नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का?
नेहमीच मिसळपावावर काही नवीन सदस्य येत असतात. अशांपैकी काही सदस्यांना आपले लेख आणि कविता तसेच प्रतिक्रिया मिपावर देण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने लिहीलेल्या लेखांना आणि कवितांना अपेक्षित प्रतिक्रिया आल्या नाहीत, किंवा वात्रट किंवा तिखटही प्रतिक्रिया आल्या की नवीन लेखक निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या मिपाकरांना अशा प्रतिक्रिया नवीन नाहीत. पण नवीन लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने आणि मराठी संस्थळांवर घडलेल्या घडामोडींबद्दल आणि जुन्या सदस्यांच्या पूर्वानुभवांविषयी कसलीही माहिती नसल्याने कधी नव्याजुन्या सदस्यांचे प्रतिक्रिया आणि साहित्यावरून वाद होतात, खटके उडतात, आणि यांचे स्वरूप तीव्र होते असे दिसते. या वादांची कारणे सर्वच चुकीची असतात असे नाही. सर्वच बरोबर असतात असेही नाही. यातील सर्व वादांची कारणे दूर करता येणे शक्यही नाही आणि गरजेचेही वाटत नाही. पण यापैकी अनेक वाद हे केवळ लेख किंवा प्रतिसाद कशा पद्धतीचे असावे ह्याची कल्पना नसल्यामुळे झालेल्या वादावादीतून घडलेले असतात असे लक्षात येते. म्हणून सर्वांनाच काही प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे आपापल्या विचाराने द्यावी. या धाग्याचा उपयोग इथले आपले लेखन अधिक चांगले आणि वाचकांसाठी आकर्षक कसे होईल यासाठी मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून करावा. नवीन सदस्यांना जसा याचा उपयोग होईल तसा जुन्याही सदस्यांना आपले लेखन सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटते. यातून जे काही कळेल ते संक्षिप्त स्वरुपात मांडण्याची जबाबदारी माझी.
काही प्रश्न मांडते, माझी विस्तृत उत्तरेही नंतर देईनच. नवीन लेखकांनीही सहभाग घ्यावा, परंतु जुन्या मिपाकरांकडूनही अधिक कल्पना येतील अशी आशा आहे.
१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?
४. एका लेखकाकडून येणार्या लेखनाची वारंवारिता काय असावी?
५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि
६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?
माझी (सध्या) संक्षिप्त उत्तरे:
१. होय. नव्या-जुन्या लेखकांनी प्रमाणलेखनाकडे विशेष लक्ष पुरवावे असे वाटते.
२. लेखकाच्या स्वतःच्या अशा नजरेतून/अनुभवांतून आलेले असे सकस, शब्दांची अचूक निवड करून केलेले लेखन.
३. बराच फरक आहे. स्वतःच्या ब्लॉगवर काय प्रतिक्रिया दिसतील यावर आपला अधिकार असतो. संकेतस्थळांवर तसा तो नसतो. जे येते ते आपले म्हणावे लागते. :)
४. कठीण प्रश्न आहे. काही लोक फार कमी लिहीतात तर काही फार जास्त. काही एकदम बरेच लिहीतात आणि मग अनेक दिवस काहीच लिहीत नाहीत. पण जे संकेतस्थळांवर कार्यरत आहेत अशांकडून आठवड्यातून फारतर दोन लेख किंवा एखादी कविता हे ठीक वाटते.
५. माझे मत लेख वाचण्यासाठी नेहमीच्या ब्राऊजरवर फार खाली स्क्रोल करावे लागू नये. एखादा लेख मोठा असला तरी पाच-सहा भागांत असावा. फार अंतर असू नये - एखाद्या दोन दिवसांचे अधिकाधिक अंतर असावे.
६. माझ्या मते आवडलेले सांगणे सोपे असते, नावडलेले सांगताना आपले स्वभाव मध्ये येतात. न आवडलेले सांगताना काय आवडले नाही, आणि का आवडले नाही हे स्पष्टपणे आणि अवमानकारक भाषा टाळून सांगितल्यास लेखकांना पुढील लेखनास मार्गदर्शन होते.
वाचन
12275
प्रतिक्रिया
0