ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९
याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..८
कागीयामासान,हा आमचा जपानी मित्र सुमा गावात राहतो.तो आमच्या अनेक दिवस मागे लागला होता आवाजी आयलंडला जाऊ या. एका अशाच निवांत शनिवारी आवाजी बेटांना भेट देण्याचे ठरले.तेथे जाताना एका 'सस्पेंडेड ब्रिज'वरून जावे लागते.कोबे आणि आवाजी बेटांना जोडणारा हा 'आकाशी कायकोयो ब्रिज'. जगातील सर्वात लांब,उंच आणि महागड्या अशा साधारण ४ किमी लांबीच्या ह्या पुलाचे बांधकाम वीस एक वर्षे चालले होते.१९९८ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला.याचे वैशिष्ठ्य म्हणजे ह्याला खालून आधार न देता वरून मजबूत वायर्सनी आधार दिला आहे.खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे.
हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा.
जपानमध्ये फिरायला जाताना आमची 'डबाबाटली' कायम सोबत असायचीच.त्यातून कागीयामासानची भारतीय जेवणाची फर्माइश होती.त्यामुळे इथे थांबून पुरीभाजीला न्याय द्यायला हवाच होता.पुळणीवरून उठावसं वाटत नव्हतं पण आवाजी बेटं पहाण्याची उत्सुकता तर होतीच. तिथे पोहोचल्यावर रेलिंगच्या दिशेने सारे धावलो.लांबवर पसरलेला पॅसिफिक पाहत होतो.कागियामाने तेथून सुमाबीचही दाखवला आणि विंग स्टेडियम सुध्दा!फूटबॉलज्वराने तेव्हा सार्या जपानला वेढलं होतं, कारणच तसं होतं.त्यावेळच्या फूटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद जपान-कोरियाकडे होते ना!(त्याचा एक फायदा म्हणजे इंग्रजी पाट्या दिसू लागल्या होत्या!)
ह्या आवाजी बेटावर लोकं शनिवार,रविवारी डबाबाटली घेऊन येतात,चटया पसरून हिरवळीवर पहुडतात,फोटो काढण्यात रमतात. लहानथोर,तरुणांचे ताटवे,आजीआजोबांचे थवे सारेच येतात;पण इतरांना त्रास होईल असे कोणीच वागत नाही.तरुणींची छेड कोणी काढत नाही,सार्वजनिक संपत्तीचा अपव्यय तर कोणी नाहीच करत पण डबे खाऊन कचरा करून ठेवला आहे.शीतपेयांच्या बाटल्या,चॉकलेटांचे कागद असा कचराही कोणी करत नाहीत.उलट आवर्जून आपण बसलेली जागा आपण तशीच स्वच्छ ठेवून जातो आहोत ना,याची काळजी घेतात.(स्वयंशिस्तीच्या बाबतीत जपान्यांसारखे कोणीच नाही.)
आवाजी बेटांवर फुलांचा एक सुंदर,रंगीत ताटवा मुद्दाम तयार केला आहे.तिथे जाण्याचा कागीयामाचा अगदी आग्रह चालला होता.तसे फुलांचे ताटवे इथे जागोजागी आहेत तर हा काय वेगळा आहे? दिसतो आहे की इथून छान..अशा आमच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याने आम्हाला जवळपास ओढतच तेथे नेले. तो ताटवा म्हणजे चक्क घड्याळ आहे,चालू स्थितीत असलेले!
हे जपानी कुठे,कशी टेक्नॉलॉजी वापरतील.. नेम नाही.त्यांच्या रसिकतेला दाद देत आम्ही तेथून निघालो फुकुरा पोर्टकडे.'नरुटो वर्लपूल्स',समुद्राच्या भरती ओहोटीमुळे दिवसात दोनदा बदलणारे पाण्याचे प्रवाह हे फुकुरा पोर्टला जाण्याचे मुख्य आकर्षण! भरतीमुळे पॅसिफिक मधले पाणी प्रचंड प्रमाणात नरुटो कालव्यातून १३ ते १५ किमी/तास वेगाने इनलँड सी मध्ये घुसते आणि वसंतातील भरतीत तर हा वेग २० किमी/तास इथपर्यंत वाढतो.इनलॅंड सी आणि पॅसिफिक महासागराला जोडणार्या ह्या १.६ किमी लांबीच्या अधांतरी पूलाला नरुटो कालव्याचेच नाव दिले आहे.
वळणावळणांचा रस्ता,पूर्णपणे समुद्राला लगटून आम्ही जात होतो.एका बाजूला सतत पॅसिफिकची गाज तर दुसर्या बाजूला कुठे फुलांचे ताटवे तर भाताची इवली रोपं,कोबीचे गड्डे..थोड्या वेळाने मात्र फुलं,भाताची रोपं यातलं काहीच दिसेना ,फक्त कांदेच कांदे दिसायला लागले.मुसुंब्याएवढे किवा त्याहूनही मोठ्ठाले कांदे आणि त्यांच्या जम्बो पाती!सगळ्या वाफ्यांतून पातींची पाती लवलवत होती.कुठे पोतीच्या पोती रचून ठेवलेली, कुठे टेंपोत ती पोती भरणं चाललं होतं,ह्याच ठि़काणाहून पूर्ण जपानभर कांदा पुरवला जातो.
फुकुरा पोर्टहून भरतीच्या वेळानुसार फेरीबोटी सुटतात. त्या बोटीने पॅसिफिक सागरात अशा ठिकाणी नेतात जिथे पाण्याचे प्रवाह बदलतात.सगळ्यात वरच्या डेकवर जाऊन आम्ही राहिलो.भन्नाट वारा सुटला होता.समुद्राचे तुषार उडवत आमची बोट निघाली. प्रशांत..खरोखरच शांत आहे हा महासागर.संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर .. त्या समुद्राच्या अजून पोटात शिरलो.आता मात्र पाणीच पाणी चोहीकडे!
जमिनीशी नातं सांगणारा नरुटोपूल फक्त अधांतरी तरंगत होता,बाकी सगळीकडे फक्त पाणी..माणसाला आपल्या क्षुद्र अस्तित्वाची आणिकच जाणीव करुन देणारं अथांग,विशाल!जहाजाच्या कंट्रोल केबिनमधून जपानीत सूचना दिल्या जाऊ लागल्या बरोबर कागीयामाने आम्हाला कठड्याला धरुन उभं रहा अथवा तिथल्या बाकांवर बसा अशी भाषांतरित सूचना केली.
प्रवाह जेथे बदलतात तेथे आम्ही पोहोचत होतो.वार्यात हेलकावणारे आमचे जहाज आपला वेग जवळजवळ शून्य करत थांबले.इथे समुद्र अजिबात शांत नसतो.भन्नाट वारा आणि उसळणार्या,प्रवाह बदलत जाणार्या त्या लाटा आणि त्यांनी तयार होणारे मोठे भोवरे..निसर्गाचं एक वेगळंच रुप भान हरपून पाहताना एकीकडे आपला तोलही सांभाळावा लागत होताच.त्याच तंद्रीत असताना आमच्या जहाजाने परतीची वाट कधी पकडली ते कळलेच नाही.
आम्हाला सोडायला तो घरापर्यंत आल्यावर आपल्या पध्दतीप्रमाणे ,"चल की वर,अर्धा कप चहा तरी घेऊन जा.." असे म्हटले.खरं तर जपानी आयत्या वेळचं आमंत्रण स्वीकारायला उत्सुक नसतात.पण तो झाला बाबा लगेच तयार.आत येऊन चहापाणी होईपर्यंत लता,किशोरची गाणी ऐकत त्या जादूभर्या आवाजात अडकून पडला. चहा पितापिता एकदम कॅमेरा सरसावला त्याने आणि कचोर्या,बाकरवड्या आणि चिवड्याचेच फोटो काढत बसला.
तो आणि त्याची गाडी आम्हाला केव्हाही,कुठेही नेण्यासाठी तयार आहे असे निघताना सांगून मैत्रीची गाठ त्याने आणखी पक्की केली.
आवाजी बेटं आणि फुकुरा पोर्ट



वाचन
12794
प्रतिक्रिया
0