मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नैवेद्य १) मोदक

जागु · · पाककृती
प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे. साहित्य तांदळाचे पिठ मिठ १ ओला नारळ खरवडून गुळ खसखस चारोळी/काजु/आक्रोड/मनुका वेलची/केसर तुप पाककृती तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या. गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला. थोडा वेळ परतुन गॅस बंद करा. आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका. पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या. आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा. वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा. आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या. Image removed. Image removed. मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्‍या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे. Image removed. अधिक टिपा : उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात. वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते. मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे. साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात. (नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)

वाचन 9665 प्रतिक्रिया 0