मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

ॐकार · · काथ्याकूट
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.

वाचन 21009 प्रतिक्रिया 0