मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य!

चतुरंग · · जे न देखे रवी...
नुकतेच एक स्तोत्र ऐकण्यात आले. त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला. त्यांचेच हे स्तोत्र 'शिवमानसपूजा' ह्या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष खरोखरीच पूजा करणे जरी शक्य नसेल तरी ह्या स्तोत्राच्या पठणाने खर्‍या पूजेचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. तो भाग जरी क्षणभर सोडून दिला तरी ऐकताक्षणीच मनाचा कबजा घेणारे हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित करायचेच असा चंग बांधला. माझा संस्कृतचा अभ्यास वगैरे नाही अंदाजाने अर्थ लागू शकतो इतपतच समजते. त्यामुळे जालावर जरा भटकंती करुन इंग्लिश अनुवाद वाचून अर्थ समजावून घेतला, आणि आज भाषांतर इथे सादर करीत आहे. (संस्कृतच्या अभ्यासू लोकांना मोकळेपणाने छिद्रान्वेष करण्यास अनुमती आहे! ;) ) (स्वगत - रंग्या, लेका तुझ्या अनुमतीशिवाय छिद्रान्वेष करण्याचे सोडतील असे वाटले की काय तुला! हे मिपा आहे, आवडले तर 'रोख' नाहीतर 'ठोक'! ;) ) ------------------------------------------------------------ (एकेका श्लोकाचा अनुवाद लगेच खाली देत आहे - अर्थानुसारी समजणे सोपे जावे म्हणून.) शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य. रत्नै: कल्पितमासनं हिमजलै: स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चंदनम् जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दिपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् स्वैर अनुवाद - हिमजलाच्या तुझ्या स्नानानंतर तुला दिव्यवस्त्र आणि कल्पनेतलेच रत्नांचे आसन अर्पण करतो आहे नाना रत्नांची आभूषणे तुला अर्पून त्याबरोबरच कस्तुरिगंधित थंड चंदनाचा लेप तुला लावतो आहे बिल्वपत्रासह सुरेख अशा जाई-चाफ्याची शुभ्र फुले वाहिल्यानंतर मी मनात धूप-दीप लावतो आहे हे प्रभो, हे देवाधिदेवा, माझ्या हृदयातल्या भावाने अर्पिलेल्या ह्या मानसपूजेचा तू स्वीकार कर! सौवर्णे नवरत्नखण्ड रचिते, पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानक म् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु स्वैर अनुवाद - नवरत्नांच्या गंधाने आभूषित केलेल्या सुवर्णपात्रातून मी तुला तूप, भाताची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करतो आहे दही-दूध यांनी बनवलेली, फलरसांनी, भाज्यांनी युक्त रंभाफलादि पंचपक्वान्ने मी तुला अर्पण करतो आहे कर्पूरात न्हाऊन निघालेले अत्यंत सुगंधित आणि रुचिपूर्ण असे जल मी तुला पेयपानासाठी अर्पण करतो आहे माझ्या मनातून मी तुझ्यासाठी बनविलेला तांबूलही अर्पण करतो आहे, हे प्रभो त्याचा स्वीकार कर! छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणति स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो स्वैर अनुवाद - सुशोभित छत्र, चामरं, पंखा अर्पण करतो आहे, तुझ्याच दर्शनासाठी तुला निर्मल असा आरसाही देतो आहे वीणा, भेरि, मृदंग अशा वाद्यांसहित विविध प्रकारचे नृत्य आणि संगीतही मी तुला अर्पण करतो आहे तुला साष्टांग नमन करत असतानाच बहुविध अशा स्तुतिपूर्ण प्रार्थनाही मी तुझ्याचरणी अर्पण करतो आहे पण हे सर्व माझ्या संकल्पातूनच मी देत असल्यामुळे हे प्रभो माझ्या मानसपूजेचा स्वीकार कर! आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिती: सञ्चार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् स्वैर अनुवाद - हे प्रभो तूच माझा आत्मा, तुझी सहचरा पार्वती माझी बुद्धी आणि माझे शरीर हे तुझे मंदिर आहे कर्मेंद्रियांनी चालवलेला विषयोपभोग ही तुझी पूजाच आहे, माझी निद्रा ही तुझ्या ध्यानात लावलेली जणू समाधीच माझ्या पायांनी केलेला संचार ह्या तुला घातलेल्या प्रदक्षिणा आणि मुखातून बाहेर पडणारे शब्द ह्या प्रार्थना आहेत त्याचप्रमाणे जे जे कर्म मी करतो आहे ते ते कर्म हे शिवशंभो तुझीच आराधना आहे, तिचा स्वीकार कर! करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो स्वैर अनुवाद - माझ्या हातांनी, पायांनी, कृतींनी, बोलण्याने, शरीराने वा कर्माने केलेले अपराध मला क्षमा कर माझ्या ऐकण्यातून, बघण्यातून, मनातल्या विचारातून झालेल्या अपराधातून मला मोकळे कर ती योग्य असोत वा अयोग्य, चांगली असोत वा वाईट, सर्व कर्मांसाठी मी शरण आलोय क्षमा कर हे देवाधिदेवा, करुणासागरा, महादेव शंभो सर्वतोपरी जयजयकार असो, माझी पूजा स्वीकार कर! चतुरंग

वाचन 7960 प्रतिक्रिया 0