<बॅचलर चहा>
सध्या आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या पदार्थांची पाककृती मिपावर टाकण्याची टूम निघाल्यामुळे अशाच एका दैनंदिन पदार्थाची पाककृती इथे देत आहे.
ऑनसाईट व्हायच्या बेतात असण्यार्या मिपाकरांसाठी काही टिप्स या पाककृतीतून मिळतील.
पाककृती फोटोसह आहे त्यामुळे चहा किती झटपट करता येतो हे दिसून येईल.
साहित्य:
-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)
कृती:
१. कपामध्ये पाणी उकळावे.
२. उकळत्या पाण्यात टी बॅग सोडावी.
३. तीन-चार मिनिटे मुरू दिल्यावर ४-५ वेळा पाण्यात हलवून मग टी बॅग काढून टाकून द्यावी. चहाचे पाणी आणखी २-३ मिनिटे तसेच ठेवावे. म्हणजे ते थोडे थंड होईल.
४. मग यात डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे मिश्रण भुरभुरत टाकावे. एकदम बचकन टाकू नये. गुठळ्या होतील. चमच्याने ढवळून घ्यावे. चहा तयार. व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.
टीप : वरच्या साहित्याच्या फोटोत मोठा मग दाखवला आहे कारण हीटर पाण्यात पूर्ण बुडावा लागतो. पाणी मगमध्ये गरम केले तरी चहा नॉर्मल कपात बनवावा.
*डेअरी व्हाईटनर मध्ये साखर असते त्यामुळे डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे ३:२ या प्रमाणात मिश्रण मी वापरतो. त्याने चहा फार गोड बनत नाही. मिश्रण करून ठेवण्याचा दुसरा फायदा म्हणजे साखर असल्यामुळे ते चहात टाकताना तरंगत नाही आणि गुठळ्या होत नाहीत. नेसलेचे "एव्हरीडे" हे "अमूल्या"पेक्षा अधिक चांगले रिझल्ट देते.
** गोडे पाणी वापरले की हीटरच्या कॉईलवर कालांतराने मिठाचा थर बसत नाही.
आधी दूध बनवून त्यात टी बॅग टाकली तर चहाचा अर्क नीट उतरत नाही.
सूचना: ज्यांना चहा गॅसवर उकळून डायरेक्ट घशात ओतण्याइतका गरम लागतो त्यांच्यासाठी हा चहा कामाचा नाही. :(
वाचन
16036
प्रतिक्रिया
0