हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...
मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
- परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
- या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते? आम्हांस वाटले होते की ९५ वर्षांच्या वृध्दास कोठडीत डांबून तृतीय रत्न दाखविल्यास नालस्ती होण्याची शक्यता होती.
- 'भारतात अल्पसंख्याकांच्या जिवास धोका आहे' असा अपप्रचार करण्यास इस्लामी आणि मानवतावादी यांचे फावते. - यास इलाज काय? अखेर, हुसेन यांच्यावर हल्ले आपणच केले, १२५०खटले आपणच भरले, त्यांविषयीच्या हलाहलाने आंतरजाल आपणच भरले. मग आता त्याची फळे आपणच भोगायची. यांतले काहीच न होते, तर आपण इतरांस 'तुम्ही कांगावा करता' असे छातीठोकपणे म्हणू शकलो असतो. रणांगणावर गेल्यावर रक्तमांसाचा चिखल अंगावर उडताच गर्भगळित होणारे नेभळट तर आम्ही नव्हेत. आम्ही तर ही अभिमानाने मिरवण्याची बाब मानायला हवी.
- आणि मुळात आम्हांस पडलेला एक 'सनातन' प्रश्नः आमची पुराणे आणि त्यांवर आधारित आमचे अभिजात साहित्य तर देवादिकांच्या आणि ऋषीमुनींच्या चाळ्यांनी आणि त्यांच्या सुटलेल्या चळांच्या रसभरित वर्णनांनी ओतप्रोत भरले आहे. आमचे देव काही अनाघ्रात मेरीच्या पोटी जन्मास आलेल्या येशुबाळासारखे शामळू आणि पुळचट नव्हते. पुष्ट, मांसल शरीरांच्या स्त्रिया दाखवून याच देवादिकांचे चित्रण करणार्या राजा रविवर्म्याची चित्रे - उदा. ही आमची शकुंतलाआजी. आमच्या (दुष्यंत नसलेल्या) आजोबांचा हिच्यावर फार जीव! - तर आबालवृध्दांच्या नजरा निवळण्यासाठी अभिमानाने आपापल्या दिवाणखान्यांत एकेकाळी मिरवणारे आपण इतके का बरे त्रासलो? सारखे एवढ्या-तेवढ्यास हात कलम करणे, दगड फेकून मारणे असे रानटी आणि रासवट चाळे करणार्यांच्या रांगेत जाऊन बसण्यास आपण एवढे उतावीळ का बरे झालो?
वाचन
9741
प्रतिक्रिया
0