सणांचे नैवेद्य आणि फराळ ३) गोकुळ अष्टमी - तांदळाचे/कुरमुर्याचे/कुटयाचे लाडू
गोकुळ अष्ट्मिला हे लाडू नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे.
तांदूळ
गुळ
वेलची, जायफळ पुड
ड्राय फ्रुट्स आवडीनुसार
तुप
मिठ
थोड सुक खोबर किसुन भाजुन
डिटेल प्रमाण पाककृतीत देत आहे.
पाककृती:
साधारण १ किलो किंवा आपल्या गरजेनुसार तांदुळ घेउन ते रात्री धुवुन पाणी व थोडे मिठ घालुन भिजत घाला.
सकाळी हे तांदुळ निथळवा.
आता लगेच निथळवलेले तांदुळ भांड्यात मिडीयम गॅसवर खरपुस तांबुस रंग येईपर्यंत परतवा. करपु देउ नका.
तांदुळ जर जास्त प्रमाणात असतील तर गिरणीत चरट दळून आणा. जर कमी असतील तर मिक्सरमध्येच पिठ करा. मिक्सरमध्ये एकदम पिठ होत नाही जरा रवाळच राहत.
आता थोडे पिठ बाजुला काढुन ठेवा. हे चहात टाकुन किंवा दुधात साखर घालुन फुगवुन खायला छान लागत. लहान मुलांना फेव्हरेट व पौष्टिक होउन जात. त्याचा खमंग वासच एक प्रकारची चव आणते.
आता हवे तेवढ हे पिठ एका भांड्यात घ्या.
जेवढ पिठ घेतल असेल त्याच्या अर्धा गुळ सुरीने बारीक चिरुन घ्या. सुक खोबर कुस्करुन घ्या. थोडी वेलची व जायफळ पुड घ्या. पिठाच्या पाव पट तुप वितळवुन घ्या.
आता सगळे जिन्नस एकत्र करुन गुळाच्या गुठळ्या हातावर मोडा. (हेच मिश्रण मोठ्या खलबत्यात कुटून कुटुनही केले जाते. त्याची एक वेगळीच चव येते.)
सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन लाडू वळायला घ्या. जर लाडू वळायला त्रास होत असेल तर अजुन थोडे तुप मिसळा व लाडू वळा.
तयार आहेत खमंग कुरमुर्याचे उर्फ कुट्याचे उर्फ तांदळाचे लाडू.
अधिक टिपा:
पुर्वी हे लाडूचे मिश्रण खलबत्त्यात कुटून कुटुन केले जात म्हणून त्याला कुट्याचे लाडू म्हणत.
ओले तांदूळ भाजुन घेतल्यावर ते मस्त कुडकुडीत होतात. तेच नुसते खाल्ले जातात.
पिठी साखर घालुनही हे करता येतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या लाडूचे पिठ चहात व दुधात साखर घालुन खातात. दोन चमचे एका कपात पण खुप होतात. लगेच पिठ फुगुन येत.
वाचन
9257
प्रतिक्रिया
0