मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

सविता · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः कोणे एके काळी मी डायरी लिहायचे, सुमारे १० वर्षांपुर्वी..म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या काळात, आणि मग ती अधून मधून चाळायचे पण! हा उतारा त्यातून घेतालाय्...अगदी तारखेसकट. ही माझी तेव्हाचीमते आहेत, आत्ता वाचले तर कदाचित वेगळे पण मत बनू शकेल. माहीत नाही. मी पहिल्यांदा जेव्हा ही एन्ट्री ब्लॉगवर टाकली, तेव्हा मला ब-याच लोकांनी "नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत..तुला त्यांचे लेखन झेपत नाहीये म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे", "तुझी बौद्धिक पातळी कशी टिपिकल मध्यमवर्गीय आहे, मग तुला व्.पु., अवचट असे टिपिकल लोकांचे लेखनच आवडत असेल" इ. इ. प्रतिक्रिया दिल्या. मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का? मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना! राहता राहीले, व.पु. आणि अवचट्...वेल मला आवडते त्यांचे लिखाण...आणि मला त्याचा अभिमान आहे.. तुम्हाला ते मध्यमवर्गीय वाटतेय याच्याशी मला काही देणे घेणे नाही. ------------------------------------------------------------ १३-oct-२००१ आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली. कथेला काहीतरी चांगला शेवट किंवा काय म्हणतात ते..’कथाबीज’ असावं. आयुष्यभर काही न करता बापाच्या पैश्यावर मजा करणारा माणूस...ज्याच्या आयुष्यात फारसं महत्वाचं किंवा वेगळं काही घडत नाही अशा माणसाची..दररोजचे फालतु तपशील असलेली डायरी..काय वाचायची गोष्ट आहे? खरंच ही असली पुस्तकं लोक का लिहीतात? आणि छापणारे का छापतात? त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला. उद्या माझी डायरी वाचून पण कोणी असाच निष्कर्ष काढेल का? खरंच मला असं ब-याच वेळेला असं वाटतं की मी वेडेपणा आणि शहाणपणा यांच्या फार बारीक सीमारेषेवर आहे. जरा धक्का द्या..एका साईडला मी नक्कीच पडेन..आणि ते ही वेडेपणाच्या..असं मला नेहमी वाटतं. मी एकटी असताना कित्येक वेळेला असंबद्ध आणि वेडगळ, विकृत वाटतील असे काहीतरी विचार करत राह्ते.खरंच मला हे टाळण्यासाठी माणसांच्या संगतीत जास्त राहीलं पाहिजे..पण घडतं नेमकं उलटं!..मला पुस्तकं, टी.व्ही, कॉम्प्युटर यांचीच संगत जास्त आवडते. चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं. सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे, ज्याला चौफेर/चौकस म्हणतात तशी पण आहे मग माझे काही वेळेसचे असंबद्ध विचार हे असेच अतिबुद्धीमान लोकांचा वेडसरपणा या सदराखाली मोडत असतील का? बघा....मी जी पुस्तकं वाचते..तसे माझे विचार असतात आणि असं काहीतरी फालतू वाचलं आहे ना...मग आज माझे विचार पण तसेच असणार...ते सगळं खरडत बसण्यापेक्षा झोपावं हे बरं!!!

वाचन 18400 प्रतिक्रिया 0