मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रहस्यकथा भाग १

सहज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात. तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली. ह्या वर्षीचा सोहळा, आमच्या आवडत्या भूतंखेतं व गूढं साहीत्यकार भयालीदेवी यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ( दरदरून घाम फूटवणे कॅटेगरी) जाहीर झाला असल्याने, विशेष होता. काही महीन्यांपुर्वी इ-मेल द्वारे भयालीदेवींना मुलाखतीसाठी विचारले होते. "भेट होणार, अजून वेळ आली नाही. कधी ते मी सांगेन" इतकेच उत्तर आल्याने आधीकच बुचकळ्यात पडलो होतो. पण आता मात्र आपल्या आवडत्या साहीत्यकाराला प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळणार होती. कितीतरी प्रश्र मनात होते कधी भेट होईल, अन काय विचारु असे होत होते पण आयत्यावेळी तोंडातून शब्द फूटेल का? ही भीती सतावत होतीच. उद्धाटनाच्या दिवशी, डौलदार चालीच्या अत्यंत पुष्ट अश्या काळ्याभोर अश्वांच्या बग्गीतून उतरून, त्या रेड कार्पेट (आख्यायीका - रेड कार्पेट -खूप शतकांपूर्वी म्हणे खरे नरबळी देऊन म्हणजे रक्ताने माखलेल्या पायघड्या घालून त्यावरून चालत जायचे की कसली भूतबाधा होत नसे !) वर आमच्या आवडत्या लेखीका जाताना दिसल्या, पौर्णीमेच्या निरभ्र आभाळाच्या काळसर गडद निळ्या रंगाचा तलम युरोपीयन रेनेइसन्स पद्धतीचा गाऊन, डोक्यावर त्याच रंगाची मखमली आकर्षक शिवणकाम केलेली कॅप ज्यावर एका बाजूला एक काळा गुलाब, त्यावर एक रक्ताचा ठीपका, मोठा उठून दिसत होता. हलकी नक्षीदार जाळी त्या कॅपच्या पुढल्या बाजूने चेहर्‍यावर आली असल्याने अपूर्‍या प्रकाशात ते रुप अजूनच रहस्यमय भासत होते. जितके पूढे जाता येईल तितके जाऊन, मी काही बोलणार तेवढ्यात, माझ्या दिशेने डोळे रोखून बघत "उद्या रात्री मुलाखत, ठीक ११ वाजता माझ्या व्हीला मधे या." कानावर पडलेले हे शब्द माझ्या मनाचे भास की खरच मला यायला सांगीतले काही कळायच्या आत ती आकृती त्या रेड कार्पेट्च्या दुसर्‍या दिशेला पोहोचली पण होती. काही क्षणाने भानावर येताच आपल्या हातात, भयालीदेवी, १३, पुरानी हवेली, अंधेरी गल्ली, लास वेगास. हे कार्ड दिसले. रहस्यभेद झाला ह्या समाधानापेक्षा ओह! आता उद्या काय, कसे होणार, ह्या चिंतेने मला ग्रासले. भाग २ इतक्यात किंवा कधी येईलच असे नाही. हा केवळ भयकथा / रहस्यकथा प्रकार लिहता येते का हे बघायचा पीजे टाकणार्‍या लेखकाचा यत्न जाणावा. कोणाला ह्या भागाला धरून लगेच लेखन करायचे असेल तर परवानगी आहे.

वाचन 17784 प्रतिक्रिया 0