घरातील ज्येष्ठ व्यक्ती
आज दुपारची गोष्ट आहे. १० वर्षाच्या माझ्या मुलीची मैत्रिण आमच्याकडे माझ्या मुलीशी खेळायला म्हणून आली होती. आई म्हणजे माझ्या सासूबाई नेहेमीप्रमाणे लोकरीचा स्वेटर वीणत बसल्या होत्या. या चिमुरडीचा आल्या आल्या चिवचिवाट सुरु झाला. तिनी आल्या आल्या स्वेटरचं कौतुक केलं, तो शिकून घेण्यात रस दाखवला.
आई फक्त शांतपणे म्हणाल्या "बघ, म्हणजे येईल." : ) आणि वीणू लागल्या.
मैत्रिणीचा उत्साह बघून आमच्या पिल्लाला कंठ फुटला नसेल तर नवल - "आज्जी खूप छान वीणते. तिनी ऑलरेडी अर्धा स्वेटर वीणला आहे. ती मला शिकवणार आहे"
मला ते सगळं ऐकून खूप लाज वाटली. महीना झाला मी घारात आहे सध्या पण कधी आईंच्या वीणकामात रस घेतला नाही की स्वेटर अर्धा झालाय का कुणासाठी चाललाय याची साधी विचारपूस केली नाही.
या मुली मात्र आज्जीबरोबर आज खूप खेळल्या, एकटक वीणकाम पहात राहील्या. आईही खुलल्यासारख्या वाटल्या : )
हा आमचा नेहेमीचा अनुभव - जिथे मी आई म्हणून मुलीला कडक वळण लावायला जाते तिथे आज्जी तेच वळण हलक्या हातानी , सफाईनी लावून टाकते.
परवाची गोष्ट मुलीला एक गणित अवघड गेलं. अगदी रडवेली झाली ती. मी समजूत काढायला गेले तर ती अधिकच बिथरली. आईंनी मला हातानीच खुणावलं आणि गप्प बसवलं. मुलीला थोडी स्पेस दिली, रडू दिलं एकटं. थोड्याच वेळात श्रावणातल्या ऊन्-पावसासाराखा तिचा मूड हा हा म्हाणता बदलला. ती पूर्ववत हसू खेळू लागली. मी मनोमन आईंचे आभार मानले.
ज्येष्ठ व्यक्तींचं घरातील असणंच विशाल वृक्षासारखं भारदस्त, शीतलता देणारं, आश्वासक असतं. सर्वांना शक्य असतच असं नाही पण घरात एक टीनेजर असतेवेळी जर काही ज्येष्ठ व्यक्ती असतील तर माझ्या तरी मते जीवन बरच सुकर होतं.
वाचन
2435
प्रतिक्रिया
0