मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घ्या....मेतकूट! रेसिपी सौजन्य : जाईची आई :)

जाई अस्सल कोल्हापुरी · · पाककृती
साहित्य : १) चणा डाळ - ४ वाट्या २) बासमती तांदुळ - १ वाटी ३) उडिद डाळ - १ १/२ वाटी ( दीड वाटी) ४) मूग डाळ - १ वाटी ५) १/२ वाटी गहु ६) पाव वाटी धणे ७) पाव वाटी जिरे ८) हिंग २५ ग्रॅम ९) मिरे - ७-८ १०) लवंग - २० ग्रॅम ११) दालचीनी - २० ग्रॅम १२) वेलची - २० ग्रॅम १३) मेथी दाणे - १/२ चमचा १४) मोहरी * - २० ग्रॅम १५)मसाला वेलची / बडी इलायची - २ १६) १ जायफळ १७) लाल मिरच्या ४-५ १८) हळद १ ते १ १/२ चमचा (दीड) झाल्या का १८ वस्तू?.... इति मातोश्री कृती : १) सगळी धान्ये वेगवेगळी भाजुन घ्यावीत. खमंगपणावर भाजुन घ्यावीत. भाजताना त्याचा कच्चट रंग जाईपर्यंत भाजावीत्.आणि छान खमंग वास सुटायला हवा. पुढे जाउ द्यायची नाहीत. जरा अलिकडे भाजले तरी चालेल. इति आई :) भावार्थ : (पुढे म्हणजे जास्त भाजु नका. काळ्सर रंग येउ देउ नका..नाहितर मेतकूटाला काळसर रंग येतो आणि चव पण कड्सर लागते.) २) हिंग चणा डाळ भाजत आली की मग डाळीतच घालावा.. तेवढ्या गरम पणावर छान होतो. त्याचा कच्चे पणा जातो. वेगळा भाजाला तर काळसरपणा येतो. ३) बाकी सारे मसाले फक्त गरमावर परतून घ्यावे. म्हणजे त्याचा मूळ फ्लेवर न जाता फक्त moisture निघुन जावे.म्हणजे मिक्सर वर छान बारीक होतिल. ४) मोहरी आस्त भाजु नका. मेतेकूट काळसर पणावर जाते. :) मोहरी जर्रा पांढरट झाली की काढुन घ्या. नाहीतर ...? काय सांगा?.....बर्रोब्बर ...काळसरपणा येतो आणि? चव कडसर लागते.! ५) मिरच्या पण काळ्या न होता फक्त चुरचुरीत भाजुन घ्याव्या. ६) सगळे मसाले मिक्सर वर बारीक करुन घ्या.... अगदी छान पूड...! ७) मग सगळी धान्ये बारीक करा....तशीच अगदी पूड. आणि मग सगळे एकत्र करा...छान हलवा. चाळणीतुन चाळा.परत हलवा .परत चाळणीतून काढा. असे नीट करा. मग झालं की मेतेकूट! हे साधारण १ ते दीड किलो होइल..! इत्के करय्चे नसेल तर प्रमाण निम्मे घ्या. किंवा वाटी छोटी नैवेद्याची घेउन करा.छोटी वाटी घेतली तर मसाले चमचा चमचा घ्या. आता खरा खरा कूकर लावा. बासमती लावा...आंबेमोहोर लावा....गुर्गुट्या लावा. लावा एकदाचा! ३ शिट्ट्या. वाफ जाउ द्या. भात काढा. प्लेट घ्या. त्यामध्ये मीठ, डावीकडे लिंबाचे लोणचे घाला . गरम गरम वाफ येणारा भात प्लेट्मध्ये वाढुन घ्या.त्यावर तूप घाला ....असा भात तुपाने ओलसर झाला पाहिजे बरं! आणी आता ते दिव्य चवीचं ...मेतकूट ३-४ चमचे घाला. भात कोरडा वाटला तर अजुन तूप घाला. असा बोटानी मस्त हलका हलका कालवा. आणि पाची बोटांनी मुखात घाला. नाही ब्रम्ह दिसला तर नाव जाई बदलून धोंडु ठेवा. मध्येच लिंबाच्या लोणच्याचे चुटूक अशी जिभेवर लावा. आणि मग मनसोक्त ....जाणि़जे "यज्ञकर्म" करा. असं मनात आणि पोटात 'राम कृष्ण हरी ' होइल..... बास.....! बस दुवा में याद करना| :)

वाचन 13707 प्रतिक्रिया 0