मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीखंड

स्मिता. · · पाककृती
'श्रीखंड' शब्द वाचूनच कसं शांत, शीतल वाटतं ना! बहुतेक मराठी जनतेचा आवडीचा पदार्थ आहे हा. मलासुद्धा श्रीखंड फार आवडते. योगायोगाने मिपावर अजूनपर्यंत कोणी त्याची पाकृ टाकलेली नाही (मला तरी सापडली नाही). त्यामुळे मीच हा विडा उचलला (सोपी पाकृ आहे ना ;)). असंही भारतात आता उन्हाळ्याला सुरुवात होतच आहे... तेव्हा आज बनवूया श्रीखंड! साहित्यः दही - ५०० ग्रॅम बारीक साखर - २ मोठे चमचे जाडसर वेलची पूड - १/४ लहान चमचा दूध - १/४ कप सजावटीसाठी सुका मेवा - बदाम, काजू, पिस्ता यांचे काप, बेदाणे, चारोळी, इ. (आवडीप्रमाणे) मलमलचे किंवा मऊ सूती स्वच्छ कापड कृती: श्रीखंडाची पूर्वतयारी ६ ते ८ तास आधीच करावी लागते. त्यासाठी पहिले दही जमवावे. शक्यतो बाजारात मिळणारे अमूल, नेस्ले, इ. असे दही आणावे. ते दही छान घट्ट असते. घरी जमवलेल्या दह्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे दही मलमलच्या किंवा सुती कपड्यात सैलसर बांधून हलक्या हाताने दाबून जास्तीचे पाणी काढून टाकावे. नंतर ते ६ ते ८ तासांसाठी बेसिनवर (त्यातून सतत पाणी ठिबकते म्हणून) टांगून ठेवावे. आता तयार झालेला चक्का म्हणजे पाणी निघून गेलेले दही एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात साखर, वेलची पूड आणि योग्य कन्सिस्टंसीसाठी(मराठी?) लागेल तसे दूध घालून ते मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावे. एकदा चव बघून जास्त गोड आवडत असल्यास थोडी साखर घालून पुन्हा ते मिश्रण मऊ होईपर्यंत ब्लेंड करावे. हे मिश्रण सर्व्हींग बाऊल मध्ये काढून घ्यावे आणि त्यावर आपल्या आवडीप्रमाणे सुका मेवा पसरवावा. जेवणाआधी किमान अर्धा तास बाऊल फ्रीज मध्ये ठेवावा. झाले आपले थंडगार श्रीखंड तयार! Image removed.

वाचन 6228 प्रतिक्रिया 0