मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाणी

विकास · · जनातलं, मनातलं
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला. ज्या भाषेत पाण्याला देखील "जीवन" ह्या सार्थ शब्दाने संबोधले जाते, तेथे पाण्याचे महत्व नव्याने सांगायची गरज नसावी... ह्या दिवसाच्या निमित्ताने जगभर स्वच्छ पाण्याची आठवण ठेवण्याचा आणि त्या निमित्ताने जागृती करायचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या दिनानिमित्त एक पाणीसमस्येवरून विषय ठरवला जातो आणि त्यावर जगभर कार्यक्रम होतात. या वर्षीचा विषय हा "Water for the Cities: Responding to the Urban Challenge" असा आहे. उपलब्ध असलेल्या जागतिक विदाप्रमाणे २००८ सालपासून ५०% हून अधिक जग आता अधिकृतपणे शहरात रहाते. अथवा याच्याच उलट म्हणायचे तर मानवी जगाचे ५०% शहरीकरण झाले आहे आणि २०५० सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या ६९% जनता ही शहरी भागात रहाणार आहे. आजच्या घडीला, जगभरातील जवळ्पास नव्वद कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळत नाही. लाखो लोकं दरवर्षी दुषित पाण्याचे अथवा प्रदुषित सांडपाण्याचे बळी होतात. असे म्हणले जाते की एखाद्या युद्धापेक्षा, पाणी आणि सांडपाणी यांच्यामुळे दरवर्षी बळी जातात. भारताच्या संदर्भात ताजे पाणी हे तुलनात्मकरीत्या किती आहे हे खालील नकाशावरून समजू शकेलः (संदर्भः www.undp.org) थोडक्यात पाण्याचे पूर्ण दुर्भिक्ष नसले तरी अफ्रिकासोडल्यास इतर बहुतांशी प्रगत आणि विकसनशील राष्ट्रांपेक्षा आपल्याकडे पाणी कमी आहे. हे पाणी देखील ताजे आहे याचा अर्थ पिण्यायुक्त आहे असा नाही तर केवळ ते समुद्रातले नसून नद्या-तलाव, भूगर्भातील आणि साठवलेले पाणी आहे. आज भारतात साधारण ८४% जनतेस पिण्यायुक्त पाणी मिळते असा अंदाज आहे. तरी देखील २१% रोगराई ही पाण्यामुळे वाढते असा देखील अंदाज आहे. शहरीकरणाचा विचार केल्यास अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत जिथे घरोघरी मोबाईलफोन्स आहेत पण प्यायला अथवा रोजच्या वापराकरता पाणी नाही अथवा सांडपाण्याची व्यवस्था नाही. या संदर्भात अजून बरेच काही लिहीता येईल. कमी लेखायचा तर त्याहूनही नाही. फक्त एक नागरीक म्हणून आपण काय करू शकतो याचा मात्र नक्की विचार करावासा वाटतो. या निमित्ताने तीनएक वर्षांपुर्वी न्युयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एक प्रदर्शन भरले होते त्यातील काही पोस्टर्सचे फोटो खाली देत आहे: खालील पैकी प्रत्येक गोष्ट तयार करण्यासाठी किती पाणी लागते? केवळ अमेरिकेत फक्त पाण्यासाठी १९९७ साली ३.३ बिलीयन्स प्लॅस्टीकच्या बाटल्या विकल्या गेल्या. तेच प्रमाण २००२ साली १५ बिलीयन्स इतके झाले. त्यातील १२% अंदाजे रिसायकल केल्या गेल्या. भारतात पण पाण्यांच्या बाटल्याचे प्रमाण खूप आहे. पाण्याचे दुर्भिक्ष. वास्तवीक हे काम करणे जास्त करून, अशा ठिकाणी मुलींच्या नशिबी येते. त्याचे म्हणून वेगळेच सामाजीक परीणाम पाण्यापेक्षा जास्त झिरपत जातात. अफ्रिकेतील एका देशात मुले एका चाकावर खेळत आहेत. पण त्याच बरोबर ते मागे दिसणारी पाण्याची टाकी देखील भरत आहेत! पर्यावरण बदलामुळे उत्तरधृवावर जे बर्फ वितळू लागले आहे त्यामुळे तिथल्या प्राण्यांना पण कसे तोंड द्यावे लागत आहे याचे हे प्रातिनिधीक छायाचित्र आहे. आपण कमीतकमी काय करू शकतो?
  1. घराभोवती पाणी झिरपण्यासाठी जागा (सगळेच काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण करायचे नाही).
  2. कचरा रस्त्यावर जाणार नाही याची काळजी घेणे.
  3. बागेसाठी पाण्याचा मर्यादीत उपयोग
  4. गाडी धुण्यासाठी आणि घरातील जमिनी धुण्यासाठी देखील कमीत कमी उपयोग.
  5. झाडे लावणे / वाढवणे
अजून तुम्हाला काय सुचते आहे?

वाचन 19124 प्रतिक्रिया 0