मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जत्रा-१

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बुंडेसलिगाच्या फुटबॉल मॅचेस चालू झाल्या की बरेच जण टोळक्याटोळक्याने स्पोर्ट्स बार मध्ये 'म्याच' पहायला जमतात. पूर्वी नाही का क्रिकेटची म्याच पहायला गल्लीत टीव्ही असलेल्या एकुलत्या एका घरात सगळे हक्काने जमायचे ,नाहीतर मग दुकानातल्या टीव्ही समोर गर्दी करायचे,तसेच काहीसे..आपापल्या घरात एकट्याने मॅच पाहण्यात काय मजा? म्हणून मग असे टोळक्याने एखाद्या स्पोर्ट्स बार मध्ये जाऊन मोठ्ठ्या पडद्यावर दंगा करत म्याच पहायची.अशाच एका गुरूवारी ख्रिसने फ्रांकफुर्ट विरुध्द बायर्न म्युनशन ची फुटबॉल मॅच पाहण्याचे आवताण दिले.म्याच सुरू व्हायला अजून अर्धा तास होता तरी मेरीयॉटच्या स्पोर्ट्स बार मध्ये भरपूर गर्दी जमली होती.जागा मिळेल तिथे लोकं बसले होते,उभे होते,पोमीज्,वुर्ष्ट खाणे आणि बिअर पिणे चालू झाले होते. आम्ही जागा शोधत होतो,एवढ्यात फ्लो दिसला.आमची वाट पाहून,जागा पकडून वैतागलाच होता जरा.आजूबाजूला फुललेली जत्रा पाहत,म्याच सुरू होण्याची वाट पाहत आम्हीही खानपानाची 'आर्डर' दिली.फ्रांकफुर्टचं काही खरं नाही.बायर्न म्युनशन वाले त्यांना कच्चे खातील हे भाकित थोड्याच वेळात खरे ठरू लागलं आणि साहजिकच आमच्या गप्पांची गाडीही म्युनशनवर उतरली.
"ऑक्टोबर फेस्ट चालू आहे ना,कॉलेजात असताना नेहमी जायचो आम्ही मित्र. हल्लीच नाही जमत! तुम्हाला पण पहायचा आहे ना ऑक्टोबर फेस्ट? जाऊया का जत्रंला?" आम्ही हो/नाही म्हणायच्या आतच ,"पण हाटेलं सगळी ओवरफुल्ल असतात आणि इवेंट प्राइस लावतात लेकाचे.त्यापेक्षा आपण मोनीलाच विचारू या तिथे ती आहे का ते."ख्रिस स्वत:च प्रश्न विचारत होता,स्वतःच उत्तरं देत होता.लगेचच त्याने मोनीला फोनही लावला आणि शनिवारीच आम्ही तिथे टपकणार असल्याचे तिच्या कानावर घातले.मोनी ,ख्रिसची मोठी बहीण ,म्युनशन मधील एका शाळेत इंग्रजी आणि इतिहास शिकवते.ऑक्टोबर फेस्टचे वातावरण असल्याने शाळांमध्येही सगळे उत्सवीच वातावरण होते.ख्रिसने लगेच बटाटेवड्यांची 'आर्डर' दिली.वाटेत मॅकदादाकडे थांबून वेळ जायला नको! आपल्याला स्लिपिंग बॅग न्यायला लागतील.तिच्याकडे एवढ्या जणांसाठी अंथरुण पांघरुण नाही. अशा गप्पा सुरू झाल्यावर मॅच मधले लक्षच उडाले.म्याच मग सोडूनच देऊन आम्ही शनिवारचा बेत ठरवू लागलो. ख्रिसची फोल्क्स वागन सुसाटत निघाली ती मानहाईमलाच थांबली.सुझन पण तिथे अजून शिदोरी घेऊन तयारच होती.तिला घेऊन हमरस्त्याला लागलो आणि ख्रिसबाबाने गाडी भलतीकडेच वळवली.बोरीस बेकरने बांधलेले आइस हॉकीचे स्टेडीयम त्याला आम्हाला दावायचे होते.ते अप्रतिम स्टेडीयम पाहण्यात वेळ गेला खरा पण मुद्दाम कोण आइस हॉकीचे स्टेडीयम पाहण्यासाठी येणार होतं?गाडी ऑटोबानला म्हणजे फ्रीवेला लागल्या लागल्या ख्रिसने ब.वडे हाणायला सुरूवात केली. नेवीगेशन सिस्टीमवर सरळ पुढे जा असा संदेश येत होता आणि ख्रिस मात्र लेफ्ट टर्न घेऊन परत एकदा तिसर्‍याच रस्त्याला लागला होता."आता काय रे आणखी? उशीर होईल ना आपल्याला,आधीच स्टेडीयमवर बराच वेळ गेला आहे.मोनी वाट पाहत असेल ना." उत्तरादाखल मोनीला भटक्यावर संपर्क करून आम्हाला समोर पहायला सांगितले त्याने.तर समोर "काँकार्ड म्युझियम"ची पाटी! आश्चर्याचे सानंद सुखद धक्के बसत होते.उत्साहात आम्ही सगळे आत घुसलो.तिथे एक काँकार्ड विमान आतून पाहण्यासाठीही खुले आहे.लहान मुलाच्या कुतुहलाने आम्ही आत शिरलो.मनसोक्त आणि अर्थातच मनात काँकार्ड सवारी करून मग पुढे निघालो. फ्रांकफुर्ट -म्युनशन साधारण ६०० किमी अंतर १५०/१७५ च्या वेगाने सुसाटत जात होतो,मध्ये मध्ये ही आकर्षणं आम्हाला थांबवत होती.१० च्या पुढे आम्ही एकदाचे मोनीकडे पोहोचलो.गाडीतून उतरल्यावर आल्प्स ची थंडी जाणवायला लागलीच.गरम गरम टोमॅटो सूपचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या.गप्पा सगळ्या ऑक्टोबर फेस्ट भोवतीच फिरत होत्या अर्थात!इतिहासाच्या मोनीबाईंनी आम्हाला उत्साहाने माहिती पुरवली. इस.१८१० मध्ये बव्हेरियाचा राजपुत्र लुडविक आणि साक्सनची राजकन्या थेरेसा यांच्या विवाहाच्या मेजवानी प्रित्यर्थ १२ ते १७ ऑक्टोबर असा पहिल्यांदा हा सोहळा झाला.घोड्यांच्या शर्यतीने त्याची सांगता झाली तेव्हापासून आजतागायत म्युनशेनचा ऑक्टोबर फेस्ट त्याचे वैशिष्ठ्य टिकवून आहे.पुढे मात्र ऑक्टोबर मधल्या थंडगार हिवाळ्यात याचा आस्वाद घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता तो सप्टेंबरच्या शेवटून दुसर्‍या शनिवारी सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो.जर १ किवा २ ऑक्टोबरला शनिवार/रविवार आला तर ३ ऑक्टोबरच्या रियुनिफिकेशनच्या सुट्टीचा मोका साधून एक दिवस लांबवतात ही!ज्या पेल्यातून बिअर देतात त्याला मास म्हणतात आणि मास म्हणजे १ लिटरचा जंबो जगच असतो आणि तंबूत काम करण्यासाठी एका हातात ५ आणि दुसर्‍या हातात ५ भरलेले मास धरून नेता आले पाहिजेत अशी अटच असते.कॉलेजात शिकणारे स्टुडंट्स बरेचदा हे काम करून सुट्टी मध्ये पैसे मिळवतात.बिअर बरोबरच न पिणार्‍यांसाठी राडलर(बिअर+ कोला/फँटा/स्प्राईटचे मिश्रण) ,आफेलशोर्ल (ऍपल ज्युस +सोडावॉटर),कोला,अल्कोहोल नसलेली बिअर इ.सुध्दा असतेच.पण मान असतो बिअरचा आणि म्युमशनमधल्या ब्रुअरीजजा.फक्त म्युनशन मधल्याच ब्रुअरीजना या जत्रेत बिअरचे स्टॉल लावता येतात.
सजवलेल्या घोडागाडीतून बिअरची पिंपे वाजतगाजत मिरवणूकीतून आणली जातात. मिरवणूकी मध्ये पारंपरिक बायरीश कपडे घालून लोक नाचत,गात असतात.
स्त्रीया,पुरूष एवढेच नव्हे तर लहान मुलेसुध्दा या सोहळ्यात सहभागी होतात.आपापल्या आयांबरोबर आलेली ही चिमुरडी जत्रेचा आणि परेडचा पुरेपुर आनंद घेतात.मग बव्हेरियन स्टॅच्युपुढे सॅल्युट होतो आणि वाजतगाजत पिंपाचा नळ सोडून मास भरून बव्हेरियाच्या मिनिस्टर प्रेसिडेंटच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होते.एकच जल्लोश होतो!मग तंबूराहुट्यांमधून बायरीश गाणी सुरू होतात, सोनेरी जाम रिकामे व्हायला सुरूवात होते. रात्रीबरोबर गप्पाही चढायला लागल्या.सक्काळी लवकर जाऊ या हं,नाहीतर जागा नाही मिळत तंबूत. अशी प्रेमळ दटावणी करून शेवटी एकदाचे त्या चढत्या गप्पांना आवर घालत झोपलो.

वाचन 23561 प्रतिक्रिया 0