मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नटरंग आणि आमचं शंके़खोर मन

चिंतातुर जंतू · · काथ्याकूट
आमचे शंकेखोर मन घेऊन आम्ही सहसा मराठी बोलपट पाहाण्यास जात नाही, कारण मनास फार (कु)शंका पडतात, आणि त्यामुळे आम्हांस फार तसदी होते, असा आमचा नित्य अनुभव आहे. तरीही मराठी भाषा-संस्कृतीवरील प्रेमापोटी आणि सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला आणि आम्ही ते धाडस अखेर केले. आता आम्हांस पडलेल्या या काही शंका... टिप्पणी १: आम्ही करमणूकप्रधान बोलपट (उदा: गोविंदा वगैरे) पाहावयास जाताना मेंदू नावाचा आमचा अवयव नेमाने घरी ठेवून जातो, पण उपरनिर्देशित बोलपटाने पारितोषिके वगैरे मिळवून गोविंदाच्या बोलपटांहून उच्च दर्जा प्राप्त केलेला असावा, असा आमचा कयास होता, त्यामुळे आमच्या मेंदूस आम्ही बरोबर नेले. ही गलती असल्यास त्याची माफी आम्ही आधीच मागतो, पण हेही कबूल करतो, की मेंदू नेला नसता तर झाली असती, त्याहून तो नेल्याने अंमळ अधिक करमणूक झाली. टिप्पणी २: आपण चित्रपट पाहिला नसल्यास चित्रपटात घडणारे काही कळीचे प्रसंग आपल्याला खालील मजकुरामधून कळू शकतात. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर तो वाचावा.
  1. बोलपट नक्की कोणत्या काळात घडतो? एस. टी. सारखी दिसत राहाते, म्हणजे फार जुना नसावा. तसेच लोकांची भाषा, कपडे, तमाशातील अजय-अतुल यांचे संगीत वगैरे पाहताही असा समज होतो. पण पत्र, टेलिफोन, एस. टी. डी. बूथ वगैरे प्रकारांचा शोध लागला नसावा, असे दिसते. कारण बाप मेल्यावर महिनाभर गुणाचा कुटुंबाशी काही संपर्क नाही. सर्वसामान्यतः मनुष्यगणातील सजीव आपल्या जिवलगांपासून दूर गेल्यास त्यांची ख्याली-खुशाली पुसण्यास आणि आपली सांगण्यास उपरनिर्देशित साधनांचा उपयोग करतात, असा आमचा अनुभव आहे.
  2. अतुल कुलकर्णी नाच्या होण्यास तयार होतो आणि प्रत्यक्ष नाच्या बनतो, या दरम्यान नक्की किती काळ जातो? पैलवान गडी नंतर इतका हडकतो, की काही महिने दुष्काळ, उपोषण किंवा कुपोषण झाल्याचा भास होतो.
  3. घरंदाज स्त्रियांना तमाशात काम करण्याविषयी विचारल्यास मार पडेल, हे कळण्यास किती अक्कल लागते? तेवढीही अक्कल नसलेले पुरुष जो तमाशा उभा करतील, तो बक्कळ चालेल, यावर आमचा विश्वास बसणे अंमळ कठीण गेले.
  4. कोंकणस्थ स्त्रिया या आमच्या घरच्याच! तरीही गोरीघारी स्त्री फडावर नाचताना पाहून आम्हांस काही तसदी वगैरे होत नाही; तितके आम्ही प्रागतिक (किंवा निर्लज्ज, काय म्हणाल ते!) आहोत. परंतु अशा स्त्रीने ग्रामीण असल्याचे दाखवताना हेल, भाषा, हावभाव यांवर थोडे कष्ट घ्यावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. ते इतके का जड आहे?
  5. अतुल कुलकर्णी नाच्या होईस्तोवर घंटाभर उलटून गेला असावा. मुख्य कथानक तोवर सुरुच होत नाही. असे का? त्यानंतरच्या घंटाभरात मात्र शून्यापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंतचा प्रवास, मग उत्कर्षबिंदू, मग पुन्हा शून्य आणि मग पुन्हा शिखर असा बोलपटाचा प्रवास होतो. त्यामुळे ते सर्व 'लवकर आटपा एकदाचे' अशा स्वरूपात होऊन जाते. असेही का? पहिला घंटाभर आम्ही मिशी कधी उतरेल आणि लावणी कधी सुरु होईल, याची वाट पाहिली. आम्हांस फार कंटाळा आला. इतरांस तो का येत नाही, याचा काही अदमास येत नाही. शून्यापासून शिखरापर्यंतचा दुसरा प्रवास तर दाखविलाच नाही. बहुधा तोवर बोलपटातले कलाकार आणि दस्तुरखुद्द दिग्दर्शक देखील कंटाळून गेले असावेत, असा कयास आम्ही काढला.
टिप्पणी ३: आम्ही सदाशिव पेठी. त्यामुळे वैचारिक मतभेदांची आम्हांस नको तेवढी आदत आहे. हिंसेची मात्र अजिबात आदत नाही. आमचा शंकेखोर मेंदू थोडा मागासलेला आहे, असे हे वाचून आपणांस वाटले, आणि आम्हांस झ, फ, भ वगैरे अक्षरे मिरवणार्‍या शिव्यांची लाखोली द्यावयाची मनीषा झाली, तर ती शक्यतो खाजगीत द्यावी, ही विनंती. आम्ही आपल्या भावना (आनंदाने नाही, पण) स्वीकारू. बाकी काही नाही, तरी आमच्या शंकांनी आपली किंचित करमणूक तरी झाली असेल, एवढीच गरिबाची आशा आहे. - चिंतातुर जंतू :S

वाचन 31963 प्रतिक्रिया 0