मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी समाजसेवा व ईशान्य भारत.

विश्वास कल्याणकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी ३३ वर्षे बैंकेची चाकरी केल्यानंतर आपण इतर ही काही समाजाभिमुख करावयास हवे असे मनात आले आणि नोकरीचा राजिनामा दिला. कौटुंबिक कारणामुळे मुळचे अमरावती गाव सोडुन पुण्यास स्थाईक झालो. ते वर्ष होते एप्रील २००८. पुणे खरोखरच बौध्दिक दृष्ट्या खुपच पुढे तर आहेच इथली माणसे ही जिवंत वाटतात खर्‍या अर्थाने. आमच्या निवृत्त कर्मचार्‍यांच्या संघटनेने श्री सुनिल देवधर यांचे व्याख्यान ठेवले होते. सलग दोन दिवस आणि विषय होता ईशान्य भारतातील आव्हाने. हा भाग तेंव्हा मला पुर्णतः अनभिज्ञ होता आणि अर्थातच तेथील समस्या देखील. सुनिल देवधरांच्या भाषणादरम्यन मी मंत्रमुग्ध झालो आणि नकळत त्या वातावरणाशी जोडला गेलो. सुनिल देवधरजी १६ वर्षे तिथे राहिले त्यांचा अभ्यास व अनुभव दांडगा तर आहेच पण आपण ही आपला खारीचा वाटा द्यावा हे मनाशी निश्चीत झाले. सौ. पुनमताई मेहता ह्या पुर्वांचल विभागाच्या प्रमुख संपर्क अधिकारी. त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार रत्नागिरी ला नागालैंड विद्यार्थी वस्तिगृहा ला एक महिना राहिलो. उद्देश हा की त्यांच्याशी व तेथील वातावरणाशी जवळीक निर्माण व्हावी. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असा होता. तेथेच श्री सुनिल मुळे या कार्यकर्त्याशी ओळख झाली. रत्नागिरीतील संघाचा कुठलाही कार्यक्रम असो सुनिल मुळे त्यात हवाच. रत्नागिरीतील प्रत्येक कुटुंबाशी त्याचे स्वयंपाक घरापर्यंत नाते. तिथे मिळालेला आपलेपणा व तेथील लोकांशी झालेलला परिचय हा माझ्या आयुष्यातील एक अमुल्य ठेवा आहे. जवळच होउ घातलेला गोळवली प्रकल्प म्हणजे गुरुजींना वाहिलेली रत्नागिरीकराची आदरांजलीच . तेथे अमरावती चे देशपांडे दांपत्य आपली सेवा देत आहेत. सुनिल मुळेंनी माझी ओळ्ख ॠषी तुल्य जोग दांपत्यांशी करुन दिली. मी नागालैंड ला जात आहे हे कळताच मला जोग काकुंनी पोटभर नाष्टा तर अगत्याने दिलाच पण त्यांचे देखील नगालैंड भेटिचे अनुभव सांगीतले. त्यांचा मुलगा अतुल जोग हा वनवासी कल्याण आश्रमचा पुर्वांचलाचा प्रमुख आहे. रत्नागिरीच्या अनुभवानंतर नागालैंड ला जाणे निश्चीत झाले. पण अडथळे आले नाहित तर ते कार्य कसले. काही कारणाने नागालैड च्या दिमापुर ला जाणे मला अर्ध्यातच सोडुन नागपुर ला थांबणे भाग पडले. पण मनाशी निश्चय झाला होता. दरम्यान शिलौंग ला सेवा भारती चे काम पहाणारे श्री प्रशांत महामुनी यांच्याशि संपर्क झाला व त्यांनी मला शिलांग ला येण्याचे सुचविले. त्यानुसार २५ एप्रिल २००९ रोजी मी नागपुर ते गुवाहाटी प्लाईट ने गुवाहाटी ला पोचलो. गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग् ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरुप प्रदेश म्हणुन ओळखला जात असे. दक्षाने शिवपत्नीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तिने केलेले आत्मदहन व त्यातुन क्रोधित झालेल्या शंकराने हाती सतीचे शव घेउन केलेले तांडव नृत्य पाहुन पृथ्वी भयभीत झाली. विष्णुने सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले ती एकावन्न स्थाने शक्तीपीठे म्हणुन् भारताच्या चारी दिशांना पसरलेली आहेत. गुवाहाटीतील 'कामाख्या'(कामाक्षी) देवीचे मंदीर हे त्यापैकीच एक आहे. कामाख्या देवी चे दर्शन घेउन मी मला माझ्या कार्यात यश देण्याची मनोभावे प्रार्थना केली. गोहाटि विमानतळावर उतरल्यावर जाणवली ती तेथील् दमट हवा. ब्रम्हपूत्र नद म्हणजे समुद्र्च त्याचा हा परिणाम. गोहाटि ची लोकसंख्या २००१ च्या शिरगणतीनुसार ८ लाख होती. गोहाटी हे शहर इ.स. पुर्वी ६ व्या शतकात अस्तीत्वात असल्याचे येथील पुरातत्व विभागाच्या उत्खननातुन निष्पन्न् झाले आहे. कामरुप राजवटीत गोहाटी हे राजधानी चे शहर होते. या शहराला महाभारत कालीन संन्दर्भ देखील आहेत. महाभारतातील नरक आणि भागदत्त राजांच्या राजधानिचे हे शहर, १२-१५ व्या शतकात कामता राजाच्या नाशानंतर या शहराच्या वैभवाला उतरती कळा लागली. कामाख्या देवीचे प्रसिध्द् शक्ती पीठ, नवग्रह मंदिर् आणी बसीस्ता येथील ऐतिहासीक अवशेष या शहराच्या गत वैभवाचे साक्षीदार् आहेत. टैक्सीने गुवाहाटी ते शिलाँग हा प्रवास ४ तासाचा. शिलांग ला जाण्यासाठी आपल्याला दक्षीणे कडे जावे लागते. तसे ईशान्य भारतातील कुठ्ल्याहि राज्यात जाण्यासाठी गोहाटि ला यावेच लागते. परस्पर् एका राज्यातुन दुसर्या राज्यात जायला मार्गच नाही इतका हा प्रदेश दुर्गम आहे. गोहाटी ची वेस ओलांडून आपण जरा पुढे आलो की घाट रस्त्याला जी सुरुवात होते, ती थेट तीन साडेतीन तासानंतर् शिलांग येईस्तोवर. घाटाचा चढ सुरु होताच घनराईने गुरफटून टाकलेले डोंगर नजरेला पडतात, हवेतला ब्रम्हपुत्रे काठचा घामटपणा पार निघुन जातो नि एका सुखद गारव्याच्या अनुभवाने आपण मनोमन उमजतो की आपण मेघलयाकडे जात आहोत.अडीच लाखांच्या आस पास शिलांगची लोकवस्ती आहे. हे शहर मेघालयाच्या राजधानीचं देशातील सर्वाधिक पावसाचा हा चिमुकला प्रान्त. इथे वर्षातले आठ महिने तरी सतत आपलं "नभ मेघांनी आक्रमीलेलंच!" साहजिकच जिथं जाल तिथं नी जेंव्हा जाल तेंव्हा सगळीकडेच "हिरवे हिरवे गार् गालिचे , हरित त्रुणांच्या मखमालीचे " असा प्रकार. शिलांग ला उतरल्यावर नेमका पत्ता असल्यामुळे मला कार्यालयात जाण्यास फारसा त्रास झाला नाही. प्रशांत हे जयंतीया हिल्स च्या जोवाई या मुख्याल्याच्या ठीकाणी गेले असले तरी कार्यालयात माझ्या रहाण्याची व्यवस्था करण्यास विसरले नव्हते. मेघालयात सकाळी ४.३० वाजता चक्क उजाडलेले असते. मेघालयातील् खासी काय् किंवा गारो आणि जयंतीया काय, सगळ्यांचेच इंग्रजी उच्चार् अगदी अधर्, अस्पष्ट. खासी भाषे साठी रोमन लीपी वापरतात्. त्यामुळे अर्थ जरी समजला नाही तरी निदान रोमन स्पेलिंग वरुन् आपण उच्चार तरी करु शकू अशी आपली भोळी समजूत पार् मोडीत निघते. एका पेक्षा एक कठीण शब्द म्हणतांना आपलीच बोबडी वळते.उमनगोट(Umngot) आणी उमस्यू (Umsiew) ही नद्यांची नावं व उमसोसुम (Umsohsum) हे शिलांग शहराच्या एका भागाचे नाव. सर्वच दुर्बोध . इथली नावं त्याहुन ताण . मात्रुसत्ताक कुटुंब पद्धती ही खासी जीवनशैलीची खासीयत. खासी मुलं आपल्या नावामागं आईच नाव लावतात. सामान्यतः लग्न झाल्यावर नवर्‍यान आपल्या बायकोच्या घरी रहायला जाण्याची पद्धत आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्री अधिक श्रेष्ठ अशा कल्पनेत रुजलेल्या या मात्रुसत्ताक पद्धतीत संपत्तीच्या वारसाबद्दलही काही संकेत रुढ झालेले दिसतात. खासी घरातल्या सर्वात लहान मुलीला "खात् दूह" म्हणतात. सामान्यत: आईची संपत्ती या कनिष्ट कन्येला मिळ्ते. अर्थात् भावंडांपैकी अन्य कोणी अधिक गरजवंत असेल तर त्या मातृ-संपत्तितला वाटा त्यांनाही देण धाकट्या मुलीवर बंधनकारक मानलं गेलं आहे. एकाच मातुल घराण्यातल्या व्यक्ती एकच आडनाव लावतात. खासी भाषेत मातुल घराण्याला "कुर" असं म्हणतात. या एकाच कुराचं परंपरागत निवासी घर पिढ्यान् पिढ्या जंपलं जातं. खासी - जयंतिया व गारो या तिन्ही जिल्यातील खेड्यात जाण्याचा व तेथील कुटुंबात राहाण्याचा मला योग आला आणी त्यांच्या आदरातिथ्याने मी भारावुन गेलो.खासी धर्म्, खासी उपासना पध्द्ती ही हिंदू धर्माची लहान बहीण आहे असं व्यापक ख्रिस्तीकरणाशी दोन हात करण्याचा चंग बांधलेल्या सेंग खासी चळवळीच्या लोकांचे म्हणणे आहे. पूर्वांचलात झपाट्याने होत असलेले मतांतरण पाहून त्याच्या धोक्यापासुन आपल्या समाजाला वाचवून मूळ परंपरा,संस्कृती व उपासना पध्दती सुरक्षित ठेवण्यासाठी तेथील अनेक जनजातींमधील द्र्ष्ट्या महापुरुषांनी संघटना स्थापन केल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये 'डोनी पोलो' पंथाची संघटना आहे, तर नागालँडमध्ये स्वातंत्रसेनानी राणी माँ 'गायडिन्ल्यू' ने स्थापन केलेली 'जेलियांग राँग हराक्का असोसिएशन' ही संघटना हिंदू नागांच्या परंपरा टिकवून ठेवते आहे. हिंदू अंगामींची 'जाफू फिकी फुतसाना' संघटनाही अशीच स्वपंथाच्या रक्षणासाठी कटिबध्द् आहे. मेघालयात तर १८९९ साली याच उद्देशाने 'बाबू जीबनरॉय' व त्यांच्या सहकार्‍यांनी 'सेंग खासी' ही संघटना स्थापन केली. तर जयंतियांमध्ये 'सेंग राज' ही सघटना स्थापन झाली. आज मेघालयात १७५ वर्षांच्या प्रयत्नांनंतर देखील मिशनरी ७०% पेक्षा अधिक मतांतरण करू शकले नाहीत, याचे प्रमुख कारण या संघटना आहेत. पण ही विषम लढाई आहे. मिशनरीं च्या मागे विदेशातील समृध्द् देशांतुन येणारा अमाप पैसा व तेथील राज्य सरकारांचे पाठ्बळ आहे तर या राष्ट्रीय भावनेनी पछाडलेल्या संस्था तुट्पुज्या पैशात आणी उर्वरित भारतिय आणी केन्द्र सरकारच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षीत अवस्थेत आपल्या अस्मितेची लढाई लढत आहेत. माझा संघाशी फारसा परिचय नव्हता. समाजकारणाच्या निमित्ताने पुर्वांचलाला भेट दिल्यानंतर मी मेघालयातील, शिलाँग, पेनुर्सला, जोवाई, अरुणाचल प्रदेशातील अतिदुर्गम भाग बोमडिला तसेच नहरलगुन, ईटानगर, नागालैंड मधिल दिमापुर तसेच आसाम मधील तेजपुर, काझिरंगा, व ब्रम्हपुत्रेतील विशाल बेट माजुली येथे फिरण्याचा योग आला. प्रत्येक ठिकाणी संघाचे प्रचारक व त्यांचा दांडगा संपर्क व त्यांचे तेथील कार्य याने भारावुन गेलो. माझ्या संघाबद्दल च्या भाबड्या कल्पनांना तेथेच मुठमाती मिळाली. त्याच्या तेथील प्रचंड कार्याने मी स्तंभीत झालो. हे कार्यकर्ते आपले घर दार सोडून वर्षानुवर्षे तिथे तळमळीने कार्य करित आहेत हे उमजण्यासाठी येथे राहून व आपल्या कल्पना विलासाची परिसीमा गाठुन शक्य नाही. ते तेथेच जाउन उमजावे लागेल. भारतातीलच नव्हे तर जगातील प्रथम क्रमांकाची असलेली बिगरसरकारी, सामाजिक, सांस्कृतिक संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आहे. पूर्वांचलाच्या समस्येच्या बाबतीतही संघ त्या समस्येच्या स्वरुपाचा व गांभीर्याचा सखोल विचार करुन आवश्यक असलेली शक्ती तेथे उभी करण्याचा प्रयत्न करित आहे हे तिथे गेल्यावर लक्षात येते.. मातृभुमीच्या या एकाकी पड्लेल्या अनमोल भागाच्या रक्षणासाटी संघाने गेल्या साठ वर्षामध्ये शेकडो प्रचारक तेथे पाठविले. त्यापैकी अनेकांनी तर स्वतःला संपूर्ण आयुष्यभरासाठी पूर्वांचलात वाहून घेतले. अशाच एका ज्येष्ट कार्यकर्त्याला भेटण्याचा मला योग आला त्यांचे नाव श्री मधुकर लिमये. त्यांनी आपल्या आयुष्याचे ५० वर्षाहुनही अधिक काळ पुर्वांचलासाच्या उद्देशासाठी घालवला. महाराष्ट्रातील मातुलगह गावी १९२७ ला जन्माला आलेले मधुकरजी अंकशास्त्रात एम. एस.सी झाल्यानंतर १९४९ मध्ये आसाम मध्ये प्रचारक म्हणुन गेले आणि आजही ते गुवाहाटी कार्यालयात मार्गदर्शक म्हणुन असतात. ८४ वर्षाच्या वयात ही ते तितकेच कार्यक्षम आहेत. आणि माझ्यासारख्या नव्या माणसालाही ते तितक्याच आत्मियते पुर्वांचलाबद्दल भरभरुन बोलतात. लोकांमध्ये भारतमातेच्या भक्तीची भावना भिनवणार्‍या या संघटनेचे कार्य काही सहजपणे पूर्वांचलात पसरले नाही, तर भारतभक्ती जागवणार्‍या सर्व संस्थांना शत्रू क्रमांक एक मानणार्‍या अतिरेकी गटांनी संघाला देखील आपल्या 'हिट लिस्ट' वर अग्रक्रम दिला. संघाच्या तीन प्रचारकांच्या आसाममध्ये हत्या झाल्या. २७ जानेवारी १९८९ रोजी उत्तरप्रदेशातुन आसामात प्रचारक म्हणुन गेलेल्या 'स्व. ओमप्रकाशजीं ' ची उल्फाच्या अतिरेक्यांनी, श्रध्दांजली सभेत हात जोडून डोळे मिटलेल्या स्थितीत बसलेले असतांना पाठीमागून गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यातून गेलेले प्रचारक 'स्व.प्रमोद दीक्षित' यांनी गुवाहाटीत स्वतः २७ वेळा रक्तदान केले, व स्वकीयांचेच रक्त सांडण्यास प्रवृत्त होत असलेल्या आसामच्या तरुणांना रक्तदानाचे महत्व शिकवून रक्तदाता सूचीचा प्रकल्प चालू केला. १६ ऑगष्ट १९९१ रोजी आसामच्या बरपेटा जिल्ह्याच्या सघ कार्यालयात शिरुन 'उल्फा' ने प्रमोदजींची हत्या केली. तर केरळ मधून आसामात पोचलेल्या 'स्व.मुरलीधरनजीं' ची देखील हालहाल करुन हत्या करण्यात आली. ५० वर्षे रक्त, घाम व अश्रुंचे सिंचन करुन संघाच्या स्वयंसेवकांनी आसामात राष्ट्रभक्ती जागवली. आज आसाममध्ये भारताच्या बाजुने अतिरेक्यांच्या विरोधात असमीया समाजाला संघटितपणे उभे करण्यात संघाला यश मीळतांना दिसत आहे. .

वाचन 16853 प्रतिक्रिया 0