पोचलो का आपण?
लेखनविषय:
मिरजेला मध्यरात्र झाली,
पाच तास लेट निघाली
गोमंतक एक्स्प्रेस -
आई मला झोपवलेस
"उद्या सकाळी असू घरी..."
उजाडले होते थोडेच तरी
पहाटे डोळे किलकिले
करून मी उघडले -
"आई, पोचलो का आपण?"
"बेळगावच आहे, बघ पण...
गारवा मस्त पडला आहे.
बाबांनी कुंदा आणला आहे
आताच इथला ताजा ताजा
जा, पटकन तोंड धू, जा..."
सकाळची उन्हे झाली जून
प्रवास संपत नाही अजून
बाबा म्हणाले, "लोंडा जंक्शन!
इथे उलटे फिरणार इंजिन..."
"बाबा तुम्ही दोघे जा
बघाच इंजिनाची मजा"
खळ्ळकन इथून डबे सोडून
तिकडे जाऊन घेतलेन जोडून.
भर दुपारी घाटात गाडी
थांबत सरके थोडीथोडी
बोगद्यात होता अंधार दाट
किती बघू पोचायची वाट?
"बाबा गाडी नाहीच का पोचणार?"
"बाळ, घर येणार तेव्हा येणार,
गाडी मात्र जोवर हलतेय
सारखी कुठेतरी पोचतेय!
बोगद्यापलीकडे दबा
धरून बसलाय धबधबा
दारामध्ये उभे राहू
मनसोक्त भिजून घेऊ!"
वाचन
9175
प्रतिक्रिया
0