डबल क्रंच खर्डी खाखरा..!!
कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण ..लसूण इथे जरी गड्डाभर दाखवली असली तरी इतकी जास्त नको, नाहीतर झोंबरा व्ह्यायचा पदार्थ.
मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी. (सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई, अमेरिका वगैरे लक्षात घेऊन..) शिवाय आपण विकत घेतलेला मिरचीचा प्रकार कोणता (ब्याडगी, लवंगी, भूत झोलकीया..!!) यावरही ही संख्या अवलंबून ठेवावी. "कॉनसीक्वेन्शियल" ड्यामेजेसना प्रस्तुत लेखक जबाबदार नाही.
उपरिनिर्दिष्ट चिजा पाट्यावर किंवा मिक्सरात वाटून निम्ननिर्दिष्ट खर्डा उत्पन्न होईल. याचा वास जीवघेणा असेल.
(ब्याचलर टिप:आपल्या महालात मिक्सर वा पाटा दोन्ही नसण्याचीच शक्यता जास्त असल्याने इथे अडकून पडण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्व पदार्थ सुरीने अत्यंत बारीक चिरून हाताने एका वाटीत जेझरले तरी चालेल. नंतर हात पाचेक वेळा धुवावेत. अन्यथा पुन्हा कॉनसीक्वेन्शियल ड्यामेजेस..!!)
घरी लावलेले घट्ट दही किंवा (ब्याचलरांसाठी) अमूल नेसलेचे डब्यातले दोन तीन मोठे चमचे भरून घ्या.
या दह्यात वर तयार केलेला खर्डा अंडे फेटतात तसा फेटून मिक्स करा. त्यात शुगर फ्री नेच्युरा दोन चहाचे चमचे किंवा आपापल्या अंदाजाने टाका. ज्यांच्या मागे डायेटची ब्याद नाही त्यांनी सरळ साखर टाका. चिमूटभर मीठ टाका.
अशा रीतीने खालील प्रमाणे "विनामेयोनीज विनाचीज विनाबटर" वालं आपलं मस्त "स्प्रेड" किंवा "डिप" तयार होईल.
एक मेथी खाखरा घ्या. दाढी करताना साबू लावतो तसं त्याला वर बनवलेलं स्प्रेड फासा.
मग या सर्व प्रकरणावर अजून एक खाखरा ठेवून डबल लेयर बनवा.
आणि दहा पंधरा मिनिटांतच पोटातही दडपा नाहीतर ओला होईल.
(ब्याचलर मित्रहो: "खर्डा" जास्तीचा बनवून एक दोन आठवडे बाटलीत ठेवता येतो. खाखराही आणून बरेच दिवस ठेवता येतो. फक्त हापिसातून येताना किंवा सकाळी उठून लुंगीवरच बनियन अडकवून जांभया देत वाण्याकडे गेलं आणि दही आणलं की झालं..
ब्याचलर डिश असल्याने जास्त कॉप्लिकेशन नाय. कांदा चिरायची हौस असेल आणि विशेषत: रॉयल च्यालेंज, हेवर्ड वगैरे पेयांसोबत ही रचना पेश करत असाल तर थोडा कांदा टोमॅटो चिरून वरून पसरावा..!!)
वाचन
9699
प्रतिक्रिया
0