संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार
सध्या दुसर्या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे.
माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे. मग स्वतःचे संकेतस्थळ असावे ही प्रेरणा नेमकी कशामुळे ?
आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर संकेतस्थळांची 'वृत्तपत्रांशी' तुलना करता येइल.
१) 'स्वतःच्या विचारांचा (अनिर्बंध वा मुक्त) प्रसार' किंवा
२) 'दुसर्यांच्या विचारांचा विरोध' ह्यासाठी स्वतःचे वृत्तपत्र असावे ह्याच विचारांनी अनेकांनी वृत्तपत्रे चालू केली किंवा विकत घेतली. पुढे त्यात जाहिराती हा मुद्दाही समाविष्ट झाला पण तसे बघितले तर तोसुद्धा मुद्दा क्र. १) मधे बसू शकेल. हाच नियम संकेतस्थळांनाही लागू पडतो.
हा विचार कॄतीत आणण्यामागच्या प्रेरणाही वेगवेगळ्या असू शकतात. इतर संकेतस्थळांच्या धोरणांविषयी, तिथल्या सदस्यांविषयी, सुविधांविषयी, विषयांबद्दल - नापसंती ही एक प्रमुख प्रेरणा. त्याचबरोबर 'ही गोष्ट तुम्ही करता त्यापेक्षा (वेगळी, चांगली) करता येउ शकेल हे दाखवून देण्याची जिद्द किंवा नुसतीच 'स्वयं शिक्षणाची आच' (अर्थात ही फार दुर्मिळ). पण कारण कुठलेही असूदे, संकेतस्थळ उभारण्या / चालवण्या साठी पदरमोड करण्याची तयारी, (तांत्रिक किंवा समविचारी) सहकार्यांची जमवाजमव, सुरुवातीला तरी एक निश्चित धोरण वा उद्दिष्ट अशा अनेक गोष्टींची गरज असते.
आता संकेतस्थळ चालू केले आहेच तर मुख्यत्वे 'वाचकवर्ग' आणि नंतर सहभागी 'लेखक वर्ग' हवाच. मग ह्या दोन्ही वर्गांना त्यांचे संकेतस्थळावरचे वावरणे सोपे व्हावे म्हणून अधिकाधिक सुविधा पुरविणे - प्रसंगी (पैशाची, वेळाची, ज्ञानाची) पदरमोड करुन. ह्यातून वाचक / लेखक वाढीस लागले की संकेतस्थळाची 'क्षमता' गरजेप्रमाणे वाढवणे त्यासाठी परत पदरमोड. असे करुन संकेतस्थळ भरभराटीस येते.
आता 'असतिल शिते तेथे जमतिल भुते' - किंवा 'कट्ट्यावर जमणारे कट्टेकरी' किंवा 'विचारांची देवाण घेवाण करु इच्छिणारी मंडळी' - कुठल्याही कारणाने का असेना मंडळी जमणारच - आणि ती जमावितच असाच चालकांचा उद्देश तेव्हा हे योग्यच. पण जसजशी लोकं वाढायला लागतात तेव्हाच 'दुसर्या' विचारांची लोक, मत्सरग्रस्त, निव्वळ मजा बघणारे, बाजूने भांडणारे, भांडण लावणारे असे अनेक लोक गोळा होतात. हेही साहजिकच.
आणि तेव्हाच खरी कसोटी लागते चालकांची. ही खाजगी मालमत्ता खरीच, त्याबाबत दुमत होण्याचे कोणाचे काहीच कारण नाही. आणि खाजगी पणाबरोबरच तो खाजगीपणा जपण्याचे काही नियमही. नियम पाळण्याची जबाबदारी सदस्यांची, ते नियम बनवून, उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी चालकांची आणि नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी प्रशासकांची/संपादकांची. आता ह्यात पारदर्शकता नसली, समन्वयाचा अभाव असला किंवा एकाला एक न्याय आणि दुसर्याला दुसराच असे प्रकार असले की गडबड होणारच.
मालकी खाजगी - त्यामुळे नियम ठरविण्याचे स्वातंत्र्यही आणि ते बदलण्याचेही. त्याचमुळे "चपला", "आहे हे असे आहे" असे प्रतिसाद येणे अगदी साहजिकच. तसच वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे 'चालेल तेवढे दिवस चालेल नाहीतर बंद करुन टाकीन तिच्यामायला" हेही परिचयाचे. पण ह्याच वेळी "मिपाकरांमुळेच मिपा आहे..सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.." अशा प्रतिसादांमुळे गोंधळ उडतो.
इथले मालक पूर्वीपासून दुसर्या एका संकेतस्थळाचे नियमित, चांगले लिखाणकर्ते सदस्य, स्वत्: संगीततज्ज्ञ म्हणता येईल इथपर्यंत शास्त्रीय संगितात गती असलेले, बर्याच वेळेला दिसलेली उत्तम विनोद बुद्धी शिवाय व्यक्तिचित्रातून दिसणारी निरिक्षणशक्ती आणि वेगवेगळ्या कट्ट्यांतून कानावर पडल्याप्रमाणे माणस जोडण्याची क्षमताही.
पूर्वोक्त संकेतस्थळांचे जाचक नियम न पटल्यामुळे बाहेर पडून जिद्दिने, पदरमोड करुन नविन संकेतस्थळाची उभारणी आणि ते नावारुपाला आणून दाखविण्याची कला, क्षमता अंगी.
अशा सर्व पार्श्वभूमीवर 'अशी परिस्थिती का यावी' हे माझ्या आकलनाबाहेरचे.
मालकांनी नुकतेच एका जाहिर कार्यक्रमात 'मिपाचे' प्रतिनिधित्त्व केले, माझ्या अल्प माहिती नुसार ते ह्या संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत म्हणूनच त्यांना सहभागी व्हायची संधी मिळाली (नुसते ब्लॉगलेखक म्हणून नव्हे) आणि त्याच बरोबर त्यांनी सदस्यांचे जाहिर आभारही मानले आहेत.
असे असताना, (हे) संकेतस्थळ काढण्यामागची पूर्वीची उद्दिष्ट्ये काय होती, त्यांच्यात काही बदल झाला आहे का? निर्माण केलेले संकेतस्थळ त्या उद्दिष्ट्यपूर्तीच्या मार्गावर आहे का? नसेल तर कसे आणता येईल, प्रशासानात पारदर्शकतपाकशी आणता / वाढविता येईल, वगैरे वगैरे बाबींचा उहापोह करण्यासाठी हा लेख प्रपंच.
(टीपः मी नियमित लेखक नसलो तरी नियमित वाचक आहे आणि हा लेख संस्थळाचे बदलते स्वरुप जाणवले म्हणून लिहिला आहे, उडविला गेला, संपादित झाला तरी हरकत नाही, मला माझी जी मते आहेत ती व्यक्त कराविशी वाटली म्हणून केली एवढेच...)
वाचन
6225
प्रतिक्रिया
0