लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे
लेखनप्रकार
"लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन." सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला.
"भलतंसलतं म्हणजे?"
"म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश सरकारवर नाराज झाल्या वगैरे.."
"अरे,मग ते खरं नाही का? पेपरमध्ये छापून आलंय तसं..."
"कुठल्या पेपरमध्ये? सकाळमध्ये? सकाळवर किमान तू तरी विश्वास ठेऊ नयेस" तो धूर सोडत म्हणाला.
"फक्त सकाळमध्ये नाही. बर्याच पेपरांत आलंय. बरं ते जाऊ दे. त्या अमिन सायानींना दिलेल्या मुलाखतीचं काय?
"काय त्याचं?"
"काय म्हणजे ... त्यात लताबाई म्हणतात की.. म्हणजे एकीकडे म्हणतात की... की थोरले बर्मनदा मला वडिलांच्या ठिकाणी होते आणि दुसरीकडे म्हणतात की बर्मनदांनी एक गाणं पुन्हा रेकॉर्ड करायला पाहिजे म्हटल्यावर आमचे गैरसमज झाले आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही कोण माझ्याबरोबर काम करायला नकार देणारे. मीच तुमच्याबरोबर काम करत नाही ज्जा.."
"मग त्यात काय एवढं? तसं झालंसुद्धा असेल.."
"अरे मग नंतर 'आता आर्डीला लाँच करायच्या वेळी आलात की नाही झकत पाय धरायला..' हा माज कशाला?"
"माज? माज तुझ्या मते. माज? आम्ही याला स्वाभिमान म्हणतो. सेल्फ रिस्पेक्ट. एस्टीम. माज? 'नुसती मराठी येता कामा नये, तो जन्माने मराठी असला पाहिजे' असं परवा राजाभाऊ म्हणाले त्यालाही तू माजच म्हणशील. हा माज नव्हे. हा अभिमान. अस्मिता. हाच तो मराठी बाणा.."
"हां, हे चांगलं आहे. म्हणजे हा बाणा तुम्ही आपापल्यात भांडायला वापरणार म्हणा की."
"बर्मनदा कुठे मराठी होते?" त्याने एक प्रश्नार्थक झुरका घेतला.
"च्च... अरे मराठी- अमराठी नाही रे. संगीताच्या क्षेत्राविषयी म्हणतोय मी. 'तुम्ही असाल एवढे थोर, ज्येष्ठ संगीतकार वगैरे, पण शेवटी माझ्यासमोर झुकलातच की नाही' हा तुझ्या मते बाणेदारपणा काय?'
"ऑफ कोर्स. आणि समजा असला माज तर असू दे. मी म्हणतो लताबाईंनी करावाच एवढा माज. तो शोभूनही दिसतो त्यांना. त्यांनी माज नाही करायचा तर काय अमरसिंगांनी करायचा?"
"हम्म. आता तू म्हणशील की आण्णा चितळकरांबाबत लताबाईंनी केलं तोही स्वाभिमानच. सेल्फ रिस्पेक्ट."
"काय केलं आण्णांबाबत?"
"हेच की आण्णांचा कोणता तरी रेकॉर्डिस्ट होता. तो म्हणे लताबाईंबद्दल काहीतरी बोलला. लताबाई मग आण्णांना म्हणाल्या की त्याला काढून टाका, तरच मी गाणार. आण्णा म्हणाले की बाई, हा माझा जुना सहकारी आहे. त्याला काढून टाकणं काही मला जमणार नाही. मग लताबाई म्हणाल्या की... तेच रे!! II धॄII असं म्हणूया आपण फार तर. बाईंनी गायचं थांबवलं आण्णांबरोबर. मग 'ऐ मेरे वतन के लोगों' च्या वेळी आण्णा पाय धरायला आले आणि बाई फणकारुन म्हणाल्या की आणंच्याबरोबर गाणं? मी नाही ज्जा! दिल्लीला तालमी? मी नाही ज्जा! शेवटी गीतकार प्रदीप हात जोडून म्हणाले की बाई, तुम्ही हे गाणं गायलं नाही तर हे गाणं तसंच पडून राहील बरं का. मग बाईंनी आपला जरतारी पदर सावरला आणि एक समाजकल्याण खात्यासारखा निश्वास टाकून म्हणाल्या की बरं येते बाई. मग बाई दिल्लीला गेल्या, त्यांनी ते गाणं पंडीतजींसमोर म्हटलं आणि पंडीतजी...."
"पुरे, पुरे. II धॄII II धॄII II धॄII .... पण महाशय, हाही कणखर मर्हाटी बाणाच. अगदी आण्णाही मराठी असले म्हणून काय झालं? ते कितीही थोर संगीतकार असले म्हणून काय? "
"खरं आहे. 'मुझपे इल्जाम-ए-बेवफाई है, बेचैन नजर आणि तुम अपनी याद भी दिलसे मिटा जाते तो अच्छा था' ही सगळी रत्नं त्यांनी एकाच सिनेमात दिलेली असली म्हणून काय झालं? 'अनारकली' ला लताबाईंचा आवाज त्यांनी अजरामर केला असला म्हणून काय झालं? आणि पंडीतजींसमोर जेंव्हा हे गाणं बाईंनी गायलं तेंव्हा संगीतकाराचा उल्लेख करायला दिलीपकुमार सोयीस्करपणे विसरला म्हणून काय झालं असंच ना??"
"गुरुवर्य,..." त्यानं शेवटचा झुरका घेऊन सिगारेट रक्षापात्रात विझवली. "कुजकटपणा नको. बोलायचा मुद्दे सुचले नाही की माणूस असा तिरक्यात शिरतो. आण्ण्णा माझेही आवडते. पण म्हणून त्यांनी काय लताबाईंबरोबर पंगा घ्यायचा?"
"पंगा... घाणेरडा पण अगदी बरोबर शब्द वापरलात महाराज. पंगा. शिवसेनट पंगा. म्हणजे आपल्याला पाहिजे ते झालं नाही की घ्यायचं वैर. वर्चस्व. वर्चस्व की लडाई. 'सहर' मध्ये अर्शद वारसीची आई झालेली सुहासिनी मुळ्ये सांगते तशी अनकंडीशनल पॉवर. आणि आम्ही पामर असं समजत होतो की कलेच्या पवित्र वगैरे क्षेत्रात असलं काही राजकारण असत नाही. असू नये. 'मेरी तो सारी दुनिया घूम फिर के अनिलदाके पास आती है ' म्हणणारा तलत आणि ' ये तो तलतका बडप्पन है, मैं तो एक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं' असं म्हणणारे अनिलदा हे आमचे आदर्श.'विद्येप्रमाणेच कलाही विनयानं शोभते असले आमचे बुरसटलेले समज. आम्हाला असली पंग्याची भाषा कशी कळणार, सरकार?"
"व्वा. शब्द अगदी शेणखतात बुडवून ठेवल्यासारखे कुजके वापरलेत साहेब. बट राईट. म्हणून तुमच्या तलतला सत्तरीनंतर एकही गाणं मिळालं नाही आणि अनिल विश्वास दिल्लीत मेला तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला दहा माणसंसुद्धा नव्हती. लताबाई बघ. आजही त्या जिथं पाऊल ठेवतील, लोग वहांकी मिट्टी चूमनेको तैयार है..."
"ओहोहो. आहाहा. एहेहे.... हे आमच्या ध्यानातच आलं नाही बृहस्पती. शेवटी तुम्ही याच फूटपट्टीनं मोजणार नाही का सगळं! रफीसारखा सरळ माणूस लताबाईंच्या या वर्चस्वाला आव्हान देतो तेंव्हा लताबाई हेच करतात, अं? काये ते तुमच्या भाषेत? हां, पंगा. सुमन कल्याणपूरला तुम्ही कुजवलंत का? या प्रश्नावर लताबाई म्हणतात की मी कुजवणारी कोण? संगीतकारच म्हणायचे की आमच्याकडं ओरिजीनल लता आहे, तर आम्ही लताची नक्कल कशाला घेऊ? पंगा. आशाचं काय म्हटल्यावर बाई म्हणणार की आशाचं काही नव्हतं हो इतकं, पण ते भोसलेसाहेब होते ना, ते फार दुष्ट होते. पण ते गेले बघा अकाली. अरेरे, फार वाईट झालं हो. पण त्यानंतर आता सग्गळं सुरळीत झालं आहे. पंगा, अं?"
"चष्मा बदला शहजादे, चष्मा बदला. तुम्हाला बासुंदीत मिठाची कणी टाकायची एवढी हौस असेल तर दुसरीकडे जा. लताबाईंविषयी असलं काहीबाही आम्ही तरी ऐकून घेणार नाही." त्याने नवी सिगारेट पेटवली.
"तुम्ही असं बोलणार हे माहीतच होतं राजाधिराज. घाऊक प्रेम आणि घाऊक तिटकारा करणारे तुम्ही. तुम्हाला असली वस्तुनिष्ठता कशी पटणार? पण ध्यानात ठेवा आचार्य, एखादा ओंकारप्रसाद नय्यर निघतो. दशकातून एकदा निघतो, पण निघतो. आणि तो अशा माज करणार्यांना.. ओहो, चुकलो, अशा बाणेदारांना आपली जागा दाखवून देतो. 'तू नही और सही, और नही और सही' असं म्हणून जातो. पंगा घेणार्यांबरोबर तसाच पंगा घेतो..."
"ते मला काही माहिती नाही पण लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन." सिगारेट ओढणारा माझा मित्र पुन्हा म्हणाला.
वाचन
19731
प्रतिक्रिया
0