टोकाकडुन आंब्याचे साल दाताने सोलावी. आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी. खाण्या अगोदर डोळे बन्द करुन तो गुळगुळीत स्पर्श ओठानी अनुभवावा.आणि आता कशाचीही वाट न पहात बसता आंबा एकेक तुकडा तोंडात घोळवत सम्पवुन टाकावा. आहाहा त्या स्पर्शाने , राजेशाही वासाने , तलम स्पर्शाने ,राजवर्खी केशरी दर्शनाने आणि ताँडात घोळवत खालेल्ल्या स्वर्गीय चवीने मन एकदम तृप्त होते . मनात कोठेतरी स्वर्गीय संगीत ऐकु येउ लागते.अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो. नाक कान डोळे स्पर्श आणि जीभ या पन्चेन्द्रीयना तृप्तीचा अनुभव देउन खाणार्‍याला श्रीमन्त करणारा आंबा हा खराखुर्रा सम्राट शोभतो.. मे संपता संपता पावसाची चाहुल लागते.आकाशात वारंवार नजरा जाऊ लागतात. आई वहिनी आत्या वगैरे महिला वर्ग लोणचे करणे आम्बोळ्या कुरडया, पापड सालपापडाचे वाळवण इत्यादी बेगमीच्या कामात मग्न असतात. मुलानाही शाळेचे वेध लागलेले असतात. सूट्टी संपता संपत नसते लोळत पडण्याचाही कंटाळा आलेला असतो. पत्ते , बुद्धीबळे , कॆरम अस्ताव्यस्त विखुरलेले असतात. काय करावे हा मोठाच प्रश्न असतो. आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते. अशात एकदम दूरून एक मस्त आरोळी ऐकु येते...........आssssssssssल्फ़ीये कुल्फ़ी मलाsssssssय. कुल्फ़ी मलैssssssय. पाउल जागच्या जागी थबकते. कंटाळ्यामुळे बधीर झालेले डोके एकदम चालु लागते.खीडकीतुन कुल्फ़ीवाला कुठे दिसतो याचा अंदाज घेत प्यान्टचे खिसे , टेबलाचे ड्रॊवर , पेन स्टेन्ड , गादीखाली , उशीच्या अभ्र्यात असे ठेवणीच्या गुप्त जागेत लपवलेले चिल्लर धन बाहेर येउ लागते. डोक्यावर माठ ठेवलेला कुल्फ़ीवाला दिसला की अक्षरश: भक्ताला देव भेटल्याचा आनन्द होतो. आसपासच्या दोनचार खिडक्यातुन ओ कुल्फ़ी......थांबा अशा हाका ऐकु येतात.आणि मुले घराबाहेर पळ काधतात. घराच्या दारात्च कुल्फ़ीवाला त्याची ती माठ असलेले बाम्बुची टोपली अलगद उतरवुन ठेवतो तेंव्हा त्याचा थाट पहाण्यासारखा असतो. त्या्चा तो मिठाच्या बर्फ़ाने भरले्ला माठ. एखाद्या खालसा संस्थानाच्या कारभा-याने संस्थानचा खजी्ना दाखवावा तसा तो अलगद माठावरचे कापड बाजुला करतो त्यात बर्फ़ाच्या पाण्यात तरंगणा-या कुल्फ़ीच्या लोखंडे साचाच्या डब्या मुले अगदी अधाशासारखी पहात असतात.कुल्फ़ीचा साचा धरण्याची ती ढब . साचाच्या डबीवरील ते कणकेचे सील नखाने बाजुला काढले जाते.मुलांची इत्सुकता शीगेला पोहचलेली असते. साच्याचे डबीचे झाकण मोकळे होते . ती शंकु च्या आकाराची काळपट डबी तिरकी धरुन गुढग्यावर मूठ आपटत त्यातुन पांढरी शुभ्र कुलफ़ी बाहेर काढली जाते. बाहेर येणा-या कुल्फ़ीबरोबर पहाणाराचे डोळे विस्फ़ारत जातात. अखेर शेवटी ती कुल्फ़ी वडाच्या पानावर आडवी ठेवुन चाकुने तीचे काप होऊन जेंव्हा ते वडाचे पान कुल्फ़ी सहीत हातात पडते तेंव्हा मनात कुल्फ़ीशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही. इतकी एकाग्रता जर कोणी देवधर्मात प्रार्थनेत दाखवली तर देव ती प्रार्थना संपायच्या आतच प्रसन्न होऊन दर्शन देईल. वडच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.कुल्फ़ी एकच खाउन थांबला असे जर कुणाच्या बबतीत झाले असेल तर तो मनुष्य हा जितेंद्रिय पदाला पोहोचलेलाच असला पाहिजे. हळुहळु त्या कुल्फ़ीवाल्या जवळ गर्दी जमते. मघाशी त्या पापडकुरडया जवळ फ़िरकु न देणा-या आयाबाया ती कामे सोडुन कुल्फ़ीच्या खजिन्या भोवती गोळा होतात. कुल्फ़ीवाल्याच्या माठातुन शेवटीशेवटी शोधुन्शोधुन कुल्फ़्या काढल्या जातात. माठातल्या कुल्फ़्या संपल्या की मगच कुल्फ़ीवल्याला जाऊ दिले जाते. कुल्फ़ीवाला जातो ना जातो तोच दुसरा एक आवाज येतो..........हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना...... मुली याची वाटच बघत असतात. काळीशार करवंदे....निरागस पण अवखळ लहान मुलाच्या खट्याळ डोळ्यांची आठवण व्हावी असेच ती पाटीत ठेवलेली मण्यांसारखी करवंदे पाहुन वाटते. किंचित आम्बट आणि गोड अशी चव...नुसती सांगुन कलणार नाही ती चाखायलाच हवीत. करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो. ज्याला जास्त कावळे तो त्या दिवशी जिंकला असे आम्हाला वाटायचे. करवंदे खाताना एक गम्मत असते...करवंदे खावीत तर गच्चीत बसुन नाहीतर घराच्या कट्ट्यावर बसुन....करवंद हे फ़ळ सोफ़्यावर बसुन सगळे शिष्ठाचार पाळुन खाण्याचे नव्हेच. ते चाखत माखतच खायचे असते. करवंदांच्या फ़्यामिलीत जमा होईल असा चन्यामन्या नावाचा बोरांचा एक प्रकार असतो. नुसते नाव काढले तरी जिभेला पाणी सुटते. लालसर केशरी बारीक मोत्या सारखी दिसणारी किंचीत सुरकुतलेली ती फ़ळे इतकी आम्बट असतात की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. त्याला मिठाची जोड असेल तर काय विचारु नका. पण ती सुद्धा खायची एक पद्धत आहे. कागदाचा त्रिकोनी द्रोण करुन त्यात अंदाज लागणार नाहीत इतकी चन्यामन्या बोरे त्यात भरायची आणि रस्त्याने रमतगमत जात खायची. आंबटपणामुळे जीभ जास्त वेळा टॊक्क करते की डोळे जास्त वेळा मिचकावले जातात आशी स्पर्धा सुरु असते. करवंदे इतकी आंबट नसतात. पण ती त्यांच्या जादूई चवीमुळे वेड लावतात हे मात्र नक्की. करवंदे एकेक करुन चाखत माखत खाणे आणि एकदम त्यांचा बकणा भरणे ...हे दोन्ही प्रकार अजबच आनन्द देतात. एकेक करवंद जिभेवर घोळवत खायचे.आणि दहाबारा करवंदे एकदम चावायची मजा वेगळीच. करवंदांच्या बिया चावताना च्युईंगम खाल्ल्याचेही सूख मिळते. करवंदांबरोबरच येतात ती जांभळे.आमच्या गावात जवळच एक जाम्भळाचे जंगल आहे. बघावे तिकडे जांभळाचेच झाड. अक्षरश: झोपुन तोडता येतील इतक्या खाली वाकलेल्या फ़ांद्याम्वर असतात जांभळे तेथे ही छोटी जाम्भळे मिळतात. साल आणि बी यात अंतर फ़ारसे नसते. गर वगैरे चैन नसते. पण ही जांभळे चवीत मात्र लाखात एक. खाताना असेच हवे तसेच हवे अशी उगाच मिजास नसते. जे मिळेल त्या भांड्यात घेउन खावी. न मिळाल्यास ओंजळीत घेउन खावी. हां पण एक आहे जेथे रस्ता जवळ असेल अशाच जागेवर बसुन / उभे राहुन खावी. लहानपणी आम्ही भावंडे ही जाम्भळे घराच्या खीडकीत उभे राहुन खायचो.आणि बीया जोरात रस्त्यावर उडवायचो. तोंडाने उडवुन कोणाची बी जास्त लाम्ब जाईल ते पहायचो. दुसरी जांभळे असतात ती जरा जाड खात्यापित्या घरची. त्याना गर असतो. आम्बटपणा कमी असतो पन गोडवाही कमी असतो. ही जाम्भळे खाताना साल दातानी सोलुन आतला पांढरा नीळा गर उगाचच टिनोपालच्या जहिरातीची आठवण करुन देतात. जाम्भळे करवंदे डहाणु घोलवडकडे मिळणारे पाण्याच्या चवीचे जाम. ही सारे असतात कोकणचा मेवा त्याना आंब्याइतके कोणी फ़ारसे ओळखत ही नाही. पण ज्याना ती माहित आहेत त्याना ते कोठेही असो प्रत्येक मोसमात या मेव्याची हटकुन आठवण होतेच. मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो.. (क्रमशः)

वाचन 16879 प्रतिक्रिया 0