मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोळ्यांची आमटी...

विसोबा खेचर · · पाककृती
राम राम मंडळी, आज आमच्या मातोश्रींची एक पाकृ तुम्हाला सांगणार आहे. हा पदार्थ खास आमच्या कोकणातला असून तुम्हाला सर्वांना हा पदार्थ आवडेल अशी आशा करतो. तशी आमची म्हातारी सुगरण आहे बरं का! :) पाकृचा स्त्रोत - वैदेही अभ्यंकर. शब्दांकन - तात्या अभ्यंकर. साहित्य (तीन ते चार इसमांना पुरेल इतपत) - एक वाटी चणाडाळ, साधारण दोन इंच सुक्या खोबर्‍याचा तुकडा, थोडीशी खसखस, तेल, तीखट, मीठ, हळद, गोडा मसाला, चिंच, गूळ, एक वाटी खोवलेला ताजा नारळ, कोथिंबीर, कढिपत्ता. सुकं खोबरं व खसखस छानशी भाजून घ्यावी व एकत्र वाटून त्याची पूड करून ठेवावी. कृती - चण्याची डाळ दोन तास भिजत टाकावी. त्यानंतर पाण्यातून उपसून ती पाट्यावर किंवा मिक्सरवर भरडशी वाटून घ्यावी. (आम्ही शक्यतोवर पाट्यावरच वाटतो. ती चव मिक्सरला नाही!) त्यानंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद, खोबरं-खसखशीची पूड व मोहन म्हणून दोन-तीन चमचे कच्चं तेल घालावं व सुपारीएवढ्या आकाराचे गोळे वळून घ्यावेत. गोळे नीट वळले जावेत म्हणून हाताशी थोडं चण्याच्या डाळीचं पीठ घ्यावं व छान गोळे वळून घ्यावेत. आता पातेलं गॅसवर (आमच्या कोकणात आम्ही चुलीवरच करतो, चुलीची चव गॅसला नाही!) ठेवून नेहमी करतो तशी तेल, मोहरी, हळद व कढीपत्ता यांची चांगली चरचरीत फोडणी करावी. फोडणी झाल्यावर त्यात अंदाजानुसार तीन ते चार वाट्या पाणी घालावे. त्यानंतर त्या पाण्यात चवीनुसार चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, गोडा मसाला घालावा व पाणी चांगले उकळू द्यावे. आता त्या उकळत्या पाण्यात मगाशी केलेले गोळे हळूहळू सोडावे. आता ते मिश्रण मुळीच ढवळू नये. गोळ्यांना त्या उकळत्या पाण्यात बिलकूल डिष्टर्ब न करता चुपचाप शिजू द्यावे. गोळे शिजले की आपोआप वर येतातच. आता सर्वात शेवटी त्यात एक वाटी एकदम बारीक, सुपर फाईन वाटलेला नारळ घालावा, मिश्रण सारखे करून घ्यावे, व चांगल्या एक दोन उकळ्या आल्या की ग्यॅस बंद करावा. वरून ताजी चिरलेली कोथिंबीर घालावी. गोळ्यांची आमटी तैय्यार! :) गरमागरम पोळीसोबत किंवा वाफाळलेल्या भातासोबत देवाचे आभार मानत अगदी पोटभर जेवून तृप्त व्हावे व नंतर दोन तास निवांत झोपावे! :) बराय तर मंडळी, निघतो आता! अनुष्काला हीच पाकृ शिकवायला जायचं आहे! गधडी स्वैपाकात अगदीच ढ आहे! :) तात्या.

वाचन 24626 प्रतिक्रिया 0