एम - २२
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात.
आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह ! मार्शमेलोज भाजायला शेकोटी पेटवली होती, मुलं मज्जा करत होती आणि आम्ही मोठी मंडळी मात्र त्या शेकोटी आणि आकाशातल्या पूर्ण चंद्राकडे बघून होळीच्या आठवणीत रमलो होतो. तेव्हा मजेतच मनात विचार आला "आणि उद्या रंगपंचमी पण बघायला मिळणार" ...
आणि खऱ्या अर्थाने शनिवार-रविवार निसर्गाची रंगपंचमी न्याहाळण्यात गेला म्हणायला हरकत नाही. शनिवारी दुपारी उत्साहात एम २२ ची सफर करायला निघालो. पहिला तासभर प्रवास एकदम छान झाला कारण रंगांची उधळण हायवेच्या आजूबाजूलाही दिसतच होती.
पण नंतर मात्र जरा हिरमोड झाला; पावसाने गाठलं. आता थांबेल-नंतर थांबेल करत करत आम्ही पुढे जात राहिलो पण त्याने काही आमची साथ शेवटपर्यंत सोडली नाही.
मुक्कामी (पक्षी रात्री राहणार होतो त्या हॉटेल मध्ये ) पोहोचलो तरीही पावसाची रिपरिप काही थांबेना. समोरच सुंदर तलाव आणि बागा असूनसुद्धा पावसामुळे आम्ही आपल्याच गाडीत बंदिवान ! अंधारही लवकर पडतो पण 'आपण काय हॉटेल मध्ये बसून टी व्ही बघायला आलोय का' म्हणत आम्ही आपले "गाडीतून तरी चक्कर मारून येऊ" म्हणून बाहेर पडलो आणि १५/२० मैलांवर एक लाईटहाउस होत ते बघायला गेलो. तिथे पोहोचेपर्यंत ते देखील बंद झालं आणि एकूणच पावसामुळे कसा दिवस फुकट गेला, निघण्याआधी 'हवामानाचा अहवाल' न बघण्याची चूक आपण कशी केली असे सर्व विचार मनातच ठेवून उद्या तरी पाऊस नसेल अशी आशा बाळगत झोपी गेलो.
सकाळी उठलो तेच पाहिले टी व्ही लावून दिवसाचा हवामानाचा अहवाल बघितला पण तो फारसा चांगला नव्हताच ... ९०% पावसाची शक्यता म्हणजे झालं, सगळ्या ठरवलेल्या गोष्टींवर पाणी ! तरीही इतक्या दूर आल्यावर काहीच नाही तर गाडीत बसून बघू असं म्हणून प्रवासाला सुरुवात केली ... आणि देवाला दया आली की काय काय माहित पण थोड्यावेळाने चांगली उघडीप मिळाली.
रस्त्यावर दुतर्फा पुन्हा एकदा रंगांची उधळण आणि प्रत्येक वळणावर एक नवीनच रुपडं घेवून समोर येणारा हा रस्ता फारच भावला.
मधेच एखाद्या तळ्याच्या काठाने तर मधेच गर्द झाडीतून, मधेच एखाद्या छोट्याशा टुमदार गावातून जाणारा वळणावळणाचा हा रस्ता.
या सर्व प्रवासात एका उल्लेखनीय रेषेवरून गेलो बंर का आम्ही :)
विषुव वृत्त आणि दक्षिण ध्रुव यांचा मध्य ... ४५ दक्षिण अक्षांश !
आणि त्यानंतर गेलो एका वाळूच्या डोंगरावर ! होय ... वाळूचे डोंगर ! Sleeping Bear Dunes National Lakeshore मधील Dune Climb हा पर्यटकांचा अत्यंत आवडता असा प्रकार. उन्हाळ्यात हौशी पर्यटकांनी फुलून जाणारा हा भाग आता थंडी पडायला सुरुवात झाल्यावर गर्दी सोडाच पण तिकीटखिडकी देखील "प्रवेश फी चे पैसे दहा मैल पुढे असलेल्या खिडकीवर भरा" अशी पाटी लावून बंद होती. अगदीच आठ - दहा लोकच होते तिथे आम्ही गेलो तर.
पण तो डोंगर चढल्यावर फारच सुंदर दृश्य दिसेल याची खात्री होती कारण त्या डोंगरांपलीकडे विस्तीर्ण असा मिशिगन तलाव पसरलेला आहे हे Google Maps वरून माहित होत. माहित नव्हत ते हे की ते एक टेकाड चढून गेल्यावर कळत पुढे आणखी एक आहे, ते चढल्यावर तिसरं मग चौथ :) पण त्या चढाई दरम्यान जे बघायला मिळालं ... अहाहा ... खरंच डोळ्याचं पारण फिटलं.
'हिरवे हिरवे'च नव्हे तर हिरवे - पिवळे - केशरी - गुलाबी - तांबडे ... अशा सर्व रंगांचे मिश्रण असलेले गालिचे. किती बघाल आणि किती कॅमेरा मध्ये बंदिस्त कराल ! माझी शब्दसंपदा आणि छायाचित्रण कला दोन्हीची कमतरता इथे जाणवतेय ...
गेल्या वर्षी पण असेच मिशिगन च्या दक्षिण टोकाला गेलो होतो, पण बहुदा जरा लवकर गेल्यामुळे इतके विविध रंग बघण्याची संधी हुकली होती. पण या वर्षी मात्र खूप सगळ्या रंगीबेरंगी आठवणी घेऊन परतलो !
[चला, आता पुढच्या वर्षी कुठे बरं जायचं याचा विचार करायला पाहिजे :) ]
वाचन
3607
प्रतिक्रिया
0