मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंदी आयुष्याच्या पाककृती - 1 : मिपा कट्टा

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आनंद कसा घ्यायचा ते विसरले आहेत अशी तक्रार जागोजागी ऐकू येते. समृद्धीचे चणे वाढले असले, तरी दात ते चणे खाण्याऐवजी एकमेकांना विचकून दाखवणे, कोणावर तरी धरणे, कराकरा खाणे, स्वत:चाच ओठ चावणे, वगैरे गोष्टींमध्येच गढून जाताना दिसतात. 'थांबा आणि गुलाबांचा वास घ्या' या उक्तीप्रमाणे वागायची इच्छा असली तरी कधी कधी नुसते दुर्गंधीचे भप्कारेच येतात, त्याला आपण तरी काय करणार? त्यात सध्या आयटीने जी क्रांती केलेली आहे, तीमुळे इतकी वर्षं मुकाट्याने काम करणाऱ्या बायकाही आता मारे हपिसात जाऊन चकाट्या पिटून संध्याकाळी नवऱ्याप्रमाणेच थकून भागून आल्याचं सांगतात. कमी मुलांवर अधिक लक्ष पुरवण्याची अनिष्ट प्रथा पडायला लागल्यामुळे पूर्वी पाच-सहा पोरांकडे लक्ष द्यायला जितका वेळ पुरत असे, तितका वेळ आजकाल दोन पोरांसाठीही अपुरा पडतो. त्यात बायकादेखील हापिसात जातात हे सांगितलं का? असो, तर मुद्दा काय की आजच्या गृहस्थ गृहस्थिणींना स्वयंपाक करण्यासाठी देखील वेळ नसतो. मग असलेले चणे पडून राहातात, आणि दातही बिचारे उपाशी राहातात. तेव्हा आम्ही दात आहेत तोवरच, हे चणे कसे खाऊन घ्यावेत याविषयी एक लेखमालाच लिहायची ठरवली आहे. सध्याचा जमाना पाककृतींचा आहे. योग्य इन्ग्रेडियंट, योग्य प्रमाणात मिसळले की उत्तम पदार्थ जमतो. इतकंच नाही त्याची आकर्षक चित्रं काढून संस्थळांवर डकवली तर शेकडो लोकांना जळवण्याचं समाधानही मिळतं. म्हणून आम्ही आमचा सल्ला या पाककृतींच्या आकारबंधातच देणार आहोत. तेव्हा लोकहो, या, आनंदी होण्यासाठी काही पदार्थ कसे करायचे हे शिकून घ्या. पहिलाच पदार्थ अगदी ताजा आहे. (काही लोकांनी, 'आहो, रेसिपी टाका आणि लवकर द्या तो लोकांना नाही तर शिळा होईल' अशा प्रेमळ आठवणी देखील केल्या आहेत. दूरदूरहून नवीन गिऱ्हाइकं तो चाखून बघण्यासाठी येणार असंही म्हणत आहेत.) तर त्याची कृती अशी घटक पदार्थ (सगळेच पदार्थ आयते मिळत नाहीत. काही पदार्थांच्या कृती खाली दिलेल्या आहेत) 1. सुमारे पंधरा दे धमाल माणसं. ही मिपावरती दिसतात, मुखवट्यांआडूनसुद्धा त्यांचा मिष्किलपणा जाणवत राहातो. आपल्या आसपास त्यातली कोण कोण आहेत हे शोधलं की झालं. 2. त्यांना बसण्यासाठी आणि मनमुराद गप्पा छाटण्यासाठी जागा 3. या गप्पा बेफाम दौडण्यासाठी थोडं वंगण म्हणून काही पेयं. या पदार्थात - मेलन मार्गारिटा - ('च्यायला ते यंत्र किती वेळा फिरवत बसायचं, आण तसंच तिच्यामारी') टकिला शॉट्स यांचा वापर केला आहे. कृती खाली दिलेलीच आहे. 4. खाण्यासाठी पदार्थ - हो, गप्पांचा विठोबा चालू असला म्हणून पोटोबाकडे कसं दुर्लक्ष करायचं? पण चांगली गोष्ट अशी की आपल्याला फारसं करावं लागत नाही. इतर लोक काय काय मस्त मस्त आणतातच. पदार्थांच्या यादीविषयी खाली विस्ताराने दिलेलंच आहे. 5. किमान चार तास मोकळा वेळ. व मनसोक्त गप्पा 6. फार हॅहॅहूहू झालं तरी तक्रार न करणारे शेजारी मेलन मार्गारिटा मेलन म्हणजे टरबूज की खरबूज हे नक्की माहीत नाही. पण हा हिरव्या देशात मिळतो, व हिरव्याच रंगाचा असतो. त्याला साखर काकडी म्हणतात असंही मी ऐकलंय. अलिकडे काकड्यांचे खूपच प्रकार ऐकून आहे. पण या मात्र खरोखरच दहा इंच व्यासाच्या असू शकतात. असो. मेलनचे तुकडे (तीन कप - सुमारे पाउण लीटर) करून ते फ्रीझरमध्ये ठेवायचे. काही तासात फ्रीझ होतात 0.5 कप (120 मिली) टकिला 0.5 कप (120 मिली) ट्रिपलसेक (किंवा कॉइनत्रॉ) (ट्रिपलसेक नसेल तर संत्र्याचा इसेन्स काही थेंब, पाव कप व्होडका (किंवा टकिलाच), पाव कप पाणी, चार टीस्पून साखर यांचं मिश्रण) 1 मोठं लिंबू 5 चमचे साखर 5 बर्फाचे तुकडे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घालावं. आणि सर्व बर्फाचा बारीक चुरा होईपर्यंत घुर्रर्र करावं. लोकांना द्यायचं नसल्यास सरळ जगनेच पिता येतं. पण दिलंत तर सुमारे पाच पेयं होतात. टकिला शॉट्स डाव्या हाताच्या मागच्या भागावर, अंगठा हाताला मिळतो तिथे थोडं लिंबू चोळून त्यावर चिमूटभर मीठ ठेवायचं. त्याच हातात एक लिंबाची फोड धरायची. दुसऱ्या हातात टकिलाचा एक शॉट (एका वेळी गिळता येईल इतका) शॉट-ग्लासमध्ये घ्यायचा. सगळ्यांनी (हे एकापेक्षा अधिक लोकांनी करायचं तर खरी गंमत) एका वेळी आपला ग्लास एका झटक्यात रिकामा करायचा. हा झटका जिभेला आणि घशाला जाणवला पाहिजे. ती चव विरण्याआधीच पटकन मीठ चाटायचं आणि लगेच लिंबू चावायचं... आहाहाहा... थोड्या वेळाने रीपीट. खाण्यासाठी पदार्थ यावेळी घरगुती पाव, राजमा, कोबीची भाजी, लाल मिरच्यांची फोडणी असलेला आंबट खारट दहीभात, व गाजर-अक्रोडाचा केक असा मेनू होता. पाव राजमा लोक अर्थातच प्रेमाने इतर पदार्थही घेऊन आले. दिपालीने बनवलेला अॅपल अपसाइड डाउन केक नाटक्याने स्वत:च्या हाताने बनवलेला (असं तो सांगतो...) पनीर अचारी पारुबाईंनी आणलेला सुंदर कॅरेमल क्रंच व्हाईट क्रीम आणखीन काय काय मस्त मस्त केक शिल्पाने आणलेले उडीद वडे... कुठे दिसताहेत काय म्हणता, अहो ते संपले केव्हाच. गोड पोरं आत्तापर्यंतची कृती नीट केली तर गप्पा व्हायला फारसं काही करावं लागत नाही. म्हणजे पोह्यांना फोडणी दिली की थोडा वेळ नुसती वाफ काढायची असते, तसं. त्यात नाटक्यासारख्याकडून त्याला आलेल्या पुणेरी अनुभव ऐकायचे म्हणजे पर्वणीच. बेसनलाडूसारखं कोणीतरी नव्यानव्या वधूला घेऊन आलेलं असेल तर उत्तमच. मग 'कायरे, गेल्या वेळी दुसरीलाच घेऊन आला होतास ना' म्हणून खेचायला उधाणच येतं. तेवढ्यातल्या तेवढ्यात शिल्पाला सुद्धा नवीन लग्नाबद्दल छेडायचं... आणि मिपाबद्दलचं, नुकत्याच घडलेल्या आयटी, सैपाक व भप्करसारख्या गोष्टींबद्दलचं गॉसिप बबलू, सौरभ,दिपाली, पारुबाईंबरोबर करायचं. ही अशी 'वाफ' काढत असताना अधून मधून मार्गारिटाचं किंवा टकिला शॉट्सचा हबका मारायचा आणि पुन्हा मंद उबेवर वातावरण राहू द्यायचं. मध्ये मध्ये हास्याची चुरचूर ऐकू येत राहाते. मधूनच कुकरच्या शिटीसारखा हास्याचा स्फोट होतो. एकंदरीत चांगलंच चाललंय म्हणायचं. अशा चर्चांमध्ये काय रंगत येते, व कुठचे विषय डोकावून जातात हे सांगता येत नाही. वानगी दाखल थोडे देतो, इतर कट्टरांनी (म्हणजे कट्ट्याला आलेल्यांनी) भर घालावी, विस्तार करावा. -संकेतस्थळे कोणी कशी तयार केली? संकेतस्थळांचे मालक, चालक, कंटक यांचा इतिहास-भूगोल -नवीन लग्न झालेले, संसारात मुरलेले - लक्षणे, स्वयंपाक पद्धती व कौशल्ये इत्यादी. (यावर मी तरी आणखीन काही लिहिणार नाही, मायला आधीच फार बदनाम झालोय) तसंच नाड्या कोणाच्या हातात आहेत/असाव्यात -"बाब्या कार्टे सिद्धांत" यावरची मौलिक देवाणघेवाण. -बेलाचा एकोळीचा प्रतिसाद, व त्यावरून त्याची टेर खेचणे, त्याच्या जुन्या चर्चांविषयीच्या रम्य आठवणी -टॅक्सी/रिक्षा चालकांचा माज व त्यावरील सौ. रभरांग नेकर :) यांचे जालीम उपाय. थोड्या वेळाने मात्र तयार केलेले पदार्थ खरोखरच द्यायचे लोकांना. मग मोक्याच्या जागेवर म्हणजे बुफे टेबलाभोवती उभं राहून, खुर्च्यांवरती बसून, एकमेकांशी चकाट्या पिटत सगळे पदार्थ फस्त करायचे. मनसोक्त गप्पा जेवण झाल्यानंतर पुन्हा स्थानापन्न होऊन तृप्ती व्यक्त करायची व पुन्हा गप्पांचे ग्लास भरायचे. मग सगळ्यांची निघण्याची वेळ आली की चवीचवीने पदार्थ काय फर्मास झाला असं पोटावर हात फिरवत म्हणायचं. तुम्ही बॅचलर किंवा तात्पुरते बॅचलर असलात तर पिशव्या भरभरून उरलेले पदार्थ घेऊन जाऊन दोन दिवस चैन करायची. नक्की कोण नक्की काय बोललं हे सगळं ब्लर होऊन फक्त धमाल आली एवढंच लक्षात राहिलं याचा अर्थ पदार्थ फर्मास झाला, मनात भिनला. तरी जाता जाता या पदार्थात 'एक' अट्टल पुणेरी माणूस कमी पडला याची हळहळ देखील व्यक्त करायची. सगळंच परफेक्ट झालं तर पुढच्या वेळी काय करणार ना? असो. तर सांगायचा मुद्दा काय, की मिपावर भेटणारे समधर्मी मित्र-मैत्रिणी, चमचमीत खाणं, एखादं सुंदर ड्रिंक, भरपूर केक आणि छान गप्पा असतील तर आनंदी होणं काय कठीण आहे? त्या संध्याकाळी घातलेला सदरा मी जपून ठेवला आहे.

वाचन 12069 प्रतिक्रिया 0