मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात?

खादाड अमिता · · जनातलं, मनातलं
हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ. पण जर हे सगळे 'हेल्थ फूड्स' खरंच एवढे हेल्थी असते, तर मग जागतिक आरोग्य संघटनेन सगळ्यांचाच आहारात अमुक अमुक टक्के ह्या फूड्स चा समावेश असलाच पाहिजे असेच फर्मान नसते का काढले? ठीक आहे. अगदी एवढ्या टोकाला पण नको जाऊया. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अश्या लाखो 'हेल्थ फूड' कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेयर मार्केट मधे) पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे. आणि आता हेच आपल्याही देशात घडतंय. कारण, मानसशास्त्रासंबंधीच आहे. अमेरिकेतच झालेल्या एका अध्ययनाप्रमाणे, 'हेल्थी' लेबल असलेले पदार्थ, इतर पदार्थांच्या प्रमाणात जास्त खाल्ले जातात आणि म्हणून त्या हेल्थ फूड मधून मिळणाऱ्या कॅलोरीस चं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट आणि लठ्ठ होतात. एक साधं उदाहरण घेऊया. एका डायेट जागरूक व्यक्ती समोर फ्रेंच फ्राईस किंवा बटाट्याची भजी आणि बेक्ड हेल्थ snack ठेवलं तर ते हेल्थ snack घेतील? ठीक आहे. आता जर फक्त पहिले दोन विकल्प असते तर त्यांनी काय केलं असतं? जर खरंच हेल्थ कोन्शिय्स असतील तर बहुदा ५ फ्रेंच फ्राईस किंवा २-३ भजी खाल्ली असतील. पण ह्याच व्यक्तीने त्या हेल्थ snack चा अर्धा पुडा फस्त केला असता.असे का? कारण त्याला कुणीतरी कुठलंतरी हेल्थ लेबल लावलेलं होतं. ह्याचा अर्थ हा नाही कि ते तुम्हाला फसवतायेत. पण आपणच त्या हेल्थी नूडल्स च्या पाकिटावर 'makes two servings' हे छापलेलं न वाचता ते माणशी एक पाकीट असं खातो. आणि अश्या वेळी तो 'हेल्थी' लेबल असलेला पदार्थ आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतो.

वाचन 5300 प्रतिक्रिया 0