माझे मन तुझे झाले...
राम राम मिपाकरहो,
कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे. या गाण्याचे शब्द व संगीत सुधीर मोघे यांचे आहे व सुचित्रा बर्वेने हे गाणं खूप सुंदर गायलं आहे. या गाण्याचं चित्रिकरणही फार सुरेख आहे. माधवरावांच्या भूमिकेत रविंद्र मंकणी व रमाबाईंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहेत.
थोरले माधवराव पेशवे. अवघ्या अठ्ठावीस वर्षाचं आयुष्य! एक अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. थोरल्या आबासाहेबांचं राज्य केव़ळ एका विश्वस्ताच्या भावनेनं सांभाळणारा, मोठं करणारा! परंतु ही झाली माधवरावांची राजकीय बाजू. तिच्याबद्दल अधिक काही बोलण्यास मी कुणी इतिहासतज्ञ नव्हे! मी बोलणार आहे ते माधवराव व रमाबाई यांच्याबद्दल! एका पतीपत्नीबद्दल! असं कितीसं आयुष्य लाभलं हो माधवरावांना? त्यात पुन्हा राज्याची जबाबदारी! मृत्युने ऐन तारुण्यात घाला घातला माधवरावांवर. अहो खुद्द मराठी दौलतीलाच जिथे माधवराव हवेहवेसे असताना पुरले नाहीत तिथे ते रमाबाईच्या वाट्याला तरी कितीसे आले असतील?
कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत, ही या गाण्याच्या चित्रिकरणाची पार्श्वभूमी आहे. या गाण्याच्या रुपाने एका प्रियकरप्रेयसीतलं, एका पतीपत्नीतलं मनोगत अतिशय सुंदरपणे आपल्यासमोर येतं!
माझे मन तुझे झाले,
तुझे मन झाले!
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले!
मला लागे तुझी आस,
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहिकडे
माझे तुझे होती भास!
माझ्यातून तू वाहसि,
तुझ्यातही मी पाहसि
तुझ्यामाझ्यातले सारे
गूज माझ्यातुझ्यापाशी!
तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन, तुझे मन!
क्या केहेने! केवढी विलक्षण इंन्टेन्सिटी आहे या गाण्यामध्ये! खरंच मंडळी, हे गाणं खूप आत आत जातं. अक्षरश: भिडतं!
हे गाणं म्हणजे एक मूक संवाद आहे. एका पतीपत्नीतलं गूज आहे हे!
एक ओढ! एक विश्वास! एक प्रेम!
असं प्रेम की जे बोलून व्यक्त करता येत नाही! "हाय.. आय लव्ह यू..!" अशी फिल्मी आरोळी ठोकली म्हणजेच प्रेम व्यक्त होतं असं नव्हे! उलट प्रेम तर बर्याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!
खरं तर हे गाणं नव्हेच! पुरियाधनाश्री रागातली ही एक विराणीच आहे. हो, विराणीच ती! एक भगवी वस्त्र नेसलेली स्त्री हातात एकतारी घेऊन ही विराणी गाते आहे असं दाखवलं आहे.
राग पुरियाधनाश्री!
मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा.
मंडळी, पुरियाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. मंडळी, अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं!
मंडळी, वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरियाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!
-- तात्या अभ्यंकर.
वाचन
26544
प्रतिक्रिया
0