मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बॅचलर्स भाजणीचे वडे

सूड · · पाककृती
कुंदन यांचा कट्ट्यावरचा उतारा, स्पा यांची भेळ वैगरे पाकृ पाहून आमचे (पक्षी: माझे) हात शिवशिवू लागले. त्यात स्पाने तर कहरच केला, माणसाने फेमस व्हावं पण किती?? त्यांनी आयोजित केलेला कट्टा अगदी सुफळ संपूर्ण झाला हे पाहून आमची जळजळ आणिकच वाढली. कट्टा केला तोही पुरेपूर कोल्हापूरमध्ये ?? यावरून आम्ही गणित बांधले की हा माणूस कानामागून येऊन भलताच 'तिखट' होऊ बघतो आहे आणि मग पूर्वी जसं असुर, दैत्य .....नको आपण मराठीत डेमॉन्स म्हणूया. हां, तर पूर्वी जसं या डेमॉन्स मंडळीनी तप सुरु केलं की, इंद्राला....म्हणजे देवराज इंद्रा, पवारा'ज इंद्रा नाही. तर, जसा इंद्राला चिंतायुक्त भीतीयुक्त राग यायचा तसा आम्हालाही आला. आम्ही जर पक्या पेताड असतो तर एव्हाना सुरेच्या पिंपातच उडी मारते झालो असतो आणि गप्प बसलो असतो. पण आमच्याने ते शक्य नव्हते. मग याचे प्रत्युत्तर द्यायचे कसे ? आम्ही एक निरीक्षण नोंदवले की या माणसाने फेमस होण्यासाठी सुरुवातीपासूनच खाण्यासंबंधी वजनासंबंधी धागे काढले आहेत. उशिरा का होईना आमच्या लक्षात आले की आम्हालाही अन्नपूर्णेचा वर आहे. मग काय?? घेतली पळी आणि राहिलो उभे. विष्णु, ब्रम्हदेव वैगरे मंडळीना राग आला की त्यातून जसे असुर (मराठीत डेमॉन्स) जन्माला यायचे तशी ही पाकृ जन्माला आली, बॅचलर्स भाजणीचे वडे. तर हे वडे करताना राग येणं अथवा रागीट असणं सर्वात महत्त्वाचं, नाहीतर वडे फुगत नाहीत म्हणे !! साहित्य: अर्धा किलो वड्यांची भाजणी (इकडे* तयार मिळते) एक मोठा कांदा. सुपारी एवढा गूळ किंवा दोन (चहाचे) चमचे साखर चिमुटभर हळद चवीला मीठ. तळणीसाठी तेल. कृती: एक मोठा कांदा परातीत किसून घ्यावा. त्यात सुपारी एवढा गूळ किंवा दोन (चहाचे) चमचे साखर घालावी. अंदाजे मीठ घालावे, म्हणजे कांद्याला नीट पाणी सुटेल. चिमुटभर हळद घालून मग अर्धा किलो वड्यांची भाजणी हळूहळू त्या कांद्यात मिसळावी. कांद्याच्या अंगच्या पाण्यात भाजणी नीट मिसळून घ्यावी. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत साधारण घट्ट भिजवावे. आता हे मिश्रण एका भांड्यात उबदार जागी ५-६ तास ठेवून द्यावं. आता वडे करायला घावेत, कसे ? सांगतो, तर केळीचं पान (इकडे* मिळतं) अथवा प्लास्टिकची पिशवी आपल्या सोयीच्या आकारात फाडून/ कापून घ्यावी. आता भिजवलेल्या मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा पाण्याचा हात लावून घ्यावा आणि तो गोलाकार थापत/ पसरत न्यावा. बरेच लोक वडा थापून झाला की त्याला मध्यभागी छिद्र पाडतात, पण गविंनी म्हटलेलंच आहे छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति. म्हणून मी काही छिद्र पाडलं नाही. म्हटलं छिद्र पाडलं नि वडा कढईच्या तळाशी जाऊन बसला तर काय सांगा?? आता एका कढईत तेल तापत ठेवावं, आम्ही नमनालाच घडाभर तेल घातल्याने जे काही बेतास बात तेल शिल्लक होतं ते ओतलं. आता हे तेल नीट तापलं की वडे मध्यम आचेवर बदामी/ सोनेरी/ खरपूस अश्याच कुठल्याशा रंगावर तळावेत. खाताना काळ्या वाटाण्याची उसळ या वड्यासोबत वाढावी, सामिषाहारींनी त्यांना जे आवडेल ते वड्यांसोबत खाण्यासाठी घ्यावं. वाटाण्याच्या उसळीची पाकृ नंतर सवडीने देण्यात येईल. टीप: 'फोटोतली कढई कडेला जराशी काळसर दिसत्ये, नीट घासली नाही का ??' असा खवचट प्रतिसाद कृपया कोणी देऊ नये. वडे तळून झाल्यावर ती नीट घासून ठेवण्याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. पोटटीप: हे वडे तांदळाच्या खिरीसोबत छान लागतात असा माझा अनुभव आहे. अर्थात कुणी कसं खावं हे सांगायचा अधिकार मला नाही, मी फक्त निरिक्षण नोंदवलं. तळटीप: हे बॅचलर्स वडे आहेत म्हणून मी भाजणी कशी करावी हे दिलेलं नाही, मला माहित असलेलं भाजणीचं साहित्य व कृती खालीलप्रमाणे; अर्धा किलो गहू, पाव किलो साधे तांदूळ, पाव किलो उकडा तांदूळ, पाव किलो ज्वारी, १२५ ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम उडीद डाळ, थोडे धने बडीशेप. आता गहू वगळता इतर सर्व साहित्य धुवून वाळवून घ्यावे आणि मंद आवेवर खरपूस भाजावे. थंड झाले की मिसळून भरड दळून आणावे. ( इकडे* भैयाला वड्यांची भाजणी आहे म्हटलं की नीट दळून देतो.) यात गणपाभौ, जागुतै आदि बल्लवाचार्य/ सुगरण मंडळींनी काही ज्ञानात भर घातल्यास उत्तमच. जाता जाता: फोटु कसेही आले असले तरी चव उत्तम होती, फोटो काय खाता येतात का ? शब्दार्थ: इकडे*= बदलापूर (याचाच अर्थ तिकडे म्हणजे अदर दॅन बदलापूर).

वाचन 11333 प्रतिक्रिया 0