गुढी पाडवा विशेष
आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.
ही एक विसंगतीच वाटते की नवे वर्ष साजरे करण्यासाठी एकीकडे गोडाचे जेवण करायचे आणि दुसरीकडे मात्र कडुझार अशा कडुनिंबाची चटणी खायची. बरोबर की नाही?
माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने).
काल संध्याकाळी सहजच विचार डोक्यात आला की यालाही काहीतरी कारण असेल.
एकीकडे गुढी उभारुन आपण त्याला साखरेची माळ लावायची याचा अर्थ आपले सुख जगापुढे मांडायचे;
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही.
हा मंत्र जर तुम्ही आयुष्यभर जपलात तर जीवन नक्क्कीच सुखी होऊन जाईल.
याचा गाभा म्हणून जाता जाता बहिणाबाईची एक ओळ सुचली ती सांगतो आणि थांबतो.
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं
वाचन
10661
प्रतिक्रिया
0