मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिसि जेसि चा पुढला भाग.

रामदास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही वर्षापूर्वी इब्राहिम मुल्ला या सॉलीसिटर फर्म ने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या अशीलाचे एस्क्रो अकाउंटचे पैसे सुमारे साठ लाख अफरातफर होउन गहाळ झाले आहेत.नेहेमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पैसे बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवले होते.त्याच्याकडे ज्या पावत्या होत्या त्या खोट्या आहेत असा बँकेचा दावा होता.तो खरा होता. पण चेक तर जमा झाला होता. तपासाअंती दहा लाख बँकेत बी. पी. जोशी यांच्या खात्यात जमा होउन काढून घेतलेले पोलीसांच्या निदर्शनास आले.बाकी पन्नास लाख भाईदरच्या बॅकेत जमा होउन काढून घेतलेले आढळून आले. पोलीसांनी तपासांती पाच आरोपींचा पत्ता लावला.जोशी, मेहेता , मिश्रा याना अटक करण्यात आली . तपास काम जसजसे पुढे गेले तसतसे गहीरे होत गेले . त्या तपासाची ही कहाणी. =============================================================== हसून घे .आजचा शेवटचा दिवस. आज ऍरेस्ट पक्की. उद्या सकाळी पंधरा दिवसाचा रीमांड घेतो. नंतर तू आणि मी. कसा कुटतो बघंच.विरकर फुस्कारला. तो पर्यन्त थोरात नी एक मेहेतर खाली जाउन आणला होता. क्या साब अभ्भी न्हाया था. असं पुटपुटत पण काही न बोलता कामाला लागला. थोड्या वेळाने रुम परत साफ झाली. सगळे आयो आपापल्या जागी येउन बसले. एकीकडे मिश्रा आणि मेहेताच्या ऍरेस्टचे पेपर तयार झाले होते.मिश्रा चे खिसे मोकळे करण्यात आले. पट्टा काढून घेतला.पैशाचं पाकीट ,रुमाल ,शूज काढून घेतले. अंगझडती घेतली. लॉक अप चा फॉर्म भरला. मेमोची कॉपी बनवली. मेहेताची झडती घेण्याचा प्रश्न नव्हताच.पण विरकरला मेहेताची काळजी वाटत होती. याला फिरदोसच्या रुम मध्ये टाक रे.बाबा लोकाबरोबर नको. स्साला सकाळी जिंदा राहणार नाही. (छोट्या मुलांना वेगळा लॉक अप देतात . पण डेंजरस. ब्लेडच्या पात्यानी रात्री मारामारी करतात.) मला सारखा एकच धसका . हा मला आत्ता लगेच आत का टाकत नाहीये. मग डोक्यात प्रकाश पडला. सेशन कोर्टाचा शिपाई अजून आला नव्हता.संदीप बहल आणि अनील सिंग दोघही अँटीसिपेटरी बेल चा अर्ज टाकून बाहेर होते. म्हणजे, कोर्टात टाईट फील्डींग लावून शिपाई वाट बघत बसले असणार. समजा बेल रीजेक्ट झाला तर दोघांना घेउन आज रात्री आमने-सामने.कनफ्रंटेशन शिवाय याची लिंक लागणार नाही. रात्र भारी पडणार. एव्हाना मिश्रा अणि मेहेता जमा झाले होते. त्या मेहेताच्या भैणीला बोलाव रे. ती बाहेर गॅलरीतंच उभी असावी. तेरे भाई को नाश्टा दिया. हा सर . मैने भी दिया. कलसे पेटभर खाना देता मै उसको. तिनं डोळ्याला रुमाल लावला. माधुरी दिसायला बरीच होती पण आता रडताना आणखी लाल लाल झाली होती. विरकर आता वेगवेगळ्या अँगलमधून तीचा अंदाज घेत होता. पैसा किधर रखा है तेरे भाईने? बाईने आता गळा काढला. मेरा भाई बेकसूर है साब . इसको पैचानती क्या तू? माझ्याकडे बोट दाखवलं. हि गूगली होती . हि हो म्हणाली तर माझा आणि मेहेताचा संबंध आहे. मान हलवून ती नाही म्हणाली. गूड . पण तेरी भाभी क्युं नही आयी. वो डिलीवरी मे गयी है साब. अभी तेरा भाईका डिलीवरी कौन करेगा रे? आता विरकर ला माधुरी मध्ये .जास्तच इंटरेस्ट आला. तेरी शादी हो गयी क्या? डायवोस हो गया. पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली विरकरचं लक्ष विच्यलीत झालंय. माधुरीकडे बघून तो म्हणाला मेरी वएफ भी गयी डिलीवरी मे. माधुरी काहीच बोलली नही. साहेब सि आर ल्याहा की आता.(सि आर म्हणजे क्राईम रीपोर्ट.) प्रधान साहेब चिवचिवले. विरकर कान खाजवत माधुरी कडे टक लावून बघत होता. एकदम दचकून त्यानी प्रधान कडे पाहीलं. मी जरा दूरच उभा होतो. ए भटा इकडे ये. हा रिपोर्ट मी लिहीला आहे तो टाइप कर. ठिक आहे साहेब. आयला हे मला नव्हतं माहिती . साला दुपारपासून इथेच होता. माझं मॅटर तरी टाइप केलं असतं.प्रधान परत चिवचिवला. आज प्रधान काही तरी गडबड करणार.माझ्या मनात एक पाल चुकचुकली.काहीतरी करून सात वाजेपर्यंत हा घरी गेला पाह्यजे. तुमचे पण ठेवा ना साहेब पेपर . अर्ध्या तासात उडवतो. इब्राहिम मुल्ला मधून चेक उडवले तसे का?. विरकर मोठ्याने हसला. प्रधान साहेब , तुम्ही घ्या ना इंटरोगेशन. तोपर्यंत मी जरा .... एक तरुण वकील आत आला .सर , मी ऍडवोकेट वागळे. बोला. संदीप बहल आणि अनिल सिंग च्या मॅटर मध्ये.. काय झालं ..एबी मिळाला का? नाही साहेब . तारीख पडली.पण नो ऍरेस्ट ची ऑर्डर आहे. हे पहा वागळे, मला चौकशी साठी दोघही उद्या पाहीजेत. उद्या नाही , परवा येतील साहेब . वागळे हसला. विरकर चा पेशंस संपला . मला उद्या पाहिजेत. सकाळी . जसा आदेश साहेब.वागळे जवळजवळ पळालाच. माधुरी चुळबुळत तशीच बसली होती. प्रधान पेन तोंडात धरून तिच्याकडे बघत बसला होता. विरकर कंटाळला. मनासारखं काहीच होत नव्हतं बहुतेक. साडेचार वाजले असावेत. व्हिजीटर यायला लागले होते. लॉकअप ला पाठवलेले शिपाई परत आले.चहावाला आला . तुम चाय प्येगी?. नही साब .साब मेरा भाई... वो ऍरेस्ट मै है. मै चान्स दिया था उसको.कल घर के तलाशी का ऑर्डर लायेगा. किधर रहेता है तुम वडाळा सर. घरमे कौन है और? कोई नही सर. विरकरने ओठावरून जिभ फिरवली. तुम जाव अभी. घरमेच रहेना . तुमारा भै को भी लायेगा. ठिक है साब. =============================================================== सहा वाजायला आले होते.प्रधान ने फायली गोळा करायला सुरुवात केली होती.त्याचे पेपर मी संपवले होते. साहेब मी चलू का? तुम्ही निघा साहेब. आता सुरुवात. मी मनात म्हटले. भटा इथे बस . मी खुर्चीवर बसलो.विरकर नी पट्टा हातात घेतला. पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तुकडा . फटका जोरात बसतो.अट्टल खिलाडी पण तीन फटक्यात संपतात. महाडीक पाठीकडून पुढे आला. माझं कोपर हातात घट्ट पकडून ठेवलं. विरकर नी पट्टा जोरात हाणला.डाव्या डोळ्यातून घळकन पाणी आलं. बोल , तुझ्या खात्यात चेक वटला कसा? तळहात बधीर झाला होता. दुसरा फटका. परत तोच प्रश्न. महाडीक नी खुर्चीला लाथ मारली. मी तोंडघशी टेबलाच्या कडेवर .दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली. मी टेबलाखाली वाकून थुंकलो.तोंडात आंबट चव गोळा झाली. पाठीवर एक जोरात रट्टा. पोटाचे पडदे एकदम कडक झाले.ठसका लागला. हातातून विजेचे लोळ जायला लागले. डोळ्यातलं खारं पाणी, रक्त तोंडात जाउन मळमळायला लागलं. मा****द,चेक आला कुठून ? मनोरमा शेट्टी च्या खात्यातून .कर्ज घेतलं होत. त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला. मला माहीती नाही. एक फायनल ऍसाल्ट. अंदाज चुकला. पोटात बसणारा गुद्दा छाती पोटाच्या मध्येच बसला. वरचा श्वास वरचं राह्यला. डोळ्यापुढे अंधारलं. लाल लाल चांदण्या दिसल्या. पुढे काही कळलंच नाही. =============================================================== परत डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर पंखा दिसला. परत लाल चांदण्या.कपडे गच्च ओले. हात बर्फामध्ये.महाडीक चा चेहेरा दिसला. विरकरचा आवाज येत होता. नाही साहेब . फटका चुकून बसला. नाही साहेब.ऍरेस्ट मेमो नाही लिहीला. परत शांतता. हो सर. जयहिंद . किती वेळ गेला माहिती नाही. अचानक सगळं काही फोकस मध्ये आलं. साहेब ,जागा झाला.इकडे या. कोणीतरी पाठीखाली हात घालून उठवलं. विरकर समोर उभा होता. चेहेरा घामानी थबथबला होता. पाण्याचा पेला घेउन पुढे आला. पाणी..... नको... पाठीतली कळ थांबतच नव्हती. हातातली बर्फाची पिशवी गळून पडली. दुसरा शिपाई पुढे आला. मी ओळखलं. जनरल ब्रँचचा शिर्के. मसाज वाला. त्यानी माझा शर्ट वर केला. बेंबीच्या वर काहीतरी चोळायला सुरुवात केली. परत मोबाईल वाजला. सर, होय सर, शुद्धीवर आला सर . नाही सर. उलटी नाही सर . होय सर. बघतो सर. ऍरेस्ट करावं लागेल सर. होम मधून फोन होता सर. ठीक आहे सर. जयहिंद. खालून मानेला पण बोलाव रे.विरकरचा आवाज कापत होता. साडेआठ वाजले होते. कष्टाने मी उठून बसलो. महाडीक गप्प उभा होता. मी टेबलवरून उतरलो. खुर्चीत बसलो. विरकर पुढे आला. काय बोलायचं हे त्याला सुचेना. मी मंद हसलो. त्याचा चेहेरा उजळला. भटा, आज नोकरी घालवली असती माझी. मी काय ख्वाजा युनुस वाटलो का? (मार जनरल ब्रँचचा पडला होता एकदा.) खोलीतलं वातावरण थोडं मोकळं झालं. चहा ? नको. मी महाडीकला खूण केली. माझ्या बॅगेतून हायफिनॅकची गोळी काढली. एका घोटात खाली घातली. थोड्या वेळानी स्पॅझम कमी झाले. मी उठून लादीवर आडवा झालो. नउ चे ठोके वाजले. =============================================================== दहाच्या ठोक्याला मी परत उठून बसलो. विरकर समोर जाउन बसलो. करा ऍरेस्ट साहेब.ठीक आहे आता. क्षणभर विरकर गलबलला. सॉरी , भटा फटका चूकून बसला. आज हवं तर लॉकअप मध्ये टाकत नाही. आता त्याचा चेहेरा मला लहान मुलासारखा दिसायला लागला. मी मंद हसलो. चलता है.आटपा लवकर. मला मेहेताची आठवण झाली.साला आत रडत असेल.मिश्रा घोरत असेल. मेमो लिहून तयार होताच. साडेदहा वाजता दोन शिपायांबरोबर मी लॉकअप कडे चालायला लागलो.

वाचन 15159 प्रतिक्रिया 0